१९९८ ची राज्यसभा निवडणूक : काँग्रेसचा अधिकृत उमेदवार पडला अन् शरद पवार आरोपांचे धनी झाले

Rajyasabha Election | Ram Pradhan | 1998 : तेव्हापासून महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध होवू लागल्या होत्या.
१९९८ ची राज्यसभा निवडणूक : काँग्रेसचा अधिकृत उमेदवार पडला अन् शरद पवार आरोपांचे धनी झाले
Rajyasabha Election | Ram PradhanSarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya sabha Election) बिनविरोधची परंपरा २४ वर्षानंतर मोडीत निघत अखेर राज्यात निवडणूक लागली आहे. तीन जून दुपारी ३ पर्यंत कोणीही उमेदवारी मागे न घेतल्याने राज्यसभेची निवडणूक होत आहे. विधानसभेतील संख्याबळ आणि राज्यसभेच्या विजयाचा कोटा या दोन्हीचा ताळमेळ बसून सहाव्या जागेवरील उमेदवार विजयी होण्यासाठी भाजप (BJP) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) दोघांनाही अपक्ष आमदारांची मदत लागणार आहे. त्यामुळे आता घोडेबाजार होणार हे स्पष्ट आहे. (Rajya sabha Election latest update)

महाराष्ट्रात गाजलेली राज्यसभेची निवडणूक म्हणून १९९८ सालच्या निवडणुकीचा उल्लेख होतो. या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेले माजी केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांचा पराभव झाला होता. त्यामुळे तेव्हापासून सर्वच पक्षांनी आमदारांचा घोडेबाजार टाळण्यासाठी बिनविरोध निवडणुकीवर भर दिला होता. मात्र तब्बल २४ वर्षांनंतर निवडणूक लागल्यामुळे आता नेमके कोणाला पराभवाचे तोंड बघावे लागणार हे येत्या १० जून रोजी स्पष्ट होणार आहे. (Rajyasabha Election 1998)

Rajyasabha Election | Ram Pradhan
शिवसेनेकडून मोर्चेबांधणीस सुरुवात : महाआघाडी नेत्यांची वर्षावर बैठक; अपक्षांनाही निमंत्रण!

काय झाले होते १९९८ साली?

१९९८ साली राज्यसभेची महाराष्ट्रातील ६ जागांसाठी निवडणूक झाली होती. तेव्हाही एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी पहिल्या क्रमांकाच्या ४२ मतांचा कोटा होता. काँग्रेसचे त्यावेळी ८० आमदार होते. मात्र इतर पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसचा दुसरा उमेदवार सहज निवडून येवू शकणार होता. काँग्रेसकडून नजमा हेपतुल्ला आणि राम प्रधान यांना तिकीट देण्यात आले. (Rajyasabha Election 1998 Maharashtra)

तर शिवसेनेने प्रितीश नंदी आणि सतिश प्रधान यांना तिकीट दिले. भाजपकडून प्रमोद महाजन मैदानात होते. तर सुरेश कलमाडी आणि विजय दर्डा यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. सहा जागांसाठी सात उमेदवार मैदानात असल्याने एकाचा पराभव होणार हे निश्चित होते. काँग्रेसचे संख्याबळ पुरेसे असल्याने त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास होता. मात्र गुप्त मतदान पद्धती असल्याने मतफुटीचा धोका होता.

Rajyasabha Election | Ram Pradhan
राज्यसभेला सहावा उमेदवार शिवसेनेचा निवडून येणार! बाळासाहेब थोरातांनी सांगितलं गणित

अखेरीस भीती खरी ठरली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार राम प्रधान यांचा पराभव झाला. अपक्ष असलेले सुरेश कलमाडी आणि विजय दर्डा विजयी झाले. राम प्रधान यांनी एका पुस्तकात या सगळ्या निवडणुकीविषयी स्पष्ट लिहिले आहे. त्यांनी या पराभवाचे संपूर्ण खापर काँग्रेसचे तत्कालीन नेते शरद पवार यांच्यावर फोडले. शरद पवार यांनी अंतर्गत राजकारण करुन काँग्रेसच्या उमेदवाराला साथ न देता अपक्ष उमेदवाराला साथ दिली असा आरोप त्यांनी केला.

शिवाय या वादाला सोनिया गांधी विरुद्ध शरद पवार या संघर्षाचीही झालर होती. राम प्रधान हे गांधी कुटुंबियांच्या अतिशय जवळ होते. या विश्वासामुळेच पवार यांच्या मनात त्यांच्याबद्दल तेव्हा अढी होती. सुरेश कलमाडी हे तेव्हा काॅंग्रेसमध्ये नव्हते. काॅंग्रेसमधून बाहेर पडून त्यांनी पुणे विकास आघाडी स्थापन केली होती. त्यांना काॅंग्रेसच्या काही आमदारांनी मदत केली.

प्रधान यांच्या पराभवानंतर काँग्रेसच्या तत्कालिन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांचा राजीनामा घेतला, शिवाय १० आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली. यात दिलीप वळसे पाटील, शंकरराव जगताप, साहेबराव पराडकर, आर. आर. पाटील, किसनराव जाधव, संजय देवताळे, अशोक खाडकर, बाळासाहेब गोपेकर, खुशाल बोपचे, मारोतराव कावसे या सर्वांचा समावेश होता.

तसेच शरद पवार यांचे विश्वासू सहकारी खासदार प्रफुल्ल पटेल आणि नागपुरचे आमदार सतिश चतुर्वेदी यांनाही कारणे दाखवा नोटीस बजावली. चतुर्वेदी यांना या नोटीसीला उत्तर न दिल्यामुळे कालांतराने पक्षातून निलंबित देखील करण्यात आले. अर्थात पवार-सोनिया गांधी संघर्षाची ती सुरवात होती. त्यानंतर काही महिन्यांतच पवार यांना पक्षातून काढण्यात आले आणि त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापन केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in