खडसे-महाजन वादात चर्चेत आलेल्या बुधवार पेठेची अशी आहे महती!

इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी इतिहासाची ही माहिती दिली.
खडसे-महाजन वादात चर्चेत आलेल्या बुधवार पेठेची अशी आहे महती!
History and Famous Places in Budhwar PethSarkarnama

पुणे : पुण्यातल्या बुधवार पेठेवरून सध्या माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) व गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यात आरोप-प्रत्योराप सुरू आहेत. या दोघांच्या वादाच्या केंद्रस्थानी पुण्यातली बुधवार पेठ (Budhwar Peth) आहे. बुधवार पेठेची साऱ्या महाराष्ट्राला एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे ही चर्चा अधिक रंगली. मात्र, या राजकीय वादाच्या पाश्‍र्वभूमीवर बुधवार पेठेचा वस्तुस्थितीजन्य इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला असता इतिहासाचे धागेदोरे थेट मुघल बादशहा औरंजेबापर्यंत जातात. ज्या भागाला सध्या आपण बुधवार पेठ म्हणतो हे नाव साधारणपणे सव्वादोनशे वर्षापूर्वी पेशव्यांच्या काळात मिळाले. मात्र, बुधवार पेठ परिसरात बाजाराला सुरवात करून या भागाला मुहियाबाद हे नाव १६९९ सालच्या सुमारास औरंगजेबाने केल्याचे पुरावे आहेत.(History of Budhwar Peth)

इतिहासाचे अभ्यासक पांडुरंग बलकवडे (Pandurang Balkawde) यांनी इतिहासाची ही माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘ औरंगजेब त्याच्या हयातीत दोनदा पुण्याला आला. पहिल्यांदा १६९७ व त्यानंतर १६९९ ला. छत्रपती संभाजी महाराजांनंतर संपूर्ण मराठी राज्य ताब्यात घेण्यासाठी तो आकाश-पाताळ एक करीत होता. मात्र, संताजी-धनाजीसारखे निष्ठावंत मराठी सरदार व महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाला पुरते हैराण केले. १६९९ साली औरंगजेबाने आपला तळ पुण्यात केला. त्याच्याकडील सैन्याची संख्या मोठी होती. लष्करातील सैन्याला लागणाऱ्या वस्तू खरेदीसाठी त्यांनी या भागात बाजार सुरू केला.

History and Famous Places in Budhwar Peth
गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत नेऊन दाखवावे;पाहा व्हिडिओ

मात्र, त्याचे नाव मुहियाबाद असे ठेवले. काळाच्या ओघात औरंगजेब गेला तरी या भागात बाजार सुरूच होता. पुढे पेशवाई आली. पेशवाईतदेखील या भागात बाजार भरत होता. पेशव्यांच्या काळात या भागात वेश्‍यावस्ती नव्हती तर धान्य बाजार भरत होता. उत्तर पेशवाईत कलावंतीनींचे नृत्याचे कार्यक्रम सुरू झाले. पेशवांच्या सैन्यात गारदी तसेच कानडी सैन्य मोठ्या संख्येने होते. या सैन्यातील आधकारी व सैनिक तसेच सरदार या कलावंतिनीकडे जाऊ लागले. मात्र. तेदेखील या भागात नव्हते. आता गाडीखाना म्हणतो त्या परिसरात जाईच्या गणपतीजवळ ५२ खनी इमारत होती. या इमारतीत पहिल्यांदा कलावंतीनींचे नृत्य उत्तर पेशवाईत सुरू झाले. पेशवाई बुडाली. त्यानंतर साधारणपणे १८२० नंतर पुण्यात ब्रिटीशांची राजवट स्थिर होऊ लागली.

राज्य व्यवस्था बळकट करण्यासाठी देशाच्या विविध भागात ब्रिटीशांनी सैन्य उभारले. ज्या शहरांमध्ये स्वत:चे सैन्य उभारले त्या प्रत्येक शहरात त्यांनी सैन्यांना राहण्यासाठी कॅम्प उभारले. पुण्यातील कॅम्प हा त्याचाच एक भाग आहे. महिनो-महिने घरापासून दूर राहणाऱ्या सैनिकांच्या गरजेसाठी अशा कॅम्पच्या जवळपास सैनिकांची गरज म्हणून वेश्‍याव्यवसाय करणारी वस्ती वसवली.पुण्यात पेशव्यांच्या काळात कलावंतीनी होत्या. मात्र, त्याला थेट वेश्‍या व्यवसायाचे स्वरूप नव्हते. पेशवाई गेल्यानंतर कलावंतीनींवर उपासमारीची वेळ आली.ब्रिटीशांच्या नव्या सत्तेच्या काळात या कलावंतीनींचा उपयोग वेश्‍याव्यवसायासाठी ब्रिटीशांनी सुरू केला. त्यातून कलावंतीनींची उपासमारी टळली. ब्रिटीशांनी या वेश्‍यांना व्यवसाय करण्यासाठी बुधवार पेठेच्या एका विशिष्ट भागात जागा दिली. त्याआधी आणि नंतरदेखील या भागात मोठी व्यापारी पेठ आहे. आजच्या पुण्यातदेखील रविवार पेठ आणि बुधवार पेठ या दोन पेठांमध्येच प्रामुख्याने मोठी व्यापारी दुकाने आहेत. ज्या भागात वेश्‍याव्यवसाय चालतो तो बुधवार पेठेचा खूप छोटा भाग आहे.’’

History and Famous Places in Budhwar Peth
नाथाभाऊंचे आता डोके फिरलयं, त्यांना ईश्‍वर सदबुध्दी देवोत!

दाणेआळीचा इतिहास

दाणे आळी ही बुधवार पेठेची आणखी एक ओळख. हे नावे कसे पडले. यावरून तर्कवितर्काच्या किंवा अपुऱ्या माहितीच्या आधारे बोलले जाते.औरंजेबापासून अगदी आतादेखील व्यापारी पेठेचा भाग म्हणून या संपूर्ण परिसरात विविध प्रकारची दुकाने आहेत.पूर्वी इथे बसता बाजार (एका विशिष्ट दिवशी रस्त्यावर भरणारा बाजार) होता.काळाच्या ओघात सुरवातीला उघड्यावर नंतर तंबूत बाजार भरत असे.कालांतराने इमारती उभ्या राहिल्या.दुकाने झाली. या पेठेत प्रामुख्याने धान्याचा बाजार होता.ब्रिटीश काळात मावळातील आंबेमाहोर तांदूळ आताच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाशेजारी बैलगाड्यांमधून आणला जायचा. त्या भागाला त्यावेळी गाडीखाना म्हटले जायचे.

तिथे त्याच्या गंजी लावून ठेवल्या जायच्या.तेथून भरडण्यासाठी तांदूळ बुधवार पेठेत आणला जायचा.कर्वे व चक्के या दोन व्यापाऱ्यांच्या गिरण्या बुधवार पेठेत होत्या. या संपूर्ण परिसरात धान्याचा बाजार मोठ्या प्रमाणात होता. गिरण्यांमध्ये भरडलेल्या तांदळातील उच्च प्रतीचा तांदूळ वेगळा करून तो पुणे रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्यापर्यंत पोचवला जायचा. तिथून मुंबईतील दाणाबंदरला नेऊन बोटीतून इंग्लडला पाठविला जायचा.ब्रिटीशांच्या राजवटीत मावळातील तांदळावर बुधवार पेठेतील या गिरण्यात प्रक्रिया करून इंग्लडला पाठविण्याचा मोठा उद्योग याच बुधवारपेठेत होता.तांदळाशिवाय इतर धान्यांचा व्यापारदेखील बुधवार पेठेत होता. त्यामुळे बुधवार पेठेच्या या भागाला दाणेआळी म्हटले जायचे.स्वातंत्र्यानंतरदेखील अनेक वर्षे या भागात धान्याचा बाजार होता.बुधवार पेठेच्या ज्या भागात धान्याचा बाजार होता.त्याच परिसरात वेश्‍यांची वस्ती होती इतके ही वस्तुस्थिती आहे.

History and Famous Places in Budhwar Peth
राष्ट्रवादीत येताच माझ्या मागे ईडी लावली ; ४० वर्ष तुमच्यासोबत चांगला होतो!

बुधवार पेठेची खरी ओळख आणि कॉंग्रेसच्या स्थापनेचा उगम

बुधवार पेठ या नावाने बुधवार पेठेला सुमारे सव्वादोनशे वर्षांचा इतिहास आहे. मात्र, त्याआधीची सुमारे शंभर-सव्वाशे वर्षे ही पेठ मुहियाबाद या नावाने अस्तित्वात होती.मराठेशाही आणि पेशवाई संपली. पुढे ब्रिटीशांची सत्ता स्थिर झाली.या सत्तेला विरोध करून स्वातंत्र्यांचे आंदोलन सुरू झाले.या काळात पुण्यात वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेची स्थापना केली. सार्वजनिक सभेची स्थापनादेखील या पेठेत सध्या जिथे वेश्‍याव्यवसाय चालतो त्याच गल्लीत झाली. या गल्लीत सार्वजनिक सभेचे कार्यालय आजदेखील आहे. दरवर्षी संस्थेच्या सभागृहात सार्वजनिक काकांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. सार्वजनिक काकांनी पुणे सार्वजनिक सभेची स्थापना केली. त्यातून राष्ट्रीय सभा स्थापन झाली. या राष्ट्रीय सभेची बैठक पुण्यात होणार होती. मात्र, १८८५ च्या सुमारास पुण्यात प्लेगची साथ जोरात होती. त्यामुळे ही बैठक मुंबईत घेण्याचे ठरले. याच राष्ट्रीय सभेच्या बैठकीत राष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली. राष्ट्रीय कॉंग्रेसची जननी असलेल्या राष्ट्रीय सभा व राष्ट्रीय सभेची जननी असलेल्या सार्वजनिक सभेचे मूळ बुधवार पेठेत आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.

History and Famous Places in Budhwar Peth
एकनाथ खडसेंवर 'ठाण्या'त उपचार करा ; गिरीश महाजनांचा टोमणा

आणखी काय आहे बुधवार पेठेत

बुधवार पेठ म्हटले की वेश्‍या व्यवसाय करणाऱ्यांची गल्ली या दृष्टीकोनातून पुण्याबाहेरील लोक पाहतात. मात्र, या पेठेने देशाचा इतिहास बदलण्यात किती मोठा वाटा उचललाय हे आपण पाहिले. हिंदू धर्माच्या शुद्धीकरणासाठी प्रार्थना सभेची स्थापना सर रामकृष्ण भांडाकर व नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी याच पेठेत केली. विठ्ठल रामजी शिंदे यांच्यासह देशातील अनेक समाजधुरीण प्रार्थना सभेत येत असत. आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांनीदेखील प्रार्थना समाजाच्या कार्यालयास भेट दिली आहे. भांग्या मारूती,सोन्या मारूती, पोटशुळ्या मारूती, पासोड्या विठोबा, पुण्याची ग्रामदेवता तांबडी व काळी जोगेश्‍वरी, बालाजी मंदीर, ही प्राचीन मंदीरं याच भागात आहेत. ज्या शनिवारवाड्याने (Shaniwar Wada) एकेकाळी संपूर्ण हिंदूस्थानवर राज्य केले तो शनिवारवाडा कसबा, बुधवार व शनिवार पेठेच्या सिमेवर आहे.‘जब तक नाना तब तक पूना’ असं ज्यांच्याबद्दल त्या काळात म्हटलं जायचं त्या नाना फडणवीस यांचा नानावाडा याच बुधवार पेठेत आहे.

नाना फडणवीस यांनी ब्रिटीशांना तब्बल २० वर्षे रोखून धरले होते. सीटी पोस्ट, बाहुलीचा हौद, पेशवाईतील प्रसिद्ध घाशीराम कोतवालची चावडी, बुधवार वाडा, किर्लोस्कर नाट्यगृह (आताचे वसंत सिनेमा) देशातला पहिला सार्वजनिक भाऊ रंगारी गणपती, संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध पावलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती (Dagdusheth Halwai Ganpati), बेलबाग, हे सारं बुधवार पेठेतचं आहे. लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर आपल्या कुटुंब कबिल्यासह एकेकाळी याच पेठेत श्रीनाथ टॉकीजजवळ रेवडीवाल्यांच्या बोळात राहात असत.सर्व प्रकारच्या सांगितिक वाद्याची दुकाने याच बुधवार पेठत होती व आहेत.शालेय पुस्तकांपासून साहित्यिक व धार्मिक पुस्तकांच्या विक्रीचे केंद्र अप्पा बळवंत चौकात आहे.पत्रकारितेच्या क्षेत्रात ज्या वृत्तपत्राचे नाव देशभर आदरानं घेतलं जातं त्या ‘सकाळ’ वृत्तपत्राची सुरवात नानासाहेब परूळेकर यांनी शनिवारवाड्यामागील जागेत एक जानेवारी १९३२ साली बुधवार पेठेत केली.

बुधवार पेठ पुण्याचे सांस्कृतिक केंद्र

संस्कृतचा अभ्यास आणि संस्कृत ग्रंथांचे प्रकाशन करणारी महाराष्ट्रातील पहिली संस्था ‘आनंदाश्रम’ नावाने बुधवार पेठेत उभी राहिली.म.चि.आपटे यांनी टिळकांचे सहकारी, कादंबरीकार हरी नारायण आपटे यांच्या सहकार्याने १८८८ साली ही संस्था स्थापन केली.लक्ष्मी रस्त्यावरील पुणे नगर वाचन मंदीराची स्थापना बुधवार वाड्यात झाली.(आताच्या फरासखाना पोलीस ठाण्याच्या इमारतीशेजारी पूर्वी बुधवार वाडा होता) सदाशिव, नारायण, शनिवार या पेठा पेशवाईत वसल्या.मात्र, त्याआधीपासून जुन्या पुण्याचे व्यापाराचे मुख्य केंद्र बुधवार पेठ हेच होते. तत्कालिन पुण्याचे सामाजिक, राजकीय, धार्मिक, अर्थिक,साहित्यिक केंद्र बुधवार पेठ होती.पुणे राज्याची सांस्कृतिक राजधानी असेल तर बुधवार पेठ पुण्याचे सांस्कृतिक केंद्र आहे.आताच्या काळातही मोबाईल, ईलेक्ट्रिकल तसेच ईलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या व्यापाराची प्रमुख बाजारपेठ बुधवार पेठेत आहे.लक्ष्मी रस्त्याचा बराचसा व्यापारी भाग बुधवार पेठेत मोडतो.

मुलींची देशातील पहिली शाळादेखील बुधवार पेठेतच

महात्मा फुले व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींची देशातील पहिली शाळा बुधवार पेठेतील तात्याराव भिडे यांच्या वाड्यात एक जानेवारी १८४८ साली सुरू केली. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीरासमोर भिडे वाडा आहे. ज्या काळात मुलींना शिक्षणाला बंदी होती.अशा काळात सावित्रीबाईंनी मोठ्या धीराने ही शाळा सुरू केली आणि हिमतीने चालवली. आज जीवनाच्या सर्व क्षेत्रात महिला पुरूषांच्याही पुढे आहे. हे शक्य झाले ते केवळ मुलींच्या शिक्षणामुळे. याची सुरवातदेखील बुधवार पेठेत झाली हे लक्षात घ्यायला हवे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in