कोणता झेंडा घेवू हाती? उत्पल पर्रीकर सापडले धर्मसंकटात...

Goa election 2022 : भाजपकडून उत्पल पर्रीकर यांना तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट
Goa Politics
Goa Politics Sarkarnama

पणजी : गोवा विधानसभा निवडणूक (Goa election 2022) महाराष्ट्रात दोन कारणांनी जास्त चर्चेत आहे. एक म्हणजे भाजपचे प्रभारी म्हणून महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) आणि विरोधी पक्षातील शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) या दोघांमध्ये रोज सुरु असलेले आरोप-प्रत्यारोप आणि दुसरे कारण आहे ते मनोहर पर्रीकरांचा मुलगा उत्पल्ल पर्रीकर (Utpal Parrikar). पणजी विधानसभा मतदार संघातून उत्पल पर्रीकर यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण भाजप त्यांना तिकीट देण्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच उत्पल पर्रीकर आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.

मात्र यापूर्वी गोवा भाजपमध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी पर्रीकर यांच्याशी फोनवर बोलून त्यांना तिकीट मिळणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच उत्पल पर्रीकर यांनी गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची दोन वेळा भेट घेतली होती. मात्र यात शहा यांनी पर्रीकर यांची तिकीट न देण्याबाबतची कारण सांगत समजूत काढली आहे. गोव्याचे प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही उत्पल यांनी आधी पक्षाचे काम करावे, नेत्याचा मुलगा आहे म्हणून तिकीट देणे ही भाजपची परंपरा नाही, असे स्पष्ट केले आहे.

Goa Politics
करोडोंचा गंडा घालणारा विशाल फटे 'बिग बुल' बनून आला पोलिसांसमोर!

यासोबतच काल एका पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल निवडणुकीत पडल्यास दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांच्या प्रतिमेला धक्का पोहचण्याची भीती आहे. त्यामुळे त्याच्याबाबत आपल्याला सहानुभूती वाटत आहे, म्हणून आम्ही त्यांना मागे घेतले असल्याचे सांगितले. तर अंतर्गत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने देखील पणजीमधून एकमेव नाव पाठवले आहे ते 'बाबूश मोन्सेरात' यांचेच. त्यामुळे आता उत्पल पर्रीकर यांना भाजपने होल्डवर ठेवले नसून त्यांना तिकिट मिळणारच नाही या गोष्टीची केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे, हे स्पष्ट आहे.

उत्पल पर्रीकर यांच्यापुढे काँग्रेसचा पर्याय आहे का?

काँग्रेसच्या नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत संजय राऊत यांच्या "उत्पल पर्रीकर अपक्ष उभे राहिल्यास यांच्या विरोधात कोणत्याही पक्षाने उमेदवार देवू नये आणि सर्वपक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा" या प्रस्तावावर चर्चा झाली. मात्र या प्रस्तावाबाबत अनेक काँग्रेस नेत्यांचा नकारात्मक सूर पाहायला मिळाला. ज्या पर्रीकरांनी गोव्यात काँग्रेस संपवण्यासाठी प्रयत्न केले, आज त्यांच्या मुलाला पाठिंबा का द्यायचा? आणि पाठिंबा देवून ते निवडून आल्यानंतर पर्रीकर भाजपला पाठिंबा देणार नाहीत कशावरून? त्यामुळे पर्रीकर यांच्यासाठी काँग्रेसची तर दार बंद आहेत.

Goa Politics
गोव्यात शिजतेय वेगळीच खिचडी! संजय राऊतांनीच केलं उघड...

उत्पल पर्रीकर 'शिवसेना-आम आदमी पक्षांच्या' ऑफरबाबत विचार करतील का?

एका बाजूला भाजप उत्पल यांना नाराज केल्यानंतर शिवसेना, आम आदमी पक्ष यांनी उत्पल पर्रीकर यांच्यासाठी पायघड्या अंथरल्या आहेत. संजय राऊत यांनी तर पर्रीकर भाजपच्या विरोधात उभे राहिल्यास त्यांना शिवसेना लागेल ती सर्व मदत करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. तर आम आदमी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि पणजी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार वाल्मिकी नाईक यांनी पर्रीकर आम आदमी पक्षात आल्यास त्यांच्यासाठी आपण उमेदवारी सोडू असे स्पष्ट केले आहे.

मात्र गोव्यातील 'गोमन्तक' या वृत्तपत्राचे संपादक राजू नायक यांनी या पर्रीकर या दोन पक्षाची उमेदवारी घेतील असे वाटत नसल्याचे 'सरकारनामा' सोबत बोलताना सांगितले. कारण जर ते आम आदमीमध्ये गेल्यास त्यांचे पर्रीकरांचे फारसे अस्तित्व उरणार नाही. तर संजय राऊत पर्रीकरांना शिवसेनेकडून ऑफर देत असले तरी शिवसेनेची पणजी मतदारसंघात १०० देखील मत नाहीत हे उत्पल पर्रीकर जाणून आहेत. त्यामुळे ते या दोन्ही प्रस्तावाचा विचार करणार नाहीत, असे मत देखील नायक यांनी व्यक्त करतात.

पर्रीकर अपक्ष उभे राहणार का?

आता राहिला प्रश्न उत्पल यांनी निवडणुकीत अपक्ष उभे राहण्याचा. पण उत्पल यांची पणजीत वैयक्तिक ताकद नसल्याचे निरीक्षणही राजू नायक नोंदवतात. मनोहर पर्रीकर यांनी त्यांना सातत्याने राजकारणापासून लांब ठेवले. मात्र जर ते अपक्ष उभे राहिले आणि त्यांना शिवसेनेने पाठिंबा दिला तरी त्यांच्या विरोधात काँग्रेस आणि भाजपचे उमेदवारांचे आव्हान असेल.

त्यातही बाबूश मोन्सेरात यांची चांगली ताकद असून पणजीमध्ये ते स्वतः आमदार आहेत. पणजी महापालिकेचा महापौर त्यांच्याच गटाच आहे. मोन्सेरात यांच्या पत्नी देखील सावंत सरकारमध्ये मंत्री आहेत. त्या तुलनेत पर्रीकर यांचा दावा मागे पडतो. एकूणच या सगळ्या परिस्थितीमुळे उत्पल यांच्यापुढे कोणता झेंडा घेवू हाती? या प्रश्नाचे धर्मसंकट आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com