vikram dhone questions devendra fadavnis | Sarkarnama

धनगर समाजाने फडणवीसांना जनादेश कां द्यावा?

मिलिंद संगई
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

मंत्रीमंडळ उपसमितीने विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापुर्वी बैठक घ्यावी आणि अनुसुचित जमाती (ST) आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय करावा, अशी आमची मागणी आहे. 

बारामती शहर: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर धनगर समाजाच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रीमंडळ उपसमिती गठित केली. मात्र लोकसभेनंतर या समितीची एकही बैठक झालेली नाही. त्यामुळे धनगरांचे एसटी आरक्षण सरकारने बासनात टाकल्याचे स्पष्ट होते, अशी टीका धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली. 

ढोणे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांना धनगर समाजाने जनादेश कां द्यावा आणि फडणवीस यांनी तो कां मागावा, अशी परिस्थिती आहे. फडणवीस यांनी पाच वर्षापुर्वी बारामतीमध्ये येवून पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना एसटी आरक्षणाचे आश्वासन दिले होते. मात्र पाच वर्षात अनेक कॅबिनेट बैठका होऊनही एसटी आरक्षण मिळालेले नाही. 

गरज नसताना फडणवीस यांनी टाटा समाज विज्ञान संस्थेकडे सर्वेक्षणाचे काम सोपवले. त्यात दोन वर्ष घालवली. वर्षापुर्वी या संस्थेने अहवाल दिला, मात्र तो जाहीर केला जात नाही. या अहवालावर कार्यवाही करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मंत्रीउपसमिती स्थापन करण्यात आली. या उपसमितीची बैठक होवून धनगर समाजासाठी विविध योजना जाहीर करण्यात आल्या. मात्र या बैठकीत धनगर समाजाचा मूळ आणि कळीचा असलेला अनुसूचित जमाती आरक्षणाचा प्रश्न विचारात घेतला गेला नाही. त्यानंतर या समितीची एकही बैठक झालेली नाही. त्यावरून सरकारने एसटी आरक्षणाचा विषय बासनात टाकला आहे, असे स्पष्ट दिसते. 

या बाबी दुरूस्त करून मंत्रीमंडळ उपसमितीने विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापुर्वी बैठक घ्यावी आणि अनुसुचित जमाती (ST) आरक्षणाच्या प्रश्नावर निर्णय करावा, अशी आमची मागणी आहे. 

 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख