विजयसिंह पंडित यांनी गर्दी तर जमवून दाखविली आता.... - Vijaysingh Pandit demonstrates his strength | Politics Marathi News - Sarkarnama

विजयसिंह पंडित यांनी गर्दी तर जमवून दाखविली आता....

दत्ता देशमुख 
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी भव्य दुचाकी फेरी आणि सभेला गर्दी जमवून ताकद दाखवून दिली. 

बीड : शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे उमेदवार विजयसिंह पंडित यांनी दुचाकी फेरी आणि सभेला गर्दी जमवून ताकद दाखवून दिली. आता या गर्दीचे मतांत परिवर्तन होणार का हे महत्वाचे आहे. तर, मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही येथे महाजनादेश यात्रा होत आहे. त्यात त्यांचे विरोधक आमदार लक्ष्मण पवार किती गर्दी जमविणार, हेही पाहणे महत्वाचे आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसची खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेत्वाखालील शिवस्वराज्य यात्रा मागचे तीन दिवस जिल्ह्यात येऊन गेली. गेवराई मतदार संघातील सभा रविवारी झाली. श्री. कोल्हे यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी मंत्री प्रकाश सोळंके, प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित आदींच्या उपस्थितीत झालेल्या यात्रेच्या स्वागताची आणि सभेच्या यशस्वीततेची जबाबादारी उमेदवार असणाऱ्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या खांद्यावर होती.

पंडित यांनीही दौरा येतातच मतदार संघ पिंजून काढला आणि बैठका घेऊन सभेला उपस्थितीचे आवाहन केले. तसेच यात्रेचे स्वागतासाठी दुचाकी फेरीचे नियोजन केले. सभेसाठी भव्य वॉटरप्रुफ मंडप उभारण्यात आला. दरम्यान, स्वागतासाठी दुचाकींची निघालेली भव्य फेरीने गेवराई तालुक्याचे लक्ष वेधून घेतले. तर, सभेलाही त्यांच्या अपेक्षेइतकी गर्दी जमली. 

दरम्यान, एकूणच विजयसिंह पंडित यांनी गर्दी जमविण्याचे शिवधनुष्य लिलया पेलले असले तरी आता निवडणुकीत याचे मतांत परिवर्तन करण्यात ते यशस्वी होतात का, याकडे लक्ष आहे. तर, रविवारच्या सभेच्या आणि दुचाकीफेरीच्या गर्दीची चर्चा होत असतानाच आता मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रेची सभा गेवराईतच होत आहे. या सभेला आमदार लक्ष्मण पवार कशी गर्दी जमवितात याकडेही लक्ष आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख