विजया रहाटकर : दिल्लीच्या राजकारणात औरंगाबादचा ठसा

भाजपच्या राष्ट्रीय महिला मोर्चाची जबाबदारी गेली सहा वर्षे सलगपणे सांभाळणाऱ्या विजया रहाटकर यांनी आपल्या कार्यशैलीने दिल्लीच्या राजकारणातही ठसा उमटवला आहे. कन्याकुमारीपासून ते श्रीनगरपर्यंत सतत पक्षाच्या वाढीसाठी धावपळ करणाऱ्या विजयाताई निवडणुकीच्या प्रत्येक रणभूमीत आघाडीवर असतात. महिला दिनानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा हा परिचय. त्यांचा हा प्रवास त्यांच्याच शब्दांत
vijay rahatkar
vijay rahatkar

औरंगाबादः महिलांनी राजकारणात यावे, की नाही याबद्दल अनेक मतमतांतरे असू शकतील. पण केवळ काठावर बसून सामाजिक प्रश्न सोडवण्याच्या गप्पा मारता येतील पण प्रत्यक्षात राजकारणात आल्याशिवाय ते सोडवता येत नाहीत हा माझा अनुभव. पुणे विद्यापीठातून एम.ए. पुर्ण केल्यानंतर एमपीएससीची परीक्षा दिली आणि पास झाले. 

उपजिल्हाधिकारी म्हणून निवड देखील झाली, तो पर्याय स्वीकारून प्रशासकीय सेवेच्या माध्यमातून देखील लोकांची कामे करता आली असती पण ती करत असतांना मर्यादा आणि बंधने होती. संसाराचा राहाटगाडा हाकत असतांना चांगल्या पदाची सरकारी नोकरी सोडून राजकारणात जाण्याचा निर्णय धाडसी होता. पती, सासु-सासऱ्यांची परवानगी मिळणे महत्वाचे होते, मुलीची देखील जबाबदारी होती. पण माझ्या इच्छेला कुटुंबाच्या पाठबळाचे पंख मिळाले आणि मी महिला व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचे ध्येय घेऊन राजकारणात आले.

बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तशी माझी पाऊले राजकारणाकडे वळत असल्याचे माझ्या घरच्यांच्या लक्षात आले होते. औरंगाबादेत ज्या धावणी मोहल्ला भागात राहायचे तेथील, पाणी, कचरा, वीज या प्रश्नावर मी थेट संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून जाब विचारायचे. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यामुळे ते प्रश्नही सुटायचे.

१९९५ मध्ये माझ्या राजकीय कारकर्दीला सुरूवात झाली, महापालिका निवडणुकीत उमेदवारी मिळावी यासाठी भाजप पक्षाकडे प्रयत्न सुरू केले. मुलाखत दिली, निवडणुक लढवण्याचा अनुभव नसल्यामुळे मुलाखत वगैरे प्रकार माझ्यासाठी नवा होता. त्यामुळे विचारलेल्या सगळ्या प्रश्नांना तडकफडक भाषेत उत्तरे दिली. आपली मुलाखत काही चांगली झाली नाही, त्यामुळे उमेदवारी मिळणार नाही असे मनाशी ठरवून मी घरकामात गुंतले होते. आणि एकदिवस सासरेबुवांनी पेपर वाचला, त्यात मला उमेदवारी जाहीर झाली होती.

किराणचावडी वार्डातून निवडणूक लढले, पण पराभव झाला. पराभवाने अनेकदा माणसं खचून जातात, पण माझ्या बाबती नेमकं उलटं घडल. मी आणखी जोमाने पक्षाच्या कामात स्वःताला गुंतवूण घेतले. तेव्हाचे महामंत्री शरदभाऊ कुलकर्णी यांनी माझ्यावर युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली, त्यानंतर पक्षाता माझे प्रमोशन होत गेले, राज्य महिला मोर्चाचे अध्यक्षपद, वीज मंडळाच्या समितीवर नियुक्ती या माध्यमातून राज्यभरात फिरण्याचा योग आला.

समाजासाठी विशेषता महिलांसाठी खूप काही करण्यासारखे असल्याची जाणीव या निमित्ताने झाली. संघटनेचे काम करत असतांना २००० च्या महापालिका निवडणुकीत पक्षाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आणि ज्योतीनगर वार्डातून माझ्या पहिल्या राजकीय विजयाची सुरूवात झाली. लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाच वर्षात झापाटून काम केले आणि दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून २००५ मध्ये निवडूण आले. प्रभाग समिती, स्थायी समिती अध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि राजकारणात घट्ट पाय रोवून उभी राहिले.

गृहणी ते महापौर...

सामान्य कुटुंबातील गृहिणी राजकारणात आल्यानंतर या शहराची प्रथम नागरिक म्हणजेच महापौर झाली. २००७ मध्ये भाजपच्या नेत्यांनी माझ्या कामावर विश्वास दाखवला आणि मला शहरातील प्रश्न सोडवण्याची संधी महापौर पदाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली. तीन वर्षाच्या कालावधीत रस्ते, वीज, पाणी हे मुलभूत प्रश्न सोडवण्यावर भर दिला. 

पाण्यासाठी महिलांना करावी लागणारी पायपीट मी अनुभवलेली असल्यामुळे महापौर झाल्यानंतर या प्रश्नाला प्राधान्य दिले. महापौर पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर राजीनामा दिला आणि आता पुन्हा महापालिकेची निवडणूक लढवायची नाही असा निर्धार केला. तो घेताना पक्षात वर्षानुवर्ष कष्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी हा माझा हेतू होता. राजकारणात प्रामाणिकपणा आणि निष्ठेला महत्व असते, ती कायम असेल तर तुमच्यासाठी यश आणि संधी चालून येतात.

महापौरपदाचा राजीनामा देऊन महिना उलटत नाही तोच भाजपच्या केंद्रातील नेतृत्वाकडून बोलावणं आलं. राष्ट्रीय महिला मोर्चाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. औरंगाबाद सारख्या शहरातील एक सामान्य स्त्री थेट राष्ट्रीय राजकारणात धडक देऊ शकते हे सिध्द झाले.

तेव्हाच्या महामंत्री स्मृती इराणी यांच्यासोबत देशभरात फिरूण महिलांचे प्रश्न समजून घेता आले. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांमध्ये ते मांडता आले. विशेष म्हणजे २००१ मध्ये गुजरात सरकारने राबवलेल्या मिशन मंगलम मध्ये सरचिटणीस म्हणून मी केलेल्या सूचनांचा समावेश देखील करण्यात आला होता.

लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्यानंतर संघटनात्मक जबाबदाऱ्या देखील तितक्याच महत्वाच्या असतात याची जाणीव झाली. पोटतिडकीने महिलांसाठी केलेले काम, पक्षाची ध्येय, धोरण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचे प्रयत्न यामुळे अनेक नव्या जबाबदाऱ्या येत गेल्या. सरचिटणीस म्हणून काम करत असतांना पक्षाने पुन्हा माझ्यावर विश्वास टाकत माझी थेट राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड केली. विशेष म्हणजे मला हे टिव्ही वरील बातम्यातून कळाले.

राज्यानेही भरभरून दिले..

राष्ट्रीय राजकारणात संघटनात्मक महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत असतांना महाराष्ट्र राज्याने देखील मला भरभरून दिले. भाजप राष्ट्रीय महिला मोर्चाची अध्यक्ष म्हणून चेन्नईत एका कार्यक्रमात असतांना तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोन आला आणि महिलांच्या प्रश्नावर तुम्ही देशभरात काम करत आहात, तुमच्या या अनुभवाचा फायदा महाराष्ट्रालाही होऊ द्या असे म्हणत माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आता खऱ्या अर्थाने समाजातील पिडित, शोषित महिलांसाठी काहीतरी चांगले काम करता येईल याचे समाधान होते. महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा राज्‍यभरातील ५ हजार केसेस आयोगाकडे प्रलंबित होते. त्यातील बहुतांश प्रकरणी निकाली काढण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. महिला आयोग आपल्या दारी ही मोहिम राबवली, दुर्गम आदिवासी भागात देखील आयोगाच्या सुनावणी आणि काम पोहचवले. कामाचा झपाटा आणि तळमळ पाहून मला दुसऱ्यांदा आयोगाच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली.

राजकारणाकडे वाईट दृष्टीकोनातून पाहू नका, हेतू शुद्ध असेल, प्रामाणिकपणा आणि काम करण्याची जिद्द असेल तर महिला, तरुणी राजकारणात मोठी झेप घेऊ शकतात. त्यामुळे राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर महिला आणि सर्वसामान्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर राजकारण हे एक प्रभावी माध्यम आहे याचा नव्या पिढीतील विशेषःत तरुणी, महिलांनी निश्चित विचार केला पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com