निवडणूक नको; म्हणून मी शेकापची बैठक सोडून अलिबागला निघून आलो होतो...

एन. डी. पाटील यांच्यामुळेच मी आमदार आणि शेकापचा सरचिटणीस झालो : जयंत पाटील
निवडणूक नको; म्हणून मी शेकापची बैठक सोडून अलिबागला निघून आलो होतो...
N. D. Patil-Jayant Patilsarkarnama

पुणे : मी विधान परिषदेची २००१ ची निवडणूक ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील (n.d. patil) यांच्या आदेशानुसारच लढवली होती. कारण, माझ्या घरातून माझी बहीण (मीनाक्षी पाटील) त्यावेळी मंत्री होती. एकाच घरातील दोघे आमदार कसे, हे मला काही पटत नव्हतं; म्हणून मी चिटणीसपदाची बैठक सोडून अलिबागला गेलो. पण, ‘एनडीं’नी मी निवडणूक लढवण्याबाबतची आग्रही भूमिका मांडली आणि त्यानंतर मी निवडणूक लढवत आमदार झालो. एन.डी. पाटलांमुळेच मी आमदार आणि शेतकरी कामगार पक्षाचा सरचिटणीस झालो, अशी आठवण शेकापचे आमदार जयंत पाटील (jayant patil) यांनी सांगितली. (I became MLA because of N. D. Patil : Jayant Patil)

शेकापचे ज्येष्ठ नेते, विचारवंत एन. डी. पाटील यांचे आज निधन झाले. त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना आमदार पाटील बोलत होते. ते म्हणाले की विधान परिषदेची निवडणूक लढविण्यास मी नकार दिला होता. कारण माझी बहीण त्यावेळी मंत्रिमंडळात होती आणि एकाच घरातील दोघे कसे, हे मला पटत नव्हते, त्यामुळे मुंबईतील चिटणीसपदाची बैठक सोडून अलिबागला गेलो होतो. पण, आमच्या पक्षाचे नेते विठ्ठलराव वांढे स्वतः मला घ्यायला अलिबागला आले. त्यानंतर मी पुन्हा मुंबईला आलो आणि विधान परिषदेसाठी माझा फार्म भरण्यात आला. निवडणुकीत संख्या जमत नव्हती. तरीही आहे त्या संख्येवर आपण लढायला पाहिजे, अशी आग्रही भूमिका एन. डी. पाटील यांनी त्यावेळी मांडली आणि मला विधान परिषदेसाठी उभं करण्यात आलं. एन. डी. यांच्यामुळेच मी आमदार आणि त्यानंतर पक्षाचा सरचिटणीससुद्धा झालो, अशी कबुली जयंत पाटील यांनी या वेळी बोलताना दिली.

N. D. Patil-Jayant Patil
महाराष्ट्र सीमालढ्यातील आधारस्तंभ हरपला!

...अन्‌ मी सरचिटणीसपद स्वीकारले

अनेक लढ्यात मी त्यांच्यासोबत सामील झालो होतो. शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीसपद मला त्यांच्यानंतर त्यांच्याच आग्रहाखातर मिळाले आहे. या पदासाठी मी सुरुवातीला नकार दिला होता. मात्र, नाशिकच्या पक्षाच्या अधिवेशनात एन. डी. पाटील यांनी मला हे पद आपल्याला घ्यावेच लागेल, असे सांगितले. त्यामुळे मी सरचिटणीसपद स्वीकारले, असेही जयंत पाटील यांनी नमूद केले.

N. D. Patil-Jayant Patil
संघर्षाचे दुसरे नाव; एन.डी. पाटील

आक्रमक आणि प्रचंड प्रभावी लढे

शेतकरी कामगार पक्षाच्या जडणघडणीत ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. पण, महाराष्ट्रातील कष्टकरी आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न चळवळीद्वारे लढून त्याला यश मिळवून दिले. विशेषतः सीमाभागाचा प्रश्न, दुष्काळाच्या काळात त्यांनी उभारलेले लढे प्रचंड प्रभावी आणि आक्रमक होते. इस्लामपूरच्या आंदोलनावेळी झालेल्या गोळीबारात त्यांचा पुतण्या हुतात्मा झाला होता. त्याच काळात वैरागचा गोळीबार झाला होता. रायगड जिल्ह्यातील उरणच्या लढ्याचे त्यांनी दी. बा. पाटील यांच्याबरोबरीने नेतृत्व केले होते.

N. D. Patil-Jayant Patil
N. D. Patil : महाराष्ट्राचा सहकारमंत्री कपडे धुताना पाहिला होता?

त्यांचे काम महाराष्ट्र कदापि विसरणार नाही

पेणमधील ४५ गावांतील ‘एसईझेड’च्या विरोधात यशस्वी लढा देऊन ‘एसईझेड’ला हद्दपार करून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी पुन्हा मिळवून दिल्या. एन. डी. पाटील यांनी माझ्यासारखे अनेक लढवय्ये कार्यकर्ते तयार केले. डावी विचारसरणी महाराष्ट्रात तेवत ठेवण्याचे काम एन. डी. यांनी केले आहे. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहातील त्यांची कामगिरी आक्रमक, नावीन्यपूर्ण होती. विधीमंडळाने केलेले अनेक कायदे शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हितासाठी बदलण्याचे काम त्यांनी केले आहे, हे त्यांचे काम संपूर्ण महाराष्ट्र कदापि विसरणार नाही.

N. D. Patil-Jayant Patil
शोषित, वंचितांचा आवाज हरपला; प्रा. एन. डी. पाटील यांचे निधन

शेतकरी-कष्टकरीवर्ग पोरका झाला

एन. डी. पाटील यांनी विधानसभा, विधान परिषदेत काम केले आहे. विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी आपल्या कामचा ठसा उमटवला आहे. विधान परिषदेतील कामागिरी वाखाखण्याजोगी होती. कोल्हापूरच्या पाण्याचा आणि विजेचा प्रश्न त्यांनी सतत तेवत ठेवण्याचे काम त्यांनी केलेले आहे. विशेषतः टोलमुक्त कोल्हापूर ही कामगिरी त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरकरांनी केली आहे. त्यांच्या निधनामुळे शेतकरी-कष्टकरीवर्ग पोरका झाला असून शेतकरी कामगार पक्षाचे अतोनात नुकसान झाले आहे.

पोकळी भरून निघणे कठीण

कार्यकर्ता कसा असावा, याचे धडे त्यांनी आम्हाला दिले. आमच्या पिढीला घडविण्याचे मोलाचे काम त्यांनी केले आहे. ते तीन-तीन ते चार-चार तास बोलत असत. कष्टकरी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना आम्हाला आज त्यांची प्रकर्षाने आठवण येते. आज आम्ही पोरके झालो आहोत. आमचे नेते गणपतराव देशमुख चार महिन्यांपूर्वी गेले. या दोन्ही नेत्यांच्या निधनामुळे पक्षाची मोठी हानी झालेली आहे. ती पोकळी भरून काढण्यासाठी आम्ही किती प्रयत्न केले तर ते अवघड काम वाटते, अशी कबुलीही आमदार पाटील यांनी यावेळी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.