मराठा आरक्षणाच्या अंतिम निकालापर्यंत निवडणूक लढवणार नाही - विनोद पाटील

 मराठा आरक्षणाच्या अंतिम निकालापर्यंत निवडणूक लढवणार नाही - विनोद पाटील

औरंगाबाद : छत्रपतींच्या आशीर्वादाने जोपर्यंत सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्पष्टता मिळत नाही तोपर्यंत मला निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार नाही असे स्पष्ट करत विनोद पाटील यांनी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वाराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक आपण लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. गेल्या आठवडाभरापासून विनोद पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती. 

विनोद पाटील यांनी या संदर्भात सरकारनामाशी बोलतांना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, मागच्या काळात मी जाहीर केलं होतं, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत कुठलीही निवडणूक लढवणार नाही परंतु सुदैवाने मराठा आरक्षण मिळालं. आज न्यायालयीन लढाई लढत असताना माननीय उच्च न्यायालयात प्रकरण जिंकलो जरी असलो, तरी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने प्रलंबित आहे. 

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कायद्याच्या चौकटीत आपल्या बाजूने लागेल हा मला विश्वास आहे. मागील अनेक दिवसांपासून माझ्याबद्दल चर्चा आहे की, मी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवणार. आज मी स्पष्ट करतो, मी ही निवडणूक लढणार नाही. जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाबाबत स्पष्टता येत नाही तोपर्यंत मला निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार नाही असे मला वाटते. 

मी न्यायालयीन लढाई, सामाजिक लढाई ही कुठलाही राजकीय विचार डोळ्यासमोर ठेवून केलेली नव्हती. मला तर विश्वास आहे की, सर्व मतदारांच्या आशीर्वादाने आम्ही निवडणुकीत 100% विजयी होऊ शकतो. परंतु मी सुद्धा इतर नेत्यांप्रमाणे आज जर राजकारणात गेलो तर मला वाटते माझ्याकडून या राजकारणाच्या धावपळीत कोर्टातील केसकडे दुर्लक्ष होऊ शकते. 

50 पेक्षा अधिक युवकांनी आरक्षणासाठी बलिदान दिलंय. जर काही कमी जास्त झालं तर अनेकांचे जीव धोक्‍यात टाकण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे मी माझी नैतिकता समजून आज औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक कुठल्याही पक्षाकडून लढणार नाही हे स्पष्ट करतो. ज्या-ज्या पक्षांनी विशेषतः कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व इतर पक्षाने मला बिनशर्त पुरस्कृत उमेदवारी देण्याचं जे मत व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो आणि सर्वांची माफी मागतो, या पुढच्या काळात मराठा समाजसह इतर समाजाच्या तरुणांचे प्रश्न लावून धरण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करील असेही विनोद पाटील यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com