संजयकाका यांची खंजीर खुपसण्याची प्रवृत्ती यापूर्वी दिसली होती : विशाल पाटील

संजयकाका यांची खंजीर खुपसण्याची प्रवृत्ती यापूर्वी दिसली होती : विशाल पाटील

सांगली : खासदार संजयकाका यांची खंजीर खुपसण्याची त्यांची प्रवृत्ती आम्हाला अनेक लोकसभांमध्ये दिसली होती. आताही स्वत: खासदार असताना पत्नीला आमदार करण्याची त्यांची इच्छा आहे. माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना आमदारकीला मदत करण्याचा शब्द त्यांनी दिला होता. त्याचवेळी आपण घोरपडे यांना पूर्वसूचना दिली होती. आता तो प्रत्यय त्यांना येत आहे अशी घणाघाती टीका कॉंग्रेसचे सांगलीतील युवा नेते विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. ते पुढे म्हणाले, वसंतदादा घराण्यात जन्माला आलो ही भाग्याची गोष्ट आहे. ज्या घरात जन्मलो, तोच वारसा सांगतो आहे. संजयकाका देखील एका घराण्यातूनच आलेले आहेत. 

प्रदेश कार्याध्यक्षांना विचारा 
पश्‍चिम महाराष्ट्रातील हर्षवर्धन पाटील, जयकुमार गोरे, आनंदराव पाटील असे नेते भाजपमध्ये गेले आहेत. तर प्रकाश आवाडे, सदाशिव पाटील यासारख्या मंडळींनी पक्ष सोडला आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात कॉंग्रेसची वाताहात होत असताना वसंतदादांचे वारसदार गप्प कसे? असा प्रश्न विचारताच विशाल पाटील म्हणाले, "पश्‍चिम महाराष्ट्राची जबाबदारी कॉंग्रेसने प्रदेश कार्याध्यक्ष आमदार विश्‍वजित कदम यांच्याकडे दिली आहे. त्याबद्दल त्यांनाच विचारा.' 

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात महापुराने थैमान घातले. कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष म्हणून खोऱ्याच्या पाण्याचे पुरात काय नियोजन केले? खासदार म्हणून केंद्राकडे संजय पाटील यांनी कोणत्या मदतीची मागणी केली? असे सवाल त्यांनी यावेळी संजयकाकांना केले. पत्रकार परिषदेत ते म्हणाले, जर ते स्वत:च्या पत्नीला विधानसभेची उमेदवारी मागतात, ज्यांचे संपूर्ण राजकारण घराणेशाहीवर अवलंबून आहे, असे असताना त्यांच्याकडूनही आमच्यावर होणारा घराणेशाहीचा आरोप हा मोठा विनोद आहे, अशी खिल्लीही त्यांनी उडवली आहे. 

सांगली कोल्हापूरमध्ये आलेल्या महापुराबद्दल ते म्हणाले, कोयनेतून सोडलेला विसर्ग व अलमट्टीशी नसलेले नियोजन, मोठा पाऊस यामुळे सांगली जिल्ह्याला पुराचा फटका बसला. 2005-06 मध्ये माजी मंत्री प्रतीक पाटील यांनी केंद्रीय जलआयोगाची बैठक घेऊन महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या. त्यानुसार पाणी सोडण्याचे वेळापत्रक केले होते. कृष्णा खोऱ्याच्या एका अधिकाऱ्याने पाणी पातळी 55 फुटांपर्यंत जाईल, असे सांगितले होते. म्हणजे कृष्णा खोऱ्याच्या उपाध्यक्षांना ते माहिती असणार; मग सांगलीच्या जनतेला खासदारांनी कल्पना का दिली नाही? पूर आल्यानंतर जनतेच्या मदतीला ते किती वेळा धावले? मदत मिळवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले? इतर खासदारांशी संपर्क साधून मदत वाढवली का? पंतप्रधानांना भेटून विशेष पॅकेज मागितले का? असे सवालही विशाल पाटील यांनी संजय पाटील यांना विचारले आहेत. जिल्हा प्रशासन पुराच्या काळात कमी पडले. खासदारांनी जिल्हा प्रशासन, महापालिका, पाटबंधारे विभाग यांच्यातील समन्वयासाठी भूमिका बजावली असती तर चित्र वेगळे दिसले असते, असा आरोपही त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com