विजयसिंह पंडित यांच्यासाठी दोन पुतणे मैदानात  - Vijaysinh Pandit is fortunate , his nephews are with him | Politics Marathi News - Sarkarnama

विजयसिंह पंडित यांच्यासाठी दोन पुतणे मैदानात 

दत्ता देशमुख 
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019


उच्चशिक्षीत असलेले रणवीर आणि पृथ्वीराज पंडित यांनी मतदार संघात तरुणांची मोठी फळी उभा केली आहे. काका विजयसिंह पंडित यांच्यासाठी ते रोज मतदार संघात प्रचार करत आहेत.

बीड : जिल्ह्याच्या राजकारणात आता ‘काका - पुतण्या’ असं म्हटलं तरी काळजात धस्स होण्याचे दिवस असताना राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह पंडित मात्र त्याबाबत नशिबवान ठरले आहेत.

गेवराई विधानसभेच्या रिंगणाची मशागत करणाऱ्या विजयसिंह यांना दोन पुतण्यांची खंबीर साथ मिळत आहे. रणवीर आणि पृथ्वीराज पंडित दोघेही काका विजयसिंह पंडित यांचा जोरदार प्रचार करत आहेत.

राजकारणात ‘काका - पुतणे’ परंपरा जिल्ह्यालाही नवी नाही. मुंडे, क्षीरसागर घराण्यांतील काका - पुतणे वाद सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादीचेच काका खासदार सुनिल तटकरे यांच्या पुतण्याने शिवबंधन बांधले. पण, होऊ घातलेल्या विधानसभेच्या निमित्ताने बीड जिल्ह्यातील गेवराई मतदार संघात सकारात्मक चित्र दिसत आहे.

Image result for Ranveer pandit

 गेवराई मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात उतरण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित मागच्या वर्ष - दोन वर्षांपासून तयारी करत आहेत. त्यांच्या साथीला आता त्यांचे दोन पुतणे खांद्याला खांदा देऊन मदत करत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे चिरंजीव असलेले रणवीर पंडितही काका विजयसिंह पंडित यांच्यासाठी रोज चार - दोन गावांचा दौरा करत आहेत. 

 

परदेशात क्रिडा विषयक पदवी मिळविलेले रणवीर यांनी सुरुवातीला क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून आपला राबता वाढविला. नंतर तरुण मित्रांची फळी जोडून आता थेट प्रचाराला सुरुवात केली आहे. विविध जयंत्या, सार्वजनिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांना हजेऱ्या लावणारे रणवीर पंडित आता रोज चार - दोन गावांत जाऊन काकांचा प्रचार करत आहेत. लहान - थोरांच्या भेटी गाठी घेताना परदेशातून आलेले रणवीर आशिर्वाद घ्यायलाही विसरत नाहीत.

जयभवानी कारखान्याचे माजी अध्यक्ष जयसिंह पंडित यांचे चिरंजीव असलेले पृथ्वीराज हे व्यवस्थापन शाखेचे पदवीधर आहेत. त्यांनीही मतदार संघात तरुणांची मोठी फळी जमविली आहे. लग्नसराईत समर्थकांच्या समारंभांना हजेरी लावणारे पृथ्वीराज देखील रोज नित्याने मतदार संघात चार - दोन गावांत जाऊन पक्षाचे धोरण, पंडित घराण्याने मतदार संघासाठी यापूर्वी केलेल्या कामांचा उहापोह करतात.

Image result for Pruthviraj  pandit  georai

विशेष म्हणजे ज्या काकांसाठी ते मतदान मागत आहेत त्यांच्या विरोधात पृथ्वीराज यांचे सख्खे मामा लक्ष्मण पवार उमेदवार असणार आहेत. तरीही काकांसाठी ‘काहीही, कधीही आणि कोठेही’ अशी या पुतण्यांची भूमिका आहे. म्हणूनच विजयसिंह पंडित यांना विरोधकांनी विचारले तुमच्याजवळ काय आहे तर ते अभिमानाने सांगतील माझ्या साथीला माझे दोन पुतणे ‘रणवीर आणि पृथ्वीराज’ आहेत.
 

 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख