vinchu bite aba | Sarkarnama

  आबांना, जेव्हा विंचू चावतो ! 

प्रकाश पाटील 
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

आबांची आज जयंती. त्यांच्या एक ना अनेक आठवणी आहेत. त्यांची एक आठवणी आहे विंचू चावल्याची. आबा कसे पुरोगामी हे या घटनेकडे पाहिल्यानंतर लक्षात येते. 
एका विंचू उतरविणाऱ्या मांत्रिकाला आबांनी हात जोडून कसे परत पाठविले होते त्याचा हा किस्सा ! 

राजकारण करताना बाबाबुवांना आपले आदर्श मानणारे, गंडेदोरे हातात बांधणारे गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेते आणि कार्यकर्ते आपणास पाहण्यास मिळतात. मात्र काही नेते खरेच पुरोगामी होते. त्यांचा नशिबावर, भोंदूगिरीवर अजिबात विश्वास नव्हता. त्यापैकीच एक. अनेकांपैकी एक होते ते म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आर. आर. पाटील. 

तासगावचे सकाळचे प्रतिनिधी रवींद्र माने यांच्या वडीलांचे निधन झाले होते. महाराष्ट्राचे तत्कालिन गृहमंत्री आर.आर.आबा हे माने यांचे सांत्वन करण्यासाठी त्यांच्या मळ्यातील घरात गेले होते. आबा काही कार्यकर्त्यांसह तेथे बसले होते. काही वेळात आबांना पायाच्या करंगळीला काही तरी चावल्याचा भास झाला. 

सोबत असलेले वडगावचे पंचायत समितीचे सदस्य संजय पाटील यांना ते म्हणाले,"" मला काही तरी चावले आहे. आबा उठून उभे राहिले. तर तेथे विंचू होता.'' 

विंचवाला पाहिल्यानंतर आबा म्हणाले,"" संजय, मला विंचू चढतो रे ! चल डॉक्‍टरकडे !'' तासगावातील जाधव डॉक्‍टरांकडे ते गेले. तेथे ते डॉक्‍टरांनी उपचार केला. काही वेळात संजय यांचा एक मित्र एका मांत्रिकाला घेऊन आला. खरेतर आबांना भोंदूगिरी आठवत नाही. बाबाबुवांवर विश्वास ठेवणारे नेते ते नव्हते. आबा त्या रूग्णालयात झोपले असता. तो मांत्रिक आबांच्या पायाजवळ गेला असता. आबा ताडकन उठून बसले अन्‌ म्हणाले, "" तुम्ही कोण ? त्यावर संजय पाटील म्हणाले, "" हे माझे मामा आहेत.'' 

त्यावर आबा म्हणाले, "" तुझे मामा कवठेमहांकाळला असतात ! खरे सांग कोण आहेत हे मामा !'' 

संजय म्हणाले,"" हे विंचू उतरविणारे मांत्रिक आहेत ! 

कोणी बोलावले यांना ? खरेतर आबा रागवले होते! 

आबांनी त्या मांत्रिकाकडे पाहिले. हात जोडले अन्‌ म्हणाले,"" मामा तुम्ही जा ! मी बरा आहे!'' 

तो मांत्रिक गेल्यानंतर आबा उपस्थित कार्यकर्त्यांना म्हणाले, "" मला विंचू चढतो हे खरे आहे. पण, अंधश्रद्धा आणि बुआबाबांवर माझा विश्वास नाही. मी राज्याचा गृहमंत्री आहे. जर कोणी रेकॉर्डींग केले. बातमी दिली तर चुकीचा संदेश राज्यात जाईल. मी पुरोगामी आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. चुकीचे असे काही करू नका की माझी मान खाली घालावी लागेल."" 

डॉक्‍टरांच्या उपचारानेच विंचू उतरला होता याचेच समाधान आबांच्या चेहऱ्यावर होते असेही संजय पाटील सांगून जातात. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख