फडणवीस सलग 5 वर्षे मुख्यमंत्री होते, पण ते वसंतराव नाईकांचा विक्रम मोडू शकले नाहीत..

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका कार्यक्रमात बोलताना "मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते" हे विधान केले आणि त्यावरून राजकीय टिकाटिप्पणी सुरू झाली..
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis sarkarnama

पुणे : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावरुन बरेच महाभारत सुरु आहे. याला कारण ठरले ते राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnvis) यांनी केलेले एक विधान. बेलापूरमधील एका कार्यक्रमात बोलताना "मला आजही मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते" हे विधान त्यांनी केले आणि ते महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या निशाण्यावर आले. मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांच्यापासून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Sachin sawant) या सगळ्यांनी त्यांना टीकेचे लक्ष्य केले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील त्यांच्यावर टीका केली.

शरद पवार म्हणाले, फडणवीस यांचे काल मी भाषण ऐकले. मी त्यांचे अभिनंदन करतो. त्यांना अजूनही आपण सत्तेतच आहोत असे वाटते. 5 वर्ष सत्तेत राहिल्यानंतर अजूनही त्यांना मुख्यमंत्रीपदी असल्याचे विस्मरण झाले नाही. ही जमेची बाजू आहे. ही कमतरता आमच्यामध्ये आहे. मी 4 वेळा मुख्यमंत्री होतो हे माझ्या लक्षातही नाही. ही कमरतता मी कबूल करतो. शरद पवारांच्या या टीकेवर फडणवीसांनी देखील लागलीच प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, मी सलग पाच वर्ष मुख्यमंत्री होतो. पवारसाहेब मोठे नेते आहेत. ते चार वेळा मुख्यमंत्री होते. पण ते सलग पाच वर्षे मुख्यमंत्री राहू शकले नाही. कधी-कधी दोन वर्षे, तर कधी तीन वर्षे त्यांना मुख्यमंत्रिपदावर राहता आले. विरोधी पक्षनेता म्हणून मी समाधानी आहे, हे पाहून अख्खी महाविकास आघाडी अस्वस्थ आहे, असे ते म्हणाले.

मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोण किती काळ मुख्यमंत्री होते, हा मुद्दा चर्चेला आला आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्रात मागील 61 वर्षांमध्ये 19 मुख्यमंत्र्यांची निवड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक मुख्यमंत्री अर्थात काँग्रेस पक्षाचे आहेत. जवळपास 49 वर्षे मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडेच होते. तसेच आतापर्यंत विदर्भातून 4 मुख्यमंत्री निवडले गेले तर सर्वाधिक 6 मुख्यमंत्री हे पश्चिम महाराष्ट्रातून निवडण्यात आले होते.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक काळ या पदावर विराजमान होण्याचा मान वसंतराव नाईक यांच्या नावावर आहे. त्यानंतर हा मान देवेंद्र फडणविस यांच्याकडे जातो. ते सलग 5 वर्षे आठ दिवस मुख्यमंत्रीपदावर होते. तर विलासराव देशमुख 4 वर्षे 1 महिना 3 दिवस मुख्यमंत्रीपदावर होते. त्यामुळेच फडणवीस सलग 5 वर्ष मुख्यमंत्रीपदावर होते, पण ते वसंतराव नाईंकांचा विक्रम मोडू शकलेले नाहीत.

मुख्यमंत्री सलग कार्यकाळ कालावधी

1) वसंतराव नाईक - 11 वर्षे 2 महिने 15 दिवस (5 डिसेंबर1963 ते 20 फेब्रुवारी 1975)

2)देवेंद्र फडणवीस - 5 वर्षे 8 दिवस (31 ऑक्टोबर 2014 ते 8 नोव्हेंबर 2019)

3) विलासराव देशमुख - 4 वर्षे 1 महिना 3 दिवस (1 नोव्हेंबर 2004 ते 4 डिसेंबर 2008)

पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण हे 933 दिवस (1 मे 1962 ते 19 नोव्हेंबर 1962) कार्यरत होते. इतर मुख्यमंत्र्यांचा कालावधी पुढीलप्रमाणे :

मारोतराव कन्नमवार - 370 दिवस (20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963)

पी.के. सावंत (काळजीवाहू) - 10 दिवस (24 नोव्हेंबर 1963 ते 4 डिसेंबर 1963)

शंकरराव चव्हाण - दोन टर्म, 1653 दिवस

वसंतदादा पाटील - दोन टर्म, 1278 दिवस

शरद पवार - चार टर्म, 2413 दिवस

बॅ. ए. आर. अंतुले - 583 दिवस

बाबासाहेब भोसले - 377 दिवस

शिवाजीराव पाटील निलंगेकर - 277 दिवस

सुधाकरराव नाईक- 608 दिवस

मनोहर जोशी - 1419 दिवस

नारायण राणे - 259 दिवस

विलासराव देशमुख - दोन टर्म, 2681 दिवस

सुशीलकुमार शिंदे - 651 दिवस

अशोक चव्हाण - दोन टर्म, 379 दिवस

पृथ्वीराज चव्हाण, 1415 दिवस

विद्यमान मुख्यमंत्री यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी सूत्रे घेतली. त्यांचे 14 नोव्हेंबरपर्यंत 708 दिवस झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com