VIKHE PATIL TARGETS BJP | Sarkarnama

भाजप हीच खरी 'गॅंग ऑफ वासेपूर! : विखे पाटलांचा चौफेर हल्ला

सरकारनामा ब्यूरो
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विरोधी पक्षाला 'गॅंग ऑफ वासेपूर'ची उपमा देऊ केली होती. पण भारतीय जनता पक्ष हीच महाराष्ट्रातील खरी 'गॅंग ऑफ वासेपूर' आहे. कारण भाजपमध्ये गुंडांना कसा राजाश्रय मिळतो, हे भाजपचेच आमदार जाहीरपणे सांगत असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. 

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विरोधी पक्षाला 'गॅंग ऑफ वासेपूर'ची उपमा देऊ केली होती. पण भारतीय जनता पक्ष हीच महाराष्ट्रातील खरी 'गॅंग ऑफ वासेपूर' आहे. कारण भाजपमध्ये गुंडांना कसा राजाश्रय मिळतो, हे भाजपचेच आमदार जाहीरपणे सांगत असल्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. 

हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत ते बोलत होते. यावेळी विखे पाटील यांनी सरकारवर चौफेर हल्ला चढवला. ते म्हणाले की, विधीमंडळाचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांनी सरकारला 'ठग ऑफ महाराष्ट्र'ची उपमा दिली होती. ही उपमा या सरकारने मागील ४ वर्ष सार्थ ठरवली आहे. औद्योगिक गुंतवणूक, रोजगार निर्मिती, शेतकऱ्यांसाठीच्या अनेक योजना, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचे आश्वासन, सामाजिक न्यायाच्या योजना अशा प्रत्येक आघाडीवर या सरकारने केवळ ठगबाजीच केली. त्यामुळे लोकांना सोप्या शब्दांत कळेल, अशा भाषेत आम्ही सरकारला 'ठग ऑफ महाराष्ट्र'ची उपमा दिल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी सांगितले. 

या भाषणामध्ये विखे पाटील यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये प्रकाशित अनेक अग्रलेखांचा संदर्भ देत भारतीय जनता पक्षाच्या कारभारावर जोरदार तोफ डागली. त्यांनी शिवसेनेतील अग्रलेखांचा दाखला देत सरकारवर हल्लाबोल केला. 

विरोधी पक्षांनी सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन करताना ताशेरे ओढले तर त्याला राजकीय आरोप म्हटले जाते. पण सरकारमध्ये सहभागी असलेली शिवसेनाच सरकारच्या कारभारावर जाहीर टीका करते आहे. भाजपचे आमदार आपल्या पक्षाबद्दलची भावना जाहीरपणे व्यक्त करीत आहेत. तरीही सरकार आत्मपरीक्षण करायला तयार असल्याचे दिसून येत नाही, असे त्यांनी सांगितले.

या भाषणामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा एक 'इव्हेंट' असल्याचा ठपका ठेवला. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी भाजपला 'निर्लज्ज' संबोधले. तरीही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेला माफ केले. ही मुख्यमंत्र्यांची सहिष्णूता आहे का? अशी बोचरा सवालही त्यांनी विचारला.

भाजपला शक्य नसेल तर मी अयोध्येत जाऊन मंदिर बांधतो, अशी वल्गना करून उद्धव ठाकरे अयोध्येला गेले. लोकांना वाटले, आता ते मंदिर बांधूनच परतणार! पण उद्धव ठाकरे केवळ शरयूच्या तिरावर आरती करुन आणि सभास्थानाचे भूमिपूजन करून मुंबईत परतले. आरती झाल्यानंतर शिवसेनेच्या मंत्र्यांनी आपल्या खिशातील राजीनाम्याच्या होड्या शरयू नदीत सोडल्या, अशीही टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली. 

भिडे गुरूजींनाही सरकार पाठिशी घालत असल्याचा ठपका त्यांनी ठेवला. भिडे गुरूजींवरील काही गुन्हे नुकतेच सरकारने माफ केले.  ते गुन्हे माफ करताना सारे नियम धाब्यावर बसवल्याचे जाहीर आरोप आरटीआय कार्यकर्त्यांनी केले आहेत. राजकीय किंवा सामाजिक आंदोलनाचे गुन्हे मागे घेण्याच्या धोरणाचा भिडे गुरूजींसारख्या व्यक्तीला लाभ देणे, हा त्या धोरणाचा गैरवापर आहे. भिडे गुरूजींना कायद्याची तमा नाही. ते कायदा जुमानत नाही. आंबे खाऊन मूल होण्याबाबत नाशिकमध्ये दाखल खटल्याला हजर राहण्याचे सौजन्य ते दाखवत नाहीत. कायद्याचा असा अनादर करणाऱ्या व्यक्तीचे गुन्हे माफ का झाले? असा प्रश्न विखे पाटील यांनी उपस्थित केला. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख