Vikhe, Mohite, Kshirsagar keeping fingers crossed untill election results | Sarkarnama

लोकसभेचा निकाल लागेपर्यंत विखे,मोहिते ,क्षीरसागर आदी नेते कुंपणावर 

सिद्धेश्वर डुकरे 
गुरुवार, 16 मे 2019

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे हे चार - पाच  नेते सध्या कुंपणावर असल्याचे मानले जाते.लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ते पुढील निर्णय घेणार असल्याचे बोलले जाते.

मुंबई :  काँग्रेस- राष्ट्रावादीत असलेले  राधाकृष्ण विखे, विजयसिंह मोहिते , जयदत्त क्षीरसागर यांच्यासारखे नेते लोकसभेचा निकाल लागेपर्यंत कुंपणावरच राहतील असे चित्र आहे .  

त्यांच्या राजकीय भवितव्याचा निर्णय लोकसभा निवडणुकीच्या निकालावर अवलंबून ठरणार आहे. दिल्लीत भापचे सरकार पुन्हा सत्तेवर आले तर भाजपत प्रवेश नाही तर पार्ट आपापल्या पक्षात अशी या नेते मंडळींची स्ट्रॅटेजी दिसत आहे . 

कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे सुपूत्र डॉ. सुजय विखे यांनी कॉंग्रेस मधून बाहेर पडून नगर लोकसभा मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवली आहे. डॉ. सुजय विखे यांच्या राजकीय भुमिकेमुळे राधाकृष्ण विखे यांना राजकीय आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्यावेळीच विखे भाजपमध्ये प्रवेश करणार अशी राजकीय चर्चा रंगली होती. मात्र विखे अदयाप कॉंग्रेस पक्षात आहे. त्यांच्यावर कॉंग्रेस पक्षाने अदयाप कोणतीही कारवाई केली नाही.

 विखे हे लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज घेउन आपली राजकीय दिशा निश्‍चित करतील असे मानले जाते.केंद्रात भाजपची पुन्हा सत्ता स्थापन झाली तर विखे भाजपमध्ये प्रवेश करतील अन्यथा ते कॉंग्रेस मध्येच राहणे पसंत करतील असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.

 विखे यांच्या प्रमाणे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे समर्थक आमदार कालीदास कोळंबकर यांनी उघडपणे मुंबईत कॉंग्रेसच्या विरोधात प्रचार केला. तरीही कॉंग्रेस पक्षाने त्यांच्यावर अदयाप कारवाई केली नाही.

तसेच कोळंबकर यांनी देखील कॉंग्रेस पक्ष सोडला नाही. त्याचबरोबर स्वाभीमानी पक्षाचे नेते आमदार नितेश राणे हे कॉंग्रेस पक्षात आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेस सोडली तरीही नितेश राणे कॉंग्रेस पक्षात आहेत.

तसेच कॉंग्रेसचे आणखी एक आमदार जयकुमार गोरे हे देखील कॉंग्रेस पक्ष सोडणार अशी चर्चा आहे.

कॉंग्रेस पक्षातील या कुंपणावरील नेत्यांप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजय सिंह मोहिते पाटील हे देखील अदयाप राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आहेत.त्यांचे पुत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

 बीडचे राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षिरसागर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा उघडपणे प्रचार केला. या दोन नेत्यांवर अद्याप राष्ट्रवादीने  कारवाई केली नाही. कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे हे चार - पाच  नेते सध्या कुंपणावर असल्याचे मानले जाते.लोकसभा निवडणुकीच्या निकालावर ते पुढील निर्णय घेणार असल्याचे बोलले जाते.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख