राज ठाकरेंना विनंतीपत्र पाठवले, मात्र त्यांचे उत्तर आले नाही!

आमची सर्व पक्ष, नेत्यांना विनंती आहे की राजमुद्रेचा वापर करू नका. राज्यात अनेकदा पक्षातील वादात ध्वज जाळणे, पायदळी तुडवणे असे प्रकार झाले आहेत.
vinod patil
vinod patil

औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या झेंड्यात बदल करत भगव्या रंगासह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचाही समावेश केला आहे. पण मराठा संघटनांनी झेंड्यातील राजमुद्रेच्या वापरावर आक्षेप घेत थेट न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. आर. आर. पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील यांनी मनसेला कायदेशीर लढाई लढण्याचा इशारा देत राजमुद्रेचा झेंड्यात वापर करण्यास विरोध दर्शवला आहे.

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस एकत्रित येऊन महाविकास आघाडी उदयास आली, आणि सर्वाधिक आमदार निवडूण आलेली भाजप सत्तेबाहेर फेकली गेली. शिवसेनेने हिंदुत्व सोडले अशी टिका होत असतांनाच मनसेने नेमका हाच मुद्दा हेरत आपल्या ध्येय धोरणांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

अगदी झेंड्यांचा रंग भगवा करत त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा देखील घेण्यात आली आहे. गुरुवारी (ता.23) रोजी मुंबईत होणाऱ्या मनसेच्या महाअधिवेशनात या नव्या झेंड्याला मान्यता दिली जाणार आहे. मनसेने नव्या झेंड्याला मान्यता मिळावी यासाठी निवडणुक आयोगाकडे तो पाठवला आहे.

भगवा झेंडा, त्यावर मनसेचे निवडणूक चिन्ह इंजिन, आणि दुसऱ्या संपुर्ण भगव्या झेंड्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा असलेले असे दोन झेंडे तयार करण्यात आले आहेत. यापैकी निवडणूक आयोगाकडून एका झेंड्याला मान्यता दिली जाणार आहे.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा झेंड्यात वापरण्यावर आक्षेप नोंदवण्यात येत आहेत. यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्‍यता असून मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा लढणारे विनोद पाटील यांनी देखील या विरोधात भूमिका घेतली आहे. मनसेच्या झेंड्यात राजमुद्रेचा वापर झाला तर आपण न्यायालयात कायदेशीर लढाई देणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

तत्पूर्वी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला यासंदर्भात विनंती करणारे पत्र देण्यात येणार आहे. या पत्रात राजमुद्रेचा वापर कोणीही करू नये, कोणीही शिवरायांच्या राजमुद्रेचा वापर टाळावा यासाठी सरकारने ठोस भूमिका जाहीर करावी, अशी मागणी करण्यात येणार आहे.

शिवाय राज्य आणि केंद्र सरकारने शिवरायांच्या राजमुद्रेचा अवमान कधीही होऊ नये, कोणी करू नये म्हणून राजमुद्रेचा समावेश "राष्ट्रीय अवमान प्रतिबंध कायदा- 1971' मध्ये करावा अशी मागणी करण्यात येणार आहे. 

आज संध्याकाळपर्यंत याबाबतचे पत्र पाठवण्यात येणार आहे. राजमुद्रा हे छत्रपती शिवाजी महाजारांचे प्रतीक आहे. त्यामुळे कोणीही शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा वापर राजकारणासाठी करू नये, अशी विनोद पाटील यांनी मागणी केली आहे.

आठवडाभरापूर्वी विनोद पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना विनंती पत्रही पाठवले होते. मात्र त्याचे काहीही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आता टप्प्याटप्प्याने न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार विनोद पाटील यांनी केला आहे.

उद्या जर मनसेने झेंड्यामध्ये राजमुद्रेचा वापर केला आणि अशी काही दुर्दैवी घटना घडली तर शिवप्रेमींचा राग अनावर होईल, तरुणांची माथी भडकतील, त्यामुळे उद्याचा धोका-वाद टाळण्यासाठी राजमुद्रेचा वापर टाळावा, अशी आमची विनंती आहे.

अनेकदा निवडणुकीच्या काळात कोणत्याही पक्षाचा ध्वज लागला की महापालिका, नगरपालिकाचे अधिकारी-कर्मचारी ते झेंडे गोळा करून डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकतात, पायदळी तुडवतात, मग तो अवमान सहन करायचा का?, हे आपण ठरवले पाहिजे' असा प्रश्‍नही विनोद पाटील यांनी उपस्थित केला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com