विनायक मेटे यांची "होमपिच बीड' बाबतची भूमिका गुरुवारी ठरणार

कोल्हापूर येथील महायुतीच्या संयुक्त सभेला आणि पुणे येथे गिरीश बापट यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला विनायक मेटे सोबत होते. महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांच्या राज्यात सभा होणार असून नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी त्यांनी शिवसंग्रामचा मेळावा घेतला. बीडच्या त्यांच्या भूमिकेबाबत अद्याप सस्पेंस आहे.
 विनायक मेटे यांची "होमपिच बीड' बाबतची भूमिका गुरुवारी ठरणार

बीड : लोकसभा निवडणुकीत महायुतीत शिवसंग्राम राज्यभर सोबत आहे. अगदी कोल्हापूर येथील महायुतीच्या सभेला असलेले विनायक मेटे पुणे येथे गिरीश बापट यांचा अर्ज भरण्यासाठीही सोबत होते. लोकसभा निवडणुकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह महायुतीच्या उमेदवारांसाठी त्यांच्या 22 च्या वर सभा होणार आहेत. पण, दोघांचेही होमपिच असलेल्या बीडमध्ये पंकजा मुंडे आणि विनायक मेटे यांचे विळ्या भोपळ्याचे सख्य आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेविषयी अद्याप सस्पेन्स असून गुरुवारी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते आता नेमकी काय, भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यात मधल्या काळात दुसऱ्यांदा राजकीय खटका उडाला आहे. तसे दोघांत कायम विळ्या - भोपळ्याचे सख्य रहावे यासाठी दोन्ही गटांकडील काही विशिष्ट मंडळीचे प्रयत्न असतात. दोघांत पडलेल्या राजकीय अंतराला कारणीभूत असलेले मेटेंचे एकेकाळचे निकटवर्ती राजेंद्र मस्के हेच पंकजा मुंडे यांच्या तंबूत गेले. त्यामुळे संतापून मेटेंनी जिल्हा परिषदेतील भाजपचा पाठींबा काढण्याची घोषणा केली. परंतु, पुन्हा मेटेंचे दोन जिल्हा परिषद सदस्य फोडून पंकजांनी दुसरा शह दिला आहे. 

दरम्यान, आता लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. भाजप, शिवसेना, रिपाई, रयत क्रांती, रासप यासह शिवसंग्राम या महायुतीत आहे. महायुतीच्या कोल्हापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेत प्रमुखांमध्ये विनायक मेटेही होते. अगदी पुण्यात मेटेंच्या उपस्थितीतच गिरीश बापट यांचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला. नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासाठी शिवसंग्रामचा मेळावा घेणारे विनायक मेटे आगामी काळात भाजपच्या उमेदवारांसाठी आणि शिवसेना उमेदवारांसाठी आठ सभा घेणार असल्याची माहिती आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत ते खामगाव (जि. बुलढाणा) येथेही सभा घेणार आहेत. मात्र, त्यांचे होमपिच असलेल्या बीडमध्ये त्यांची भूमिकेबाबत अद्याप सस्पेन्स आहे. जिल्ह्यात भाजपने आपल्या मुळ नेत्यांहस इतर पक्षातील काही बडे आणि दुसऱ्या फळीतील नेतेही आपल्या तंबूत घेतले आहेत. मात्र, विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामचा भाजपच्या कुठल्याच बॅनरवर उल्लेख नाही. स्थानिक भाजप नेत्यांचा अहंकार आपण उतरविणार या मेटेंच्या स्टेटमेंटला "आपण त्यांना बोलणार नाही' असे प्रत्युत्तर पंकजा मुंडे यांनी दिले आहे. दरम्यान, आता गुरुवारी शिवसंग्रामचा मेळावा होऊन त्यात विनायक मेटे बीडबद्दलची राजकीय भूमिका घेणार आहेत. भाजपकडून दुखावलेल्या मेटेंची रसद राष्ट्रवादीला भेटेल असे राष्ट्रवादी समर्थकांचा अंदाज आहे. तसेच, त्यासाठी त्यांना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक नेत्यांनीही गळ घातल्याची माहिती आहे. मात्र, खासदारांचा आकडा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री राज्यभर प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांनीही मेटेंना "सबुरीने घ्या' असा सल्ला देवेंद्र फडणवीसांनी दिल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर आता मेटे काय, भूमिका घेणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com