Vikrant Sawant meets Uddhav Thakare | Sarkarnama

भाई सावंतांचे नातू  विक्रांत  उद्धव ठाकरेंना भेटले

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 एप्रिल 2017

सावंतवाडी: महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री, कॉंग्रेसचे दिग्गज नेते (कै.) भाईसाहेब सावंत यांचे नातू व राज्य शिखर बॅंकेचे माजी उपाध्यक्ष विकास सावंत यांचे पुत्र विक्रांत सावंत शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ते आता लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. 

सावंतवाडी: महाराष्ट्राचे माजी आरोग्यमंत्री, कॉंग्रेसचे दिग्गज नेते (कै.) भाईसाहेब सावंत यांचे नातू व राज्य शिखर बॅंकेचे माजी उपाध्यक्ष विकास सावंत यांचे पुत्र विक्रांत सावंत शिवसेनेच्या वाटेवर आहेत. त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. ते आता लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. 

श्री. सावंत हे जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रांत त्यांचे सक्रियपणे काम सुरू आहे. उच्चशिक्षित विक्रांत सावंत हे मराठा मोर्चाच्या नेतृत्वामुळे चर्चेत आले होते. त्याच वेळी ते राजकारणात प्रवेश करणार आहेत, अशीही चर्चा होती. भाईसाहेबांचा वारसा पुढे नेत विक्रांत कॉंग्रेसमधूनच आपली राजकीय वाटचाल सुरू करतील, असेही बोलले जात होते; मात्र आता त्यांनी श्री. ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे ते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट झाले.

श्री. सावंत यांनी मंगळवारी (ता. 4) दुपारी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत तसेच शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर या वेळी उपस्थित होते. या भेटीत विक्रांत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी शिवसेनेकडून चाललेल्या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त करत आपले आजोबा भाईसाहेब सावंत यांच्या स्वप्नातील सिंधुदुर्गासाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली. त्याला उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार विक्रांत लवकरच अधिकृतरीत्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. त्यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एखादी महत्त्वाची जबाबदारी शिवसेनेकडून सोपवली जाण्याची शक्‍यता आहे.

कॉंग्रेससाठी धक्का
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बराच काळ कॉंग्रेसचे एकहाती वर्चस्व पाहायला मिळाले. यात (कै.) भाई सावंत यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्याच काळात जिल्ह्यात पक्षाला उभारी मिळाली. अर्थात, त्यातूनच भाई सतत राज्याच्या राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या स्थानी राहिले. भाई सावंत यांनी राज्याचे आरोग्यमंत्रिपद सांभाळताना ग्रामीण भागात आरोग्यविषयक सुविधा, पूल, रस्ते, वीज अशा दैनंदिन गरजांशी संबंधित सुविधा निर्माण करण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्याच प्रयत्नातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे भाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालयाची स्थापना झाली होती. यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग विशेषतः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात होता. त्यांच्या पश्‍चात त्यांचे पुत्र विकास सावंत यांनीही निष्ठेने कॉंग्रेस पक्षात काम केले. जिल्हा बॅंक संचालक, जिल्हा परिषदेचे सभापती, राज्य सहकारी बॅंक असोसिएशनचे उपाध्यक्ष अशी अनेक पदे त्यांनी भूषविली. सध्या ते कॉंग्रेसचे प्रदेश समिती सदस्यही आहेत. असे असताना हा वारसा लाभलेला त्यांचा मुलगा मात्र शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेण्यासाठी सज्ज झाला आहे. भाई सावंत यांची तिसरी पिढी विक्रांत सावंत यांच्या रूपाने शिवसेनेतून राजकारण करणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. विक्रांत यांचा शिवसेना प्रवेश झाल्यास सिंधुदुर्गात तो कॉंग्रेससाठी मोठा धक्का ठरणार आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख