vikhe patil faces more challege as three misnisterial berth gets around shirdi | Sarkarnama

शिर्डीच्या तिन्ही बाजूंना मंत्रिपदे दिल्याने विखे-पाटलांची घुसमट

मुरलीधर कराळे
मंगळवार, 31 डिसेंबर 2019

विधानसभा निवडणुकीच्या आधी जिल्ह्याचे किंगमेकर म्हणून ओळखले जाऊ लागलेले भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मतदारसंघाच्या तिन्ही बाजूंनी मंत्रिपदे देऊन ठाकरे सरकारने एक प्रकारे विखे पाटील यांची घुसमटच केली आहे.

नगर  ः विधानसभा निवडणुकीच्या आधी जिल्ह्याचे किंगमेकर म्हणून ओळखले जाऊ लागलेले भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मतदारसंघाच्या तिन्ही बाजूंनी मंत्रिपदे देऊन ठाकरे सरकारने एक प्रकारे विखे पाटील यांची घुसमटच केली आहे.

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या आधी विखे पाटील यांनी विखे पॅटर्न राबवून डॉ. सुजय विखे यांना खासदार केले. विधानसभा निवडणुकीत 12 विरुद्ध शुन्यची घोषणा करून संपूर्ण जिल्हा काबिज करण्याचे वातावरण त्यांच्याबाबतीत झाले. त्यामुळे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते घायाळ झाले होते. आगामी काळात भाजप आपलीच काहीच दाळ शिजू देणार नाही, अशीच स्थिती निर्माण झाली होती. मात्र नंतर राजकीय वातावरण बदलले. 

विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार देण्यावरून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विखे पाटील यांच्यात काहीतरी खटकल्याचे बोलले जाते. फडणवीस यांनी त्यांच्या गोटातील उमेदवार दिल्याने विखे पाटील यांची 12 विरुद्ध शुन्यची घोषणा हवेत विरली. भाजपचे बारा तर सोडाच उलट आमदार कमी झाले. त्याचे शल्य भाजपनेत्यांना राहिले. विखे पाटील यांनी उमेदवारांना मदत करण्याएेवजी त्यांना पाडले, असा आरोप शिवाजी कर्डिले, प्रा. राम शिंदे आदींनी जाहीरपणे केला. त्याबाबत पक्षश्रेष्ठींच्या बैठकाही झाल्या. या सर्व पार्श्वभूमीवर विखे पाटील यांच्या विरोधात विरोधकांबरोबरच पक्षाचे नेतेही नाराज झाल्याने त्यांची कोंडी झाली.

तिन्ही बाजूंनी मंत्री
विखे पाटील यांच्या लोणी गावाजवळच असलेल्या संगमनेर तालुक्यात मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने मंत्रीपद मिळाले. लोणीपासून जवळच असलेल्या राहुरी तालुक्यात प्राजक्त तनपुरे यांच्या रुपाने मंत्रीपद देण्यात आले, तर शेजारील नेवासे मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख यांनाही मंत्रीपद देण्यात आले. उत्तरेतच तिन्ही मंत्रीपदे मिळाल्याने हा प्रकार विखे पाटील यांची घुसमटच करण्याचा ठरला. 

झेडपी अध्यक्षपदही हिसकावले
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील कॉंग्रेसमध्ये असल्या तरी त्यांच्या रुपाने हे पदही विखे पाटील यांच्याच घरात होते. मात्र महाविकास आघाडीने हे पदही त्यांच्याकडून हिसकावून घेत लोणीजवळच असलेल्या नेवासे तालुक्यातील राजश्री घुले यांच्याकडे देण्यात येत आहे. हे पदही मंत्रीपदाच्या दर्जाचे असल्याने चारही पदे विखे यांच्याच बाजुने देऊन त्यांची एक प्रकारे घुसमट केली जात आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख