Vijaysinh Mohite Patil trying to win over Nitin Bhargude Patil | Sarkarnama

मोहिते पाटलांकडून खंडाळ्यातील नितीन भरगुडे-पाटलांना  भाजप प्रवेशाची ऑफर 

सरकारनामा
मंगळवार, 13 ऑगस्ट 2019

.

खंडाळा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खंडाळा तालुक्यातील नेत्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी नेत्यांची स्पर्धा लागली आहे.  भाजपचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी मंगळवारी  स्थानिक नेत्यांशी संवाद साधून भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. 

खंडाळा तालुक्यातील नेत्यांचा भाव सध्या वधारला आहे. येथील नाराज राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजप मध्ये घेण्याचा सपाटा भाजपच्या नेत्यांनी लावला आहे. 

 माजी खासदार व भाजपचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी खंडाळ्यात येऊन राजकीय खलबते केली. त्यांनी पळशी तालुका खंडाळा येथे नितीन भरगुडे- पाटील (बापू) यांच्या घरी भेट दिली. यावेळी मोहीते- पाटील यांच्या सोबत आनंदराव शेळके- पाटील, राहुल घाडगे,  अशोक धायगुडे,  राजेंद्र नेवसे,  शिवाजी पवार, सागर जाधव, पोपट मरगजे, तसेच पळशीचे सरपंच, सदस्य व खंडाळा तालुक्यातील पश्चिम भागातील कार्यकर्ते उपस्थित होते. 

 तालुक्यातील पुर्व भागातील माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके पाटील यांच्या भाजप  प्रवेशानंतर पश्चिमेकडील नितीन भरगुडे-पाटील यांचा ही  भाजप प्रवेश होण्याचे संकेत आहेत. त्यासाठी त्यांना मोहिते पाटील यांनी गळ घातला आहे. मोहिते-पाटील व नितीन बापु याची तासभर कमराबंद चर्चा झाली.

यामध्ये त्यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिली. यासोबत नितीन पाटील यांनी वाई मतदारसंघातील विविध प्रश्नाकडे दुर्लक्ष झाल्याचे सांगून खंडाळा तालुक्याला आमदारकी, विधान परिषद यासह इतर संधी दिली गेली नाही.  ही सर्व विकास कामे मार्गी लावण्यासोबतच खंडाळा तालुक्याला आमदारकीची संधी मिळणार असेल तर भाजप प्रवेश्याचा विचार करू, असे ही त्यांनी सांगितले. त्यामुळे आणखी एक राजकीय भूकंप खंडाळा तालुक्यात होणार हे निश्चित आहे.

काल विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खंडाळ्यातील त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांचा कौल अजमावला होता. सर्वानीच त्यांना आम्ही तुमच्यसॊबत आहोत त्यामुळे तुम्ही भाजपमध्ये जावे असा आग्रह ही कार्यकर्त्यांनी धरला.   

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख