पराभवानंतरही विजयसिंह पंडित यांचा जनसंपर्क तितकाच दमदार...

पराभवानंतरही विजयसिंह पंडित यांचा जनसंपर्क तितकाच दमदार...

बीड : " अविरत - अविचल, अखंडीत मी ' अशा विजयसिंह पंडित यांच्या फोटोंसह त्यांच्याबद्दलच्या पोस्ट सध्या त्यांचे समर्थक सोशल मिडीयातून व्हायरल करत आहेत. तसे पाहता ही विशेषणे त्यांच्यासाठी लागूही पडत आहेत. आयुष्यात पहिल्यांदाच पराभव पहाव्या लागलेल्या विजयसिंह पंडित यांच्या कामातील व संपर्कातील सातत्य पराभवानंतरही कायम आहे. मागच्या काही वर्षांप्रमाणे यंदाही त्यांच्या पुढाकाराने " राष्ट्रवादी शिवजन्मोत्सव सोहळा ' होत आहे. सहा दिवसांत भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. 

जिल्हा परिषद सदस्य असलेले विजयसिंह पंडित यांनी राजकीय आयुष्यात पंचायत समिती सदस्य, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा परिषदेचे सभापती आणि नंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असे चढते क्रम गाठले. विशेष म्हणजे, एकाच वेळी चकलांबा आणि पाचेगाव या दोन गटातून विजयाचा विक्रमही त्यांनी केला. दरम्यान, मागच्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या विजयसिंह पंडित यांना आयुष्यात पहिल्यांदाच पराभवाचे तोंड पहावे लागले. मात्र, प्रतिस्पर्धी उमेदवाराचे विजयाचे मताधिक्‍क्‍य त्यांनी दहा पटींनी घटविले. 

मतदार संघात सार्वजनिक, वैयक्तिक, शेतीच्या उपक्रमांना उपस्थिती लावणारे विजयसिंह पंडित हे सामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमी रस्त्यावरही उतरतात. पाठपुराव्यासाठी शासकीय कार्यालयांचे उंबरठेही झिजवितात. मागच्या चार वर्षांपासून ते सर्वधर्मीय युवकांच्या गळ्यातील ताईत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या प्रमाणावर साजरी करतात. बीड व गेवराईकरांना त्यांनी शिवपुत्र संभाजी व जाणता राजा या महानाट्यांचे प्रयोग मोफत उपलब्ध करुन दिले. मागच्या वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या राष्ट्रपुरुषांचा भव्य जयंती सोहळाही त्यांनी आयोजित केला होता. 

पराभवानंतरही त्यांच्या कामाचे सातत्य कायम आहे. "गेवराई एके गेवराई ' चा पाढा गिरवत विजयसिंह पंडित यांनी जिल्हा परिषद सभापती निवडीत दोन्ही विरोधकांचे हिशोब चुकते केले. यंदाही त्यांच्या वतीने ता. 12 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी या काळात भव्य शिवजन्मोत्स सोहळा होत आहे. यात अमोल मिटकरींचे शिवव्याख्यान, तालुकावासियांसाठी मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर, खुल्या रांगोळी स्पर्धा, राज्यस्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा होणार आहेत. तसेच शोभायात्रा व अभिवादन फेऱ्याही भव्य निघतील असे नियोजन आहे. विजेत्यांना मोठ्या प्रमाणावर रोख बक्षीसेही दिली जाणार आहेत. 

या शिवजन्मोत्सव सोहळ्यातील कार्यक्रमांसाठी राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, राज्यमंत्री संजय बनसोडे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर आमदार बाळासाहेब आजबे आदी नेतेही हजेरी लावणार आहेत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com