आवताडे तुम्ही ठेकेदार म्हणून नव्हे; तर आमदार म्हणून बोला : यशवंत मानेंची कोपरखळी!

आमदारांच्या ठेकेदारी नॉलेजचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना मोठे अप्रूप
Dattatray Bharane-Samadhan Avatade-Yashwant Mane
Dattatray Bharane-Samadhan Avatade-Yashwant ManeSarkarnama

सोलापूर : सोलापू्र (solapur) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची कामे झाली आहेत. या कामासाठी लागणारा मुरूम, दगड, माती, वाळू, खडी नेण्यासाठी वापरलेले ग्रामीण भागातील रस्ते खराब झाले आहेत. हे रस्ते कोण दुरुस्त करून देणार? माळशिरसचे आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी विचारलेल्या या प्रश्‍नाचे उत्तर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, (Dattatray Bharane) जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांच्याकडेही नव्हते. पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) व मोहोळचे आमदार यशवंत माने (Yashwant Mane) यांच्या ठेकेदारी नॉलेजचा मोठा फायदा आज जिल्हा नियोजन समितीला झाला. आमदारांच्या ठेकेदारी नॉलेजचे इम्प्रेशन बैठकीसह पालकमंत्री भरणे यांच्यावर पडलेले दिसले. (Curiosity to Dattatray Bharane, Guardian Minister of MLAs' Contract Knowledge)

प्रकल्प संचालक चिटणीस अगोदर म्हणाले, महामार्गापासून बाधित झालेले पाचशे मीटरपर्यंतचे रस्ते दुरुस्त करून दिले जातात. विषय होता ज्या रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक झाली त्या रस्त्यांचे काय करणार? त्यावर ते रस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित ठेकेदारानेच दुरुस्त करून द्यावेत, असे उत्तर चिटणीस यांनी दिले. आमदार आवताडे आणि आमदार माने यांनी यावर आक्षेप घेतला. जर त्या निविदेत तरतूदच नसेल तर तो ठेकेदार कसा रस्ता दुरुस्त करून देणार? इस्टिमेटच्या बाहेर जाऊन कोणीही काम करून देणार नाही. जर तुम्हाला प्रश्‍न सोडवायचा असेल तर दुसरीही बाजू (ठेकेदाराची) बघा, तरच प्रश्‍न सुटेल, असे त्यांनी सांगितले.

Dattatray Bharane-Samadhan Avatade-Yashwant Mane
'तुम्ही अगोदर खाली बसा' : दत्तात्रेय भरणे-राजेंद्र राऊतांमध्ये तू तू-मैं मैं!

आमदार माने यांनी, त्यांचे ठेकेदारी नॉलेज दाखवत निविदेतच रस्ता दुरुस्तीची तरतूद असते, असे सांगून टेंडरमधील बी-१ ची माहिती दिली. आमदार आवताडे तुम्ही ठेकेदार म्हणून नाही तर आमदार म्हणून बोला, असे सांगत कोपरखळी मारली. आमदार आवताडे या कोरपखळीला उत्तर देताना म्हणाले, दुसरी बाजू बघाच, अन्यथा आमदार माने यांनी जी व्यथा मांडली, गेल्या वर्षी मांडलेला प्रश्‍न अद्यापही सुटला नाही. दुसरी बाजू न पाहिल्यास त्या प्रश्‍नाचे उत्तर आयुष्यभरही सापडणार नाही, असा अभ्यासपूर्ण टोला लगावला.

Dattatray Bharane-Samadhan Avatade-Yashwant Mane
'ते' ठेकेदार जावई नाहीत; त्यांच्यावर तातडीने कारवाई करा : भरणे कडाडले!

आमदार माने व आमदार आवताडे यांच्यातील ठेकेदारी नॉलेजवर सुरू असलेल्या चर्चेकडे सभागृहातील सदस्य फक्त बघत होते. आमदार आवताडे कॉन्ट्रॅक्टर आहेत, आमदार माने यांनी टेंडरमधील बारीक माहिती मांडल्याचे कौतुक पालकमंत्री भरणे यांनी केले. मामा मी कॉन्ट्रॅक्टर नाही, असे सांगत आमदार आवताडे यांनी हसत हसत उत्तर दिले. ज्या ठेकेदारांनी रस्ता खराब केला त्यानेच तो दुरुस्त करून द्यावा, हा माणुसकीचा नियम असल्याचे पालकमंत्री भरणे यांनी सांगत बाधित रस्त्यांच्या प्रश्‍नावर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बैठक घ्यावी, अशी सूचना केली. या बैठकीला राष्ट्रीय महामार्ग, लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रीय महामार्गाचे काम घेतलेले ठेकेदार यांना बोलवावे, अशी सूचना केली.

दरवर्षी ४०० कोटींचा महसूल बुडतो : राऊत

जिल्ह्यात अनेक कामे सुरू आहेत. त्यासाठी वाळू, दगड, माती, मुरूम, खडी मिळत नाही. उपसा सुरू आहे. दर वाढले आहेत. नुकसान शासनाचे होते. महसूल बुडतो. लोक रॉयल्टी भरायला तयार आहेत. रॉयल्टी भरून पूर्वीप्रमाणे गौण खनिज उपसा करण्याची परवानगी द्या. एका जिल्ह्यातून दरवर्षी ४०० ते ५०० कोटी रुपयांचा महसूल मिळेल, मी तुम्हाला स्टॅम्पवर लिहून देतो. या निधीतून बाधित झालेले रस्ते दुरुस्त करा, अशी मागणी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केली.

उपमुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे बैठक

पूर्वीप्रमाणे गौण खनिज उपलब्ध व्हावे, मुख्यमंत्री सडक योजनेतील निधी कपात करू नये, कपात केला तर तो आपल्याच जिल्ह्याला मिळावा यासह सोलापूरच्या विकासासंदर्भात महत्त्वाच्या प्रश्‍नांवर मुंबईत बैठक लावण्याचा निर्णय आज झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत जिल्ह्यातील आमदारांची बैठक होणार आहे. विधानपरिषद निवडणुकीनंतर ही बैठक होणार असल्याची माहिती पालकमंत्री भरणे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in