Vikhe is BJP"s protegee | Sarkarnama

राधाकृष्ण विखे हे भाजपचे हस्तक; बंधू अशोक विखेंचा आरोप

उमेश घोंगडे : सरकारनामा ब्युरो
बुधवार, 8 मार्च 2017

या संदर्भात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला असता," झाकिर नाईकच्या संस्थेकडून घेतलेल्या देणगीबाबत मला माहिती नाही. संस्थेचे दैनंदिन कामकाज मी पाहात नाही. मात्र या संदर्भात तातडीने माहिती घेऊ, असे पाटील यांनी सांगितले. प्रवरा ग्रामीण एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील होते. त्यांच्या निधनानंतर 15 सदस्यांनी अध्यक्ष म्हणून माझी निवड केली. मात्र कार्यकारी अध्यक्ष असलेल्या अशोक विखे पाटील यांना पदावरून कुणीही काढलेले नाही. आजही ते त्या पदावर आहेत, " असे पाटील यांनी स्पष्ट केले. 

पुणे, ता. 8 : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भारतीय जनता पक्षाचे हस्तक असून केवळ बोलका पोपट म्हणून काम करीत आहेत, असा आरोप विखे पाटील यांचे बंधू अशोक विखे पाटील यांनी केला आहे.

राधाकृष्ण यांनी त्यांच्या ट्रस्टला देशद्रोही झाकिर नाईकच्या संस्थेकडून दोन कोटी रूपयांची देणगी घेतल्याचा गंभीर आरोपदेखील अशोक विखे पाटील यांनी केला आहे. 

पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, " नाईक याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन या संस्थेकडून विखे पाटील यांच्या संस्थेला दोन कोटी रूपयांची देणगी देण्यात आली आहे. गेल्यावर्षी ही माहिती समोर आली आहे. सक्त वसुली संचलनालय या संदर्भात माहिती घेत असून एका सरकारी कार्यालयातूनच या देणगी संदर्भात आपणास माहिती मिळाली आहे. इतर अनेक संस्था असताना राधाकृष्ण यांच्या संस्थेलाच ही देणगी का देण्यात आली. शिवाय अशा व्यक्तीकडून देणगी घेणे नैतिकदृष्ट्या योग्य आहे का याचा साधा विचारदेखील करण्यात आला नाही. मोठा शैक्षणिक विस्तार असलेल्या अनेक संस्था विठ्ठलराव विखे पाटील व बाळासाहेब विखे पाटील यांनी सुरू केल्या. गोरगरीबांच्या मुलांना उत्तम शिक्षण हा त्यांच्या कार्याचा उद्देश होता. मात्र आता या संस्थांचा उपयोग राधाकृष्ण केवळ राजकारणासाठी करून घेत आहेत. '' 

अशोक विखे पाटील म्हणाले, " बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनाला केवळ नऊ आठवडे झाले. त्यांच्या पश्‍चात साऱ्या संस्था स्वत:च्या ताब्यात घेण्याची घाई राधाकृष्ण यांना झाली आहे. गेली अडीच वर्षे मी कार्यकारी अध्यक्ष असलेल्या प्रवरा ग्रामीण एज्युकेशन ट्रस्टची बैठक घेऊन माझ्या अनुपस्थितीत ही संस्था ताब्यात घेऊन राधाकृष्ण स्वत: अध्यक्ष झाले आहेत. बैठकीत स्वत:ला अध्यक्षपदी नेमून धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून चेंर रिपोर्ट मंजूर करून घेण्यात आला. या बेकायदा कृती विरोधात राधाकृष्ण यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून लवकरच धर्मदाय आयुक्त कार्यालयात याचिका दाखल करणार आहे.'' 

शालिनी विखे पाटील यांना राजकाणात आणण्यास बाळासाहेब विखे यांचा तीव्र विरोध होता. मात्र त्यांचा विरोध डावलून राधाकृष्ण यांनी मनमानी केली, असा आरोप अशोक विखे पाटील यांनी केला. बाळासाहेब विखे पाटील राधाकृष्ण यांच्यावर इतके नाराज होते की शेवटच्या सहा महिन्यांच्या काळात ते राधाकृष्ण यांच्याशी बोलतदेखील नव्हते, असे विखे पाटील यांनी सांगितले. 
इन्फो.. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख