vishal patil role in sangli corporation election | Sarkarnama

#SangliResult विशाल पाटील धाडसाने सांगत होते, ते कॉंग्रेस पक्षाला ऐकू गेले नाही! 

विष्णू मोहिते 
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

कॉंग्रेसचे नेते मदन पाटील व पतंगराव कदम यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली होती. त्यामुळेच अशोक चव्हाण यांनी हर्षवर्धन पाटील यांच्याकडे कोअर समितीचे प्रमुखपद देऊन इथल्या नेतृत्वाला गती द्यायचा प्रयत्न केला. मात्र हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, विश्‍वजित कदम यांनी प्रयत्न केले पण ते पक्षासाठी अपुरे पडले. 

सांगली : दीर्घकाळच्या सत्तेतील नाराजी. भ्रष्ट कारभाराकडे नेत्यांनी केलेले दुर्लक्ष, भ्रष्ट चेहऱ्यांनाच पुन्हा दिलेली उमेदवारी, राष्ट्रवादीबरोबर मैत्रीपूर्ण लढतीचा शेवटच्या क्षणी स्वीकारलेला पर्याय, मदन पाटील यांच्यासारख्या मुरब्बी नेतृत्वाची कमतरता, नेत्यांची चार दिशाला चार तोंडे, भाजपच्या तोडीस तोड रसद पुरवण्यात अपयश अशी कॉंग्रेसच्या पराभवाची कारणे सांगता येतील. 

महापालिकेत कॉंग्रेसचे सत्ताबळ निम्म्याहून अधिक घटले. विद्यमान सभागृहात सहयोगीसह कॉंग्रेसचे 45 इतके संख्याबळ आहे. ते आता 20 जागांवर आले. कॉंग्रेसने राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून 35 जागा जिंकून थोडी फार पत राखली हीच काय ती कमाई. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील आघाडीच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील यांना सातत्याने लक्ष्य करणाऱ्या विशाल पाटील यांनी महापालिका निवडणुकीत आपल्या प्रभागात सर्व चार जागा जिंकल्या. शिवाय कुपवाडमधून वहिदा नायकवडी आणि प्रभाग एकमधून त्यांचे समर्थक विजय घाडगे, गजानन मगदूम यांना या योग्यवेळी रसद देत त्यांनी "आपल्या' जागा राखल्या. 

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका समोर ठेवून विशाल पाटील यांनी गेली दोन वर्षे कंबर कसली आहे. महापालिकेत त्यांनी मदन पाटील गटाला खिंडार पाडताना शेखर माने यांच्या मदतीने उपमहापौर गटाची स्थापना केली, होती पण आता मानेही शिवसेनेत गेले आहेत. कॉंग्रेसच्या सत्तेतील भ्रष्ट चेहरे बाजूला करा, लोक कारभारावर नाराज आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी द्या तर लोक आपल्याला स्वीकारतील, असे त्यांनी जाहीरपणे मांडण्याचे धाडस केले. जयंत पाटील हे समविचारी कसे असेही भाष्य त्यांनी केले होते. 

कॉंग्रेसच्या यादीत त्यांनी फारसा रस दाखवला नाही. मात्र शहरातील काही अपक्षांना त्याची रसद असल्याची चर्चा होती. माजी आमदार संभाजी पवार यांच्या गटाशी त्यांचे गेल्या दोन वर्षांत चांगले सख्य जुळले आहे. शिवसेनेतून पवारांची फारकतही त्यांच्या या चालीचा भाग असल्याची चर्चा आहे. कदम घराण्याशी जमत नाही आणि जयंत पाटील कॉंग्रेसचे शत्रू असे त्यांची भूमिका कायम असल्याने आघाडीनेही त्यांना बाजूला ठेवले होते. एकूणच कॉंग्रेस एकसंघ नसणे हे देखील पराभवाच्या अनेक कारणापैकी एक कारण आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख