vilasrao deshmukh was famous in other stastes also | Sarkarnama

स्वतः फोन उचलणारे विलासराव परराज्यातही होते लोकप्रिय

उमेश घोंगडे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा राज्यातील कार्यकर्त्यांचा संच मोठा होता. तसेच इतर राज्यांतील मराठी भाषकांसाठी ते आधार ठरले होते. शेजारच्या राज्यांत विलासराव हे नेहमी प्रचाराला जात. तेथील अनुभव काॅंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय बालगुडे यांनी कथन केला.

गुजरात निवडणुकीत 2007 साली विलासरावांकडे प्रचाराची जबाबदारी होती. अंकेलश्‍वराला रात्री एक वाजता ते येणार होते. महाराष्ट्रातून आम्ही काहीजण गेलो होतो. रात्री एक वाजता विलासराव उतरले. त्यांच्या स्वागतासाठी किमान एक हजार लोक उपस्थित होते.इतकी गर्दी पाहून आम्ही सारे आवाक झालो.

आपल्या राज्यातही विमाततळावर एवढी गर्दी होत नाही. इथे इतकी गर्दी कशी, असे मी विलासरावांना विचारले त्यावर ते उत्तरले अरे या साऱ्यांचे वैयक्तिक फोन मी नेहमी घेतो. यातील बरेचजण मला दिल्लीतही भेटायला येतात. फोन स्वत: घेण्याच्या त्यांच्या सवयीचा अनुभव आम्ही घेतला होता. मात्र त्यामुळे लोक इतके जवळ येऊ शकतात याचा अनुभव आम्ही घेत होतो.

कुणीही, कधीही फोन केला तरी मोबाईल विलासराव स्वत: घ्यायचे आणि अगदी प्रेमाने बोलायचे याचा अनुभव माध्यमात काम करणाऱ्या अनेकांनी घेतला आहे. मात्र बालगुडे यांनी सांगितलेला परराज्यातील दौऱ्यातील अनुभव वेगळाच आहे. माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम, बाळासाहेब शिवकर, वस्ताद रियाज हे या घटनेचे साक्षीदार अाहेत.

अंकलेश्वराला मध्यरात्री एक वाजता वाट पाहणाऱ्या या एक हजार लोकांमधील बहुतांश लोक मराठी भाषक होते. यांच्यापैकी कुणीही फोन केला तरी विलासराव स्वत: फोन घ्यायचे. आलेला फोन न टाळता किंवा सहायकाकडे न देता स्वत: घेऊन बोलण्याचा किती फायदा होऊ शकतो हे इतर राजकारण्यांना शिकण्यासारखे आहे. विलासरावांच्या उमदेपणाच्या, मोकळ्या स्वभावाच्या आणि इतरांना मदत करण्याच्या स्वभावाच्या अनेक आठवणी विरोधी पक्षातील नेतेदेखील अनेकवेळा सांगतात. मात्र परराज्यातील लोकांबरोबरदेखील असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध इतर राजकारण्यांसाठी आदर्शवत असेच आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख