Vikhe Patil Attended Water Meeting But Balasaheb Thorat Skipped | Sarkarnama

पाणी वाटप बैठकीस विखे पाटील आले; थोरातांची मात्र दांडी, बैठक झाली निरस 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 15 जानेवारी 2020

सामान्यतः पाणी हा शेती, सिंचनाचा गंभीर विषय असल्याने या बैठकीत वाद, शाब्दीक टिका- टिपण्णी होतेच. पाण्याच्या राजकारणाचे पडसाद या बैठकीत उमटतात. मात्र, यंदा धरणांतही पुरेसा साठा असल्याने हे वाद यंदा रंगलेच नाहीत. त्यामुळे ही बैठक अगदीच निरस झाली

नाशिक : आगामी हंगामातील धरणांतील पाण्याच्या रोटेशनसाठी काल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी नगर, नाशिकचे सर्वच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीस राधाकृष्ण विखे- पाटील उपस्थित होते. मात्र महसुल मंत्री बाळासाहेब थोरात अनुपस्थित होते. यावेळी धरणांत पुरेसा साठा असल्याने नगरच्या नेत्यांतील कोपरखळ्या आणि राजकीय वक्तव्येही न झाल्याने ही बैठक अगदीच निरस झाली.

अन्न, नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक विभागातील रब्बी व उन्हाळा हंगाम कालवा सल्लागार समितीची बैठक आज मंत्रालयात झाली. यावेळी कृषीमंत्री दादासाहेब भूसे उपस्थित होते. सामान्यतः पाणी हा शेती, सिंचनाचा गंभीर विषय असल्याने या बैठकीत वाद, शाब्दीक टिका- टिपण्णी होतेच. पाण्याच्या राजकारणाचे पडसाद या बैठकीत उमटतात. मात्र, यंदा धरणांतही पुरेसा साठा असल्याने हे वाद यंदा रंगलेच नाहीत. त्यामुळे ही बैठक अगदीच निरस झाली.

नाशिक विभागातील रब्बी व उन्हाळा हंगामासाठी सिंचन व बिगर सिंचन आवर्तनासाठी पाण्याचा दुरुपयोग होणार नाही याकडे लक्ष देऊन सिंचन आवर्तनाचे योग्य नियोजन करावे, असे अन्न्‌, नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. यावेळी श्री. भुजबळ म्हणाले, ''पालखेड डावा कालव्यावर रब्बी हंगामात सिंचन/बिगर सिंचनाचे 2 आवर्तने देण्याचे नियोजन. उन्हाळा हंगामामध्ये बिगर सिंचन व आकस्मिक आरक्षणाचे 1 आवर्तन व जून अखेरीस पावसाळ्याने ओढ दिल्यास येवला, मनमाड 38 गावे यांच्यासाठी 1 आवर्तने देण्याचे ठरले आहे. ओझरखेड कालव्यावर रब्बीचे 2 आवर्तन देण्याचे नियोजन. रब्बीच्या दुसऱ्या आवर्तनासोबत आकस्मितचे आवर्तन देण्याचे नियोजन आहे.''

यावेळी आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, आशुतोष काळे, खासदार भारती पवार, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सर्वश्री लहूजी कानडे, राहूल ढिकले, हिरामण खोसकर, श्रीमती सरोज आहेर, नरहरी झिरवळ, दिलीप बनकर, नितीन पवार, मुफ्ती मोहम्मद इस्माईल, जलसंपदाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका आहेरराव व अधिकारी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख