आदित्य ठाकरेंकडून विनोद पाटलांना सोबत येण्याची ऑफर

 आदित्य ठाकरेंकडून विनोद पाटलांना सोबत येण्याची ऑफर

औरंगाबाद : मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी "आमच्या सोबत या' असे म्हणत शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याची जारेदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तिसऱ्या टप्यातील जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने औरंगाबाद दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकामंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विनोद पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी झालेल्या पाऊण तास चर्चेत आदित्य ठाकरे यांनी " तरुणांसाठी काम करायचे असेल, तर असे बाहेर राहून किती दिवस चालेल, आमच्या सोबत या, एकत्रित काम करू ' असे आवाहन केल्याची माहिती आहे. 

मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देणारे युवा याचिकाकर्ते विनोद पाटील यांना शिवसेनेत घेण्याच्या जोरदार हालचाली वरिष्ठ पातळीवरून सुरू आहेत. पक्षातील वजनदार मंत्री एकनाथ शिंदे यांची यात महत्वाची भूमिका आहे. मराठा आरक्षणा संदर्भातील मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवत या विरोधातील याचिका फेटाळल्यानंतर सर्वप्रथम विनोद पाटील मातोश्रीवर गेले होते. तेव्हापासूनच विनोद पाटील शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. परंतु मराठा आरक्षणाला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी पाठिंबा दर्शवल्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आपण गेलो होतो असे सांगत विनोद पाटील यांनी वेळ मारून नेली होती. 

त्यानंतर औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेकडून विनोद पाटील यांना मैदानात उतरवण्याची जोरदार तयारी झाली होती. परंतु युतीने आपणास पुरस्कृत करावे अशी मागणी पाटील यांनी केल्याने हा प्रयत्न फसल्याची चर्चा त्यावेळी झाली. यावर देखील विनोद पाटील यांनी मराठा आरक्षणाचा सुप्रीम कोर्टात जोपर्यंत अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत आपण कुठल्याही राजकीय पक्षात जाणार नाही, किंवा निवडणूक लढवणार नाही असे प्रसिध्दीपत्रक काढून स्पष्ट केले होते. 

मराठा नेतृत्व म्हणून शिवसेनेची पसंती 
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर.पाटील यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असलेले विनोद पाटील यांनी यापूर्वी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक देखील लढवलेली आहे. पण त्यावेळी त्यांना अपयश आले. आर.आर. पाटलांच्या निधनानंतर ते राष्ट्रवादीपासून अलिप्त झाले. आर. आर. पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक काम करत असतांनाच त्यांना मराठा आरक्षणासाठीचा न्यायलयीन लढा देखील सुरू ठेवला होता. मराठा समाजाची एकजूट आणि न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडल्यामुळे हा प्रश्‍न बऱ्याच अंशी सुटला आहे. 

विनोद पाटील यांची यात महत्वाची भूमिका समजली जाते. त्यामुळे त्यांना समाजाचा मोठा पाठिंबा असल्याचे बोलले जाते. मराठा तरूण नेतृत्व म्हणून शिवसेनेने विनोद पाटील यांनी आपल्या पक्षात घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीदरम्यान, शहरात आलेल्या एकनाथ शिंदे यांनी पुन्हा विनोद पाटील यांची त्यांच्या निवसास्थानी जाऊन भेट घेतली होती. शिंदे यांचे ते नातेवाईक असल्याची देखील चर्चा आहे. आज आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी विनोद पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याने पुन्हा त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. या तिघांमध्ये सुमारे पाऊण तास चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेली ही भेट पाहता विनोद पाटील लवकरच हाती शिवबंधन बांधण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

सदिच्छा भेट... 
या भेटी संदर्भात सरकारनामा प्रतिनिधीने विनोद पाटील यांच्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ही सदिच्छा भेट होती. आदित्य ठाकरे हे तरुणांचे नेते म्हणून ओळखले जातात. प्राथमिक ते उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात ते महाराष्ट्रातील तरुणांसाठी काम करत आहेत. मी देखील शिक्षणाच्या क्षेत्रात काम करतो. त्यामुळे आजच्या बैठकीत तरुणांना केंद्रबिंदू ठेवून त्यांच्यासाठी भविष्यात सोबत येऊन कसे काम करता येईल यावर आमच्यात चर्चा झाली. आदित्य ठाकरेंनी आमच्या सोबत या, मिळून काम करू अशी इच्छी यावेळी व्यक्त केल्याचेही विनोद पाटील म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com