‘आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेत’ सांगलीच्या विनायक साळुंखे यांची निवड - Vinayak Salunkhe selected for young leaders access program | Politics Marathi News - Sarkarnama

‘आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेत’ सांगलीच्या विनायक साळुंखे यांची निवड

सरकारनामा
शुक्रवार, 20 जुलै 2018

विनायक साळुंखे यांनी पर्यावरणशास्त्र या विषयात उच्च शिक्षण घेतले आहे.  वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षापासून नेहरू युवा केंद्राशी ते जोडले गेले असून ग्रामीण तरुणांसोबत त्यांच्या  समस्यांवर काम करीत आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची 'मुख्यमंत्री  फेलोशिप' साठी निवड झाली होती.  'युवक बिरादरी, भारत' या संस्थेच्या 2017 च्या 'युवा भूषण' पुरस्काराचे ते विजेते आहेत.  

नवी दिल्ली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील मिरजवाडी येथील विनायक साळुंखे हे अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात आयोजित ‘आंतरराष्ट्रीय युवा नेतृत्व परिषदेत’ भारताचे नेतृत्व करणार आहेत. 

अमेरिकेतील ‘मिरॅकल कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेद्वारे 24 जुलै ते 2 ऑगस्ट 2018 या कालावधीत 'यंग लीडर्स ऍक्सेस   प्रोग्राम' साठी जगभरातून 50 युवकांची निवड झाली असून भारतातून विनायक साळुंखे यांची निवड करण्यात आली आहे.

‘मिरॅकल कॉर्नर्स ऑफ द वर्ल्ड’  ही संस्था समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी कार्यरत असणाऱ्या जगभरातील युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा नेतृत्व विकसित करण्यासाठी संधी उपलब्ध करून देते. इथे अमेरिकेतील तसेच जगभरातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती या तरुणांना मार्गदर्शन करीत असतात . 

आंतरराष्ट्रीय परिषदेतील निवडीसाठी तीन फेऱ्या घेण्यात आल्या होत्या. यावर्षी जानेवारी महिन्यात निबंध स्पर्धेची पहिली फेरी पार पडली. ऐच्छिक विषयांवरील या निबंध स्पर्धेत विनायक यांनी ‘ग्रामीण भागातील बेरोजगारी व त्यावरील उपाय’ या विषयीचे विवेचन केले होते. यानंतर मार्च महिन्यात व्हिडिओ मुलाखत आणि एप्रिल महिन्यात ‘फिल्ड असेसमेंट सर्वे’ अशा फेरी होऊन विनायक सांळुखे यांची अंतिम निवड करण्यात आली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख