मतदारसंघाच्या विकासासाठी ब्ल्यूप्रिंट तयार - विशाल कदम

मतदारसंघाच्या विकासासाठी ब्ल्यूप्रिंट तयार - विशाल कदम

पूर्णा : मतदारसंघाच्या विकासाची ब्लूप्रिंट तयार आहे. समाजसेवेचा वसा व वारसा घेत मला काम करायचे आहे. तुम्ही फक्त धनदांडग्यांच्या प्रलोभनांना बळी न पडता मला मतदान करून सेवा करण्याची संधी द्या. तिन्ही तालुक्‍याचा चेहरामोहरा बदलून दाखवतो अशी ग्वाही गंगाखेड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विशाल कदम यांनी मतदारांना दिली. 

स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतरही या मतदारसंघात अजूनही अनेक गावाना रस्ता नाही, वीज व पाण्याची समस्या सतावत आहे. अनेक मुलभुत प्रश्र कायम आहेत त्यामुळे विकास कोसो दूर राहिला आहे. फक्त " धनशक्ती'च्या जोरावर निवडून येणारांनी आश्वासनांची खैरात करून निवडून आले. मतदार संघातील अडचणी, मतदारांची कामे याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. असे चेहरे ओळखा यावेळी ही चूक करू नका. स्वाभिमानाने महायुतीला मतदान करा. रखडलेले सगळे प्रश्न सोडविण्याचे व तुमच्या सेवेत चोवीस तास राहण्याचे मी अभिवचन देतो असा दावा कदम यांनी केला. 

ते पुढे म्हणाले, मला आमदारकी मिरवण्यासाठी नाही तर तुमचे ओझे हलके करण्यासाठी हवीय. सिंचन प्रश्न ऐरणीवर आहे जनतेने माझ्यावर विश्वास टाकल्यास मी हे प्रश्‍न प्रामुख्याने हाताळणार आहे. मतदारसंघात हरितक्रांती करण्यासाठी तिन्ही तालुक्‍यातील नद्या व उपनद्यावर लहानमोठे बंधारे बांधू. मासोळी धरणाची उंची वाढविणे व विष्णूपुरी, डिग्रस, अंतेश्वर या बंधाऱ्यातील पाण्याचे न्याय वाटप करण्यासाठी प्रयत्न करणार. 

मासोळी प्रकल्पाची उंची कमी असल्याने त्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठा होत नाही. या धरणाची उंची वाढवू. त्याचा फायदा सिंचन व पाणीपुरवठा योजनेसाठी होइल. अनेक बंधाऱ्याचे पाणी पुढील जिल्ह्यास दिले जाते त्याचे न्याय वाटप करू. तीर्थक्षेत्र व अन्य योजनेतून विविध धर्मीयांच्या धार्मिक स्थळांचा विकास करू व पर्यटनाला चालना देवू. तत्पर व उत्तम आरोग्य सेवा पुरवू. ग्रामीण भागातील शिक्षण व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा दर्जा सुधारण्यासाठी शेतीपूरक व्यवसायाला चालना देवू. महिला सक्षमीकरणासाठी लघू उद्योग व प्रशिक्षण केंद्र उभारू. खेळाडूसाठी तालुक्‍याच्या ठिकाणी भव्य क्रिडांगण व दळवळणासाठी गंगाखेड, पूर्णा, पालम येथे भव्य बसस्थानक उभारण्यात येईल. असे अभिवचन विशाल कदम यांनी दिले. 

या मतदारसंघात मागील काही निवडणूकापासून लक्ष्मीअस्त्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय त्यामुळे जनतेचे व विकासाचे प्रश्न तसेच प्रलंबित राहतात.त्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी महायुतीला या निवडणुकीत विजयी करुन आपल्या भागातील विकास घडवून आणा असे आवाहन श्री.कदम यांनी केले.मतदार संघात विकास कसा असतो हे दाखवून देवू. विविध विकास योजना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी महायुती कटिबध्द असून गेल्या पाच वर्षात विविध जनकल्याणकारी योजना राबविण्यात आल्यानेच आज महायुतीचा प्रभाव वाढला व जनाधार वाढला असे ते म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात गेल्या पाच वर्षात सर्वच क्षेत्रात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास झाला आहे. विकास योजना सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी महायुती कटीबध्द आहे. काश्‍मीर मधील 370 कलम हटविले. त्यामुळे आतंकवाद, नक्षलवाद नियंत्रणात आला.भविष्यात देशातून आतंकवाद, नक्षलवाद समुळ नष्ट होइल. जगात बलशाली राष्ट्र अशी भारताची ओळख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विकासाच्या उंचीवर नेऊन ठेवलाय त्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी आम्ही काम करू. सामान्य जनतेच्या समस्येचे निराकरण करणारा आमदार हवा असेल माझ्या सारख्या जनतेशी बांधील असणाऱ्या व शेतकरी कुटुंबातील उमेदवाराला विजयी करा व शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्याना शक्तीना धडा शिकवा असे त्यांनी आवाहन केले. 

शिवसेनेच्या वचननाम्याबाबतीत बोलताना उमेदवार विशाल कदम म्हणाले, वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण हीच मूलभूत भूमिका आहे. शिवसेना राज्यातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींचे महाविद्यालयीन शिक्षण विनामूल्य करणार आहे. सर्व विद्यार्थ्यासाठी गाव ते शाळा विशेष बससेवा सुरू करणार, पंधरा लाख पदवीधर युवाना शिष्यवृत्ती देणार, घरगुती वीज दर तीस टक्‍क्‍याने कमी करणार, सर्व जिल्ह्यात एका वैद्यकीय महाविद्यालयासह सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारून केवळ एक रुपयात आरोग्य तपासणी करणार आहे. राज्यात एक हजार ठिकाणी दहा रुपयात सकस जेवणाची केंद्र उभारण्यात येणार आहेत. निराधारांचे मानधन दुप्पट करणार, राज्यातील सर्व गावामधील धार्मिक स्थळांचे महत्व लक्षात घेवून त्यांना दुरुस्ती व देखभालीसाठी अनुदान देण्याची पक्षाची भूमिका आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com