गगन भरारीचे ‘ध्येय’ असणारे पंचाहत्तरीचे तरुण

अभिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील एक संवाद आहे. "हम जहाँ खडे होते है, लाईन वहा से शुरू होती है" हा संवाद भुजबळ साहेबांना तंतोतंत तो लागू होतो.
गगन भरारीचे ‘ध्येय’ असणारे पंचाहत्तरीचे तरुण
Chhagan Bhujbal, Leader NCPSarkarnama

दिलीप खैरे

नाव : छगन चंद्रकांत भुजबळ, जन्मभूमी : नाशिक, कर्मभूमी : मुंबई, काम: एखाद्या ध्येयाने प्रेरित होऊन ते काम शेवटास नेणे आणि त्याच्या ध्येयपुर्तीचा आनंद घेणे.... अभिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील एक संवाद आहे. "हम जहाँ खडे होते है, लाईन वहा से शुरू होती है" हा संवाद भुजबळ साहेबांना तंतोतंत तो लागू होतो.

शिवसेनेत असतांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, काँग्रेसमध्ये असतांना सोनिया गांधी आणि आता राष्ट्रवादीत शरद पवार या तिघा प्रमुख नेत्यांच्या यादीत साहेब क्रमांक एक वरच राहिले आहेत. त्यासाठी परिश्रम आणि निष्ठा यावर साहेबांनी भर दिला. संकटे येतात- जातात, येतांना आणि जातांनाही ही संकटे गरीब-श्रीमंत, सर्वसामान्य असा भेदभाव करत नाहीत. पण संकटांशी 'झुंज' द्यावीच लागते. त्यातून ताऊन सुलाखून निघाल्यावरच तुम्ही 'सर्वमान्य' होतात आणि प्रत्येकाच्या हृदयावर राज्य करतात. साहेब आजही का हवेहवेसे वाटतात, आपलेसे वाटतात त्याचं हे कारण आहे. साहेबांनी हीच शिकवण आम्हा कार्यकर्त्यांना वेळोवेळी दिली आणि म्हणूनच जगण्याची नवी 'उमेद' आम्हाला मिळाली.

"इतिहास गवाह है की, जिसकी बराबरी नही की जा सकती,

उसकी बदनामी शुरू कर दी जाती है"....

हा शेर साहेबांना तंतोतत लागू होतो, कारण भुजबळांनी राजकारण, समाजकारण एका ध्येयाने प्रेरित होऊन केले. कोण काय म्हणेल? यापेक्षा स्वतःला काय योग्य वाटते, त्यानुसार त्यांनी निर्णय घेतला. योग्य ठिकाणी साहेब 'शेरास सव्वाशेर' झालेही पण ते विधायक कामांसाठी.

Sharad Pawar & Chhagan Bhujbal
Sharad Pawar & Chhagan BhujbalSarkarnama

'जननेता' असलेल्या नेत्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तसा तो साहेबांनाही करावा लागला, काही हाती लागत नाही म्हंटल्यावर येन केन प्रकारेन त्यांच्या बदनामीची मोहीम हाती घेतली गेली, त्यांना झुकविण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यासाठी 'कथानक' लिहीले गेले. पण ते बधले नाहीत. कारण आपण जे करतो आहोत, प्रामाणिकपणे जनतेच्या हितासाठी करतो आहोत, याचे भान त्यांना होते.

व. पु. काळे यांचे फार सुंदर शब्द आहेत, व. पु. म्हणतात "कबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही पण गगनभरारीच वेड रक्तातच असाव लागतं, कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही." नाशिकमध्ये जन्म झाल्यानंतर मुंबईत बालपण तरुणपण आणि संपूर्ण आयुष्य गेलेल्या भुजबळांना मुंबईतील पंचतारांकित जनजीवन, गगनचुंबी इमारती यांचे आकर्षण कधीच वाटले नाही. आजूबाजूला समाजातील सर्वसामान्य घटकाने साहेबांना आकर्षित केले. याच समाजाचे आपण देणे लागतो, समाजाशी आपली बांधिलकी आहे, त्यांना किमान सर्वसामान्य आयुष्य जगता यावे, यासाठी आधी समाजकारण आणि मग राजकारण करतांना भुजबळ यांनी हे भान कायम ठेवले. खरे तर या समाजामुळेच त्यांच्या रक्तातच असलेल्या 'गगनभरारी'ला शक्ती मिळाली, आणि त्यांनी आकाशाकडे कूच केली.

Chhagan Bhujbal, Leader NCP
Chhagan Bhujbal, Leader NCPSarkarnama

या सर्वसामान्यांच्या आशिर्वादामुळेच संकटेच नव्हे, तर संकटांच्या आलेल्या 'लाटा' त्यांनी थोपवूनच धरल्या नाहीत, तर परतवून लावल्यात. आजही अनेक जण विविध समस्या घेऊन येतात. त्या समस्यांचे ते त्वरेने निराकारण करतात. श्री. भुजबळांनी पिडीत, शोषित जनतेच्या न्यायासाठी, हक्कासाठी लढा तर दिलाच, पण मंत्रीपदाचा उपयोगही त्यांच्यासाठी होईल, याची ममत्वाने काळजी घेतली.

Chhagan Bhujbal & Dilip Khaire
Chhagan Bhujbal & Dilip KhaireSarkarnama

ते कर्तव्य कठोर आहेत, कुटुंबवत्सल आहेत, आणि हळवेही आहेत. नानींनीच एका मुलाखतीत सांगितल्यानुसार साहेबांची कन्या दुर्गाताई लहानपणी ट्रिपला जाणार होत्या. त्या ज्या दिवशी ट्रिपला जाणार होत्या. त्याच दिवशी साहेब परदेशातून येणार होते, दोघांची थोडक्यात चुकामुक झाली तर साहेब थेट रेल्वे स्टेशनवर गेले आणि काही सेकंदासाठी का होईना त्यांनी दुर्गाताईंची भेट घेतली. कर्तव्य कठोर, कुटुंबवत्सल असतानांच साहेबांभोवती कार्यकर्त्यांचे मोठे मोहोळ तयार झाले. मुंबई, नाशिक, येवला आणि राज्यातील सर्वच ठिकाणी अनेक कार्यकर्ते त्यांनी घडविले, आपला कार्यकर्ता हा आपल्या कुटुंबाचा हिस्साच आहे. त्याच्या सुखदुःखात सहभागी झालेच पाहिजे, ही भावना त्यांची कायमच राहिली आहे. कार्यकर्त्यांचे मोहोळ, संघटन तयार करतांना त्यांनी कार्यकर्त्यांना 'पैलू' ही पाडले. अशा 'पैलू' पाडून घडलेल्या कार्यकर्त्यांपैकी मी एक छोटा कार्यकर्ता आहे. नुकतेच माझ्या वर एक छोटीशी शस्त्रक्रिया झाली. त्यांना त्याची माहिती मिळताच त्यांचा फोन आला त्यांनी सविस्तर माहिती घेतली आणि वैद्यक क्षेत्रातील प्रगती आणि अन्य बाबींवर मनसोक्त चर्चा केली. कार्यकर्त्यालाही आपल्या 'देवतुल्य' नेत्याकडून आणखी काम हवे असते? फक्त नेत्याचे प्रेम हवे असते आणि ते देखील माझ्यासह सर्वांनाच असे प्रेम भरभरून देत असतात.

"धन्य तेची प्राणी क्षमा ज्यांचे अंगी, न भंगे प्रसंगी धैर्यबळ

न म्हणे कोणासी उत्तम वाईट, महत्व वरिष्ठ नसे जेथे."

संत तुकोबांनी हा अभंग अनेक वर्षांपूर्वी लिहून ठेवला. पण छगन भुजबळांचे वर्तन अगदी या अभंगाला साजेसेच राहिले आहे. त्यांच्यामध्ये धैर्य होते, म्हणूनच त्यांनी आपल्याला संकटांत ढकलणाऱ्या अनेकांना माफ केले. कुणाकडून चुका झाल्या असतील पण त्याला चांगले- वाईट म्हणण्याचा अधिकार आपल्याला नाही. कारण मोठेपणाचे भान मीच ठेवले पाहिजे. ही जाणीव त्यांनी ठेवली आणि हेच विचार आम्हा कार्यकर्त्यात भिनवले, म्हणूनच ते म्हणतात माझ्यावर टीका होत असेल, निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला असेल, पण माझ्या अंगी कुणाबद्दल कटूता नाही आणि ते खरेच आहे.

Chhagan BHujbal, Leader NCP
Chhagan BHujbal, Leader NCPSarkarnama

समुद्र किनारी वाढलेल्या भुजबळांनी अनेक झंजावात, वादळांचा सामना केला. ते कधी डगमगले नाहीत. मात्र त्यांच्या अंर्तमनात कायमच एक वादळ घोंघावत असते. वस्तुत: शांत संयमी वाटणाऱ्या त्यांच्या मनात घोंघावणारे वादळ एखादी अप्रिय चुकीची घटना घडली की, मग बाहेर येते. या वादळापासून वाचणे मुश्कील होऊन जाते. कारण त्यांना चुकीचे काम आणि वर्तन अजिबात आवडत नाहीत. याचा अनुभव आम्हा प्रत्येकाला वेळोवेळी आला आहे.

माझा आणि त्यांचा तीस वर्षाचा ऋणानुबंध आहे. त्यांचा परिसस्पर्श झाला आणि सर्वसामान्य दिलीपला जणू राजमान्यताच मिळाली. साहेबांच्या आशिर्वादाने अनेक पदे भूषविता आली. विविध कार्यक्रमांच नेटकं आयोजन कसं करावं हे शिकता आल. कुठलाही कार्यक्रम भव्य-दिव्यच असावा. पण त्यात भडकपणा नसावा ही शिकवण त्यांच्याकडूनच मिळाली. साहेबांचे संपूर्ण कुटुंब, समीरभाऊ, पंकजभाऊ यांनी भावासारखी माया लावली. संकटात धीर दिला. कोणतेही संकट आले की, 'हार मानू नको' हे साहेबांचे शब्द हजार हत्तींचे बळ देऊन जातात. साहेब तुम्ही आहात म्हणून माझे अस्तित्व आहे. शेवटी इतकच म्हणेन,

"इतकं दिलत,

इतकं दिलत,

इतकं दिलत साहेब तुम्ही मला |

खरं सांगतो,

माणूस केलंत साहेब तुम्ही मला |

...

Related Stories

No stories found.