पश्‍चिम नागपूरमध्ये कॉंग्रेसने झेंडा रोवला; विकास ठाकरे नवे शिलेदार

पश्‍चिम नागपूरमध्ये कॉंग्रेसने झेंडा रोवला; विकास ठाकरे नवे शिलेदार

नागपूर : भारतीय जनता पक्षासाठी नेहमीच अभेद्य किल्ला राहीलेल्या पश्‍चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात कॉंग्रेसने झेंडा रोवला असून, विकास ठाकरे नवे शिलेदार झाले आहेत. विकास ठाकरे यांनी भाजपाचे सुधाकर देशमुख यांना पराभूत केले. अतिशय चुरशीची ठरलेल्या या लढतीत प्रारंभीची फेरी सोडल्यास, विकास ठाकरे आघाडीवर कायम होते.

मतमोजणी प्रारंभ झाली तेव्हा सुधाकर देशमुखांनी 602 मतांची आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजपाच्या गोटात उत्साह संचारला होता. परंतु, दुसऱ्या फेरीपासून विकास ठाकरे यांनी घेतलेली आघाडी अखेरच्या टप्प्यापर्यंत कायम होती. पहिल्या, दुसऱ्या तिसऱ्या फेरीत सातत्याने वाढत जाणारा हा आकडा सातव्या फेरीपर्यंत कायम होता. मुळात या फेऱ्यांमध्ये ज्या भागाची मतमोजणी झाली त्यात कॉंग्रेसबहुल वस्त्यांचा समावेश होता. मात्र ज्यावेळी धरमपेठ, शंकरनगर अशा भागाची मतमोजणी प्रारंभ झाली तेव्हा मात्र कधी सुधाकर देशमुख तर कधी ठाकरे अशी चुरस रंगली. शेवटच्या दोन फेऱ्यात सुधाकर देशमुख आघाडीवर होते. पण विकास ठाकरे यांच्या "लीड'चा झेंडा अटकेपार निघून गेला होता. अखेर 1 लाख 78 हजार 596 मतांमधून सुधाकर देशमुख यांना 76 हजार 885 एवढी मते प्राप्त झाली. तर विकास ठाकरे यांनी 83 हजार 252 मते मिळवून देशमुखांचा किल्ला काबिज केला.

कार्यकर्ता ते आमदार
शेतकरी कुंटुबात जन्म झालेल्या विकास ठाकरे यांनी गेल्या तीस वर्षांपासून कॉग्रेसचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी प्रथमत: देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात अपक्ष निवडणुक लढविली. तेव्हा विकास ठाकरेंना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, त्यानंतर कॉंग्रेस पक्षाने त्यांना मनपात उमेदवारी दिली. पुढे ठाकरे निवडणूनही आले अन्‌ महापौरही बनले. त्यांची महापौरपदाची कारकिर्द गाजली. त्यानंतर भाजपाची मनपात सत्ता आली व विकास ठाकरे विरोधी पक्ष नेते झाले. दरम्यान, 2009 साली ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधान पून्हा निवडणूक लढविली. त्यात त्यांचा पराभव झाला. 2014 मध्ये पुन्हा ते पश्‍चिम नागपुरातून रिंगणात उतरले. मात्र सुधाकर देशमुखांनी त्यांना हरविले. नुकत्याच झालेल्या लोकसभेत शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना शहराचे नेतृत्व करायचे होते. त्यामुळे पश्‍चिम नागपूरातील मोट बांधण्याची त्यांना उत्तम संधी मिळाली. याच संधीचे सोने करत विकास ठाकरे यांनी विजय स्वत:कडे खेचून आणला. विकास ठाकरे सामान्य माणसासारखे जगतात. ते माजी खासदार विलास मुत्तेमवार यांचे जवळचे आहेत. पक्षात त्यांची एक सामन्य कार्यकर्ता म्हणून असलेली प्रतिमा यांना फायद्याची ठरली.

विजयाची चाहुल अन्‌ `पंजा'चा जल्लोष
सेमेनरीहिल्सच्या निसर्गरम्य परिसरात झालेल्या मतमोजणीत कॉंग्रेसचा विजय होत असल्याची चाहुल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना लागली. अन्‌ एसएफएस महाविद्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरूवात झाली. पहिल्या फेरीत भाजपाचे उमेदवार आघाडीवर असल्याचे पाहून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला. मात्र, त्यानंतर दुसऱ्या फेरीत विकास ठाकरे यांनी मताधिक्‍य मिळविले अन्‌ बघता बघता कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी गदी होऊ लागली. "लीड' वाढली अन्‌ कार्यकर्त्यांनी विजय निश्‍चित असल्याचे मानत "वा रे... पंजा... आ... गया पंजा...' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. फटाक्‍यांची आतशबाजी, ढोल ताशाचा गजर अन्‌ कार्यकर्त्यांचा जल्लोषात विकास ठाकरे यांची विजय यात्रा निघाली.

मी अनेक पराजय बघितले. मात्र कधीही हरलो नाही. मी येथील मतदारांशी कायम संपर्कात होतो. येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या सातत्याने सोडविल्या आहेत. म्हणूनच मला स्टार प्रचारकाची गरज पडली नाही. राज्यात भाजपाचे सरकार असल्याने येथील आमदारांना मतदार संघाकडे लक्ष देण्यास वेळ नव्हता. म्हणूनच मतदारांनी त्यांना नाकारले. माझ्या मेहनतीला कॉंग्रेस परिवाराची प्रबळ साथ मिळाली. याची मला जाण होती म्हणूनच मी पश्‍चिम मतदार संघात लढण्याचा निर्णय घेतला. हा दिवसरात्र काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विजय आहे. फक्‍त ईव्हीएमच्या जागी बॅलेट असते तर मी मोठ्या फरकाने विजयी झालो असतो.
-विकास ठाकरे (विजयी उमेदवार, कॉंग्रेस).

पश्‍चिम नागपूरचे आजपर्यंतचे आमदार
1962-सुशीला बलराजल (कॉंग्रेस)
1967 -सुशीला बलराज (कॉंग्रेस)
1972-सुशीला बलराज (कॉंग्रेस)
1978-भाऊ मुळक (कॉंग्रेस)
1980-गेव्ह आवारी (कॉंग्रेस)
1958-गेव्ह आवारी (कॉंग्रेस)
1990-विनोद गुडधे पाटील (भाजपा)
1995-विनोद गुडधे पाटील (भाजपा)
1999-देवेंद्र फडणवीस (भाजपा)
2004-देवेंद्र फडणवीस (भाजपा)
2009-सुधाकर देशमुख (भाजपा)
2014-सुधाकर देशमुख (भाजपा)
2019-विकास ठाकरे (कॉंग्रेस)
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com