Villagers from Nagar District Left Village by fear of Corona | Sarkarnama

सतरा जणांची हेकेखोरी, गाव झाले हैराण, थाटला रानातच संसार 

शांताराम काळे
बुधवार, 25 मार्च 2020

ते सतराजण पुणे,मुंबईहून वाडीवर आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी त्यांना तपासणी करून घेण्याची विनंती केली, परंतु ते हेकेखोरी सोडेनात. कोणाचेच मानेना. अखेर वाडीवरील सर्वच ग्रामस्थांनी हात टेकले आणि गाव सोडून ग्रामस्थ रानातच संसार घेवून गेले. ही कहाणी आहे साम्रद गावच्या चराचीवाडी येथील.

अकोले  : ते सतराजण पुणे,मुंबईहून वाडीवर आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोकांनी त्यांना तपासणी करून घेण्याची विनंती केली, परंतु ते हेकेखोरी सोडेनात. कोणाचेच मानेना. अखेर वाडीवरील सर्वच ग्रामस्थांनी हात टेकले आणि गाव सोडून ग्रामस्थ रानातच संसार घेवून गेले. ही कहाणी आहे साम्रद गावच्या चराचीवाडी येथील.

त्याचे झाले असे - अकोले तालुक्यातील साम्रद हे गाव आदिवासी भागातील आहे. या गावची वाडी असलेल्या चराचीवाडी येथील ग्रामस्थ नोकरीनिमित्त मुंबई, पुणे येथे गेले होते. कोरोना विषाणूच्या धुमाकुळामुळे त्यांनी गाव गाठले. गावात आल्यानंतर सरपंच तसेच प्रतिष्ठित ग्रामस्थांनी त्यांना आरोग्य विभागाकडून तपासणी करून येण्याची विनंती केली. परंतु ती त्यांनी धुडसावली. तपासणी करण्यास त्यांनी थेट नकारच दिला. सर्व ग्रामस्थांनी त्यांना विनंती केली, तथापि, ते कोणाचेच ऐकत नाहीत. हे पाहून गावातील आशा सेविका, सरपंच यांनी तालुका आरोग्य अधिकारी व प्रशासनाला या लोकांबाबतची कल्पना दिली. 

सतरापैकी काही लोकांना ताप व खोकला येत आहे. त्यामुळे भितीचे वातावरण पसरले आहे. नव्याने आलेल्या सतराजणांना तपासणी करण्यासाठी येण्याचे आरोग्य विभागाने कळविले, मात्र तरीही त्यांनी या आदेशाला केराची टोपली दाखवत गावातच राहणे पसंत केले. त्यामुळे अखेर वाडीवरील इतर सर्व ग्रामस्थांनी ही वाडीच सोडायचा निर्णय घेवून लांब थेट शेतात संसार थाटले. पाल ठोकले आणि तेथेच राहू लागले. 

या प्रकारामुळे शेंडी येथील आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी तेथे आले. त्यांनी संबंधित सतरा जणांना तपासले. त्यांना कोरोनाची लागण दिसत नाही, असे सांगितले. यावर ग्रामस्थ चिडले. या सतरा जणांना शेंडी येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवा. त्यांना बरे होईपर्यंत गावात पाठवू नका, अशी विनंती ग्रामस्थांनी केली. परंतु वैद्यकीय अधिकारीही त्यांच्यापुढे हतबल होते. त्यांनी वरिष्ठांना कळवितो, असे सांगून ग्रामस्थांची समजूत काढली. परंतु शेतात ठाण मांडलेल्या ग्रामस्थांचे गावात येण्याचे धाडस होत नाही.

होम क्वारंटाईनचे आदेश

साम्रद येथील रुग्णाला तापसण्यासाठी पथक गेले आहे, मात्र तसा प्रकार नसावा. याबाबत मी स्वतः जाऊन खात्री करतो, मात्र संबंधित रुग्णाला सध्या तरी होम क्वारंटाईन करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी डाॅ. इंद्रजित गंभीरे यांनी दिली. ''याबाबत साम्रद येथून फोन आले होते. मी संबंधित आरोग्य अधिकारी यांच्याशी बोललो आहे. तसे असेल तर 108 क्रमाकला फोन करून रुग्णाला रुग्णवाहिकेतून हलविता येईल,'' असे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले. 

ग्रामस्थ घाबरले

गावात 17 लोक आले असून, त्यातील पुणे येथून आलेला रुग्ण तापाने आजारी आहे. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. ते आले होते, परंतु त्यांनी हा ताप कोरोनाचा नाही, असे सांगितले आहे. रुग्ण बरा होईपर्यंत त्याला रुग्णालयात ठेवावे, असे ग्रामस्थांचे मत आहे. कोरोनाच्या भितीमुळे ग्रामस्थ अखेर वस्तीवर राहण्यास गेले आहेत, असे सरपंच चंद्रप्रभा बांडे यांनी सांगितले

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख