सेना नेत्यांवर ईडीचे छापे पडूनही जनता शांत का? : निखिल वागळेंनी दिले उत्तर

मुख्यंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मेव्हण्यावर छापे पडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ
Uddhav-Aditya Thackeray
Uddhav-Aditya ThackerayFacebook

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्यावर ईडीचे (ED Raids on Uddhav Thackeray`s close relative) छापे पडल्याने राजकीय हवा गरम झाली आहे. या छाप्यांमागे राजकीय सूडबुद्धी असल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे (Nikhil Wagle) यांनी केली आहे. हे एक प्रकारचे राजकीय टोळीयुद्ध असल्याचेही निरीक्षण त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नोंदविले आहे. सेना नेत्यांवर इतके सारे छापे पडूनही जनतेमध्ये त्याबद्दल रोष का दिसून येत नाही, या प्रश्नाचेही उत्तर त्यांनी आपल्या परीने दिले आहे. अनेक सेना नेत्यांचे हात बरबटलेले असल्याचा आरोप त्यांनी केला.

Uddhav-Aditya Thackeray
मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्यावर ईडीची कारवाई; शरद पवार म्हणाले...

ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावर एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट (ईडी) ने धाड टाकली. या धाडीच्या मागे राजकीय सूडबुद्धी आहे यात शंका नाही. यापूर्वीही देशात आणि राज्यात भाजप विरोधकांवर मोदी सरकारने अशा धाडी टाकल्यात. विरोधकांवर दबाव आणायला हे तंत्र गृहमंत्री अमित शहा यांनी सर्रास वापरलं आहे.

प्रश्न हा आहे की यापुढे कोण झुकतो आणि कोण त्याला समर्थपणे तोंड देतो. ईडी चौकशीनंतर राज ठाकरे थंड पडले, शरद पवार ठामपणे उभे राहिले. संजय राऊत तर ईडीवरच थेट आरोप करतात. पण शिवसेना नेते चिंताग्रस्त आहेत यात शंका नाही. महापालिका निवडणुकीआधी आणखी किती नेत्यांना लक्ष्य केलं जाणार, ही काळजी त्यांच्या मनात आहे. ठाकरे सरकार पाडण्यासाठीही चाललेला हा आटापीटा आहे. उद्या थेट मातोश्रीवर धाड टाकली गेली तरी आश्चर्य नाही. नारायण राणे आणि इतर कॅांग्रेसी नेत्यांना खिशात टाकण्यासाठी भाजपने हीच भानगड फाईल वापरली अशी चर्चा आहे.

Uddhav-Aditya Thackeray
मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यापर्यंत ED पाच वर्षांनी कशी काय पोहोचली? हे आहे उत्तर!

पण महत्वाची गोष्ट ही की, याविषयी जनतेत तीव्र प्रतिक्रिया उमटलेली नाही. काल ईडीने उद्धव ठाकरेंच्या मेव्हण्याचे ११ फ्लॅट्स तात्पुरते जप्त केले. लोक विचारताहेत, मुंबई परिसरात एक घर घेताना आमच्या नाकी नऊ येतात, हे ११ अलिशान फ्लॅट्स आले कुठून? किरीट सोमय्यांना तुम्ही कितीही शिव्या द्या ते दुटप्पी आहेत म्हणून. पण विरोधकांचे आर्थिक गुन्हे शोधून काढण्यासाठी त्यांच्याकडे तज्ज्ञांची मोठी टीम आहे. संजय राऊतपासून यशवंत जाधव, अनिल परबपर्यंत अनेक सेना नेत्यांची यादी त्यांनी जाहीर केली आहे. हे पुढारी भ्रष्ट नाहीत याची खात्री असती तर जनता त्यांच्या बाजूने उभी राहिली असती. पण गेली ३० वर्ष मुंबई महापालिकेत झालेली टक्केखोरी जनतेने पाहिली आहे. ही टक्केखोरी सर्वोच्च नेतृत्वापर्यंत पोहोचते हे सर्वांना चांगलंच ठाऊक आहे.

भाजपचं फावतंय ते इथेच. शिवसेनेबरोबर सत्तेत भागीदार राहिल्याने त्यांना सगळ्या आतल्या भानगडी माहीत आहेत. किंबहुना त्यात तेही सामिल होते. चोराची चाल चोरालाच कळते, त्यातलाच हा प्रकार.पण सत्तेचा हत्यारासारखा वापर करुन विरोधकांना कोंडीत कसं पकडायचं हे कौशल्य भाजपकडे आहे. त्या तुलनेत राज्य सरकार बावळट आहे. त्यांच्या कारवाया नेहमीच लेच्यापेच्या असतात. भाजप नेते भ्रष्टाचारी नाहीत असं कोण म्हणू शकेल? पण मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांनी भ्रष्टाचाराचं तंत्र बदललंय. कदाचित म्हणूनच राज्य सरकारच्या हाती काही लागत नाही.

Uddhav-Aditya Thackeray
मुंडे, ED ची चिंता करु नका, तुमची खासगी CD निघाली तर वांदे होतील ; राणेंनी डिवचलं

ही सूडकथा कुठपर्यंत जाणार सांगता येणार नाही. आज महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी शरद पवार ठामपणे उभे आहेत. पण ईडीच्या धाडीमुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांमध्येही घबराट पसरली आहे. तेव्हा आधी सेनेला वाचवू की राष्ट्रवादीला, असा पेच त्यांच्यापुढे आहे. यात कॅांग्रेस कमालीची शांत आहे. आपले नेते आज सूपात असतील तर उद्या जात्यात येऊ शकतात याची जाणीव त्यांना आहे.नजिकच्या भविष्य काळात हे सूडाचं राजकारण विलक्षण रंगेल. बरबटलेल्या हातांची ही लढाई जनता शांतपणे पहातेय आणि जमेल तिथे करमणूक करुन घेतेय. ज्याचे हात स्वच्छ असतील तोच या टोळीयुद्धात टिकाव धरेल, हे पुन्हा एकदा सांगतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com