महाडिकांच्या गुलालाचा खरा धक्का शिवसेनेपेक्षा सतेज पाटलांना बसलाय!

धनंजय महाडिक यांचा राज्यसभेत विजय; महाडिक कुटुंबाने ८ वर्षांनंतर विजय साजरा केला
महाडिकांच्या गुलालाचा खरा धक्का शिवसेनेपेक्षा सतेज पाटलांना बसलाय!
Dhananjay MahadikSarkarnama

सोलापूर : कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील बडे प्रस्थ म्हणून ओळख असलेल्या महाडिक कुटुंबीयांनी राज्यसभा निवडणुकीतील (Rajya Sabha Election) विजयामुळे तब्बल ८ वर्षांनंतर गुलाल उधळला. धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांचा लोकसभेला, तर अमल महाडिक यांचा विधानसभेला २०१९ मध्ये पराभव झाला, तेव्हापासून पराभवाची माळ महाडिक कुटुंबीयांच्या गळ्यात पडत गेली. विधान परिषद, गोकुळ, महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा सहकारी बॅंक अशा संस्थांमध्ये महाडिक कुटुंबीयांना पराभवाचे तोंड पहावे लागले. पण, राज्यसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत मुन्ना महाडिक यांनी पराभवाची मालिका खंडित केली आहे. हा विजय जसा महाडिक कुटुंबीयांना उर्जा देणारा आहे, तसा तो शिवसेनेपेक्षा (Shivsena), कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) धक्कादायक आहे. कारण, तो सतेज पाटलांचे मनसुबे उधळून लावणारा ठरू शकतो. (Dhananjay Mahadik's victory in Rajya Sabha; Mahadik family celebrated victory after 8 years)

साखर कारखाने, सहकारी संस्थांच्या माध्यमातून महाडिक कुटुंबीयांचा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात मोठा दबदबा होता. मात्र, गेल्या आठ वर्षांपासून त्यांच्या या सत्तेच्या सूर्याला ग्रहण लागले होते. मुन्ना महाडिकांच्या राज्यसभेतील विजयाने ते सुटले म्हटले तर वावगे ठरणार नाही. धनंजय महाडिक यांनी २०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापुरातून लोकसभा गाठली होती, तर अमल महाडिक यांनी भाजपच्या तिकिटावर कोल्हापूर दक्षिणमधून विजय मिळविला होता. मात्र, त्यानंतर गेल्या सात ते आठ वर्षांतील बहुतांश निवडणुकांत महाडिकांना पराभवाचा सामना करावा लागला होता. प्रत्येक निवडणुकीत त्यांना सतेज पाटील यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने मात देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

Dhananjay Mahadik
त्यावेळी मला मंत्रीपदाची ऑफर होती; पण... : राऊतांच्या आरोपाला संजय शिंदेंचे उत्तर

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत धनंजय महाडिक खासदार झाले, त्यानंतर भाजपकडून विधानसभेच्या रिंगणात उतरलेल्या अमल महाडिक यांनी तत्कालीन मंत्री सतेज पाटील यांचा पराभव केला होता. तो पाटील यांच्यासाठी मोठा धक्का होता. तेव्हा महादेवराव महाडिक म्हणतील तोच शब्द कोल्हापुरात खरा होत होता. गोकुळ दूध संस्था, जिल्हा बॅंक, महापालिका, जिल्हा परिषद या ठिकाणी महाडिक गटाचेच प्राबल्य होते. मात्र, लोकसभेला आघाडी असूनही बंटी पाटलांनी शिवसेनेच्या संजय मंडलिकांना पाठिंबा देत राष्ट्रवादीच्या धनंजय महाडिकांचा पराभव घडवून आणला. त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत नवखा पुतण्या ऋतुराज पाटील यांना उतरवत अमल महाडिक यांचा पराभव केला. त्यानंतर पाटलांची गाडी सुसाट सुटली पण महाडिकांच्या सत्तेला उतरती कळा लागली.

Dhananjay Mahadik
लक्ष्मण जगताप, मुक्ता टिळकांना फडणवीसांनी अर्पण केला राज्यसभा निवडणुकीतील विजय!

विधान परिषद निवडणुकीतही सतेज पाटील यांनी महादेवराव महाडिक यांचा पराभव करत राजकीय बदला घेतला. या धक्क्यानंतर महाडिक गटाच्या ताकदीला ओहोटी लागली. दरम्यानच्या काळात आमदार अमल यांच्या पत्नी शौमिका या कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा बनल्या, तेवढाच महाडिक कुटुंबावर गुलाल उधळला गेला. त्यानंतर महाडिक कुटुंबीय विजयोत्सवाच्या प्रतीक्षेत होते.

Dhananjay Mahadik
राज्यसभेच्या विजयानंतर फडणवीसांनी दिला विधानपरिषदेच्या यशाचा कानमंत्र

विधान परिषद, लोकसभा आणि विधानसभेत पराभावाचे तोंड पाहावे लागलेल्या महाडिकांची पाठीमागे लागलेली पराजयची मालिका काही केल्या खंडीत होत नव्हती. कारण, राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर मंत्री झालेले सतेज पाटील आणि हसन मुश्रीत यांनी गोकुळमधून महाडिक यांची सत्ता हद्दपार केली. त्यानंतर झालेल्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत याच जोडीने सत्ता मिळवली. विधान परिषदेची निवडणूकीही बंटी पाटलांनी बिनविरोध घडवून आणली. परवा झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतही महाडिकांचे नातलग असलेल्या सत्यजित कदम यांचा पराभव झाला, त्यामुळे महाडिकांना वारंवार पराभवाचे तोंड पहावे लागत होते.

तब्बल आठ वर्षांनंतर अवघड अशी राज्यसभेची निवडणूक जिंकत धनंजय महाडिक यांनी ‘टायगर अभी जिंदा है’ हे दाखवून दिले आहे. या निवडणुकीसाठी अख्खे महाडिक कुटुंबीय पायाला भिंगरी लावल्यासारखं राज्यात फिरले आणि आमदारांच्या गाठीभेटी घेतल्या. महाडिकांच्या या परिश्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नियोजनाची जोड मिळाली आणि मुन्ना महाडिकांनी विजयश्री खेचून आणली. या विजयाने महाडिक गटाला नवसंजीवनी मिळाली आहे. आगामी मनपा, जिल्हा परिषद, आणि पंचायत समिती निवडणुकीत महाडिक विरुद्ध पाटील सामना आणखी चुरशीचा होणार आहे. महाडिकांच्या ताब्यातील राजाराम साखर कारखाना हाती घेण्याच्या सतेज पाटील यांच्या मोहिमेला अटकाव घालण्याचा प्रयत्न निश्चितपणे होईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in