कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात साखर कारखान्यांनी प्रतिटन उसाला किती दर द्यावा, यासाठी उद्या (शनिवार) सायंकाळी येथील शासकीय विश्रामगृहात शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या अध्यक्षांची बैठक होणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सोमवारी (ता. 2) ऑनलाईन ऊस परिषद होणार आहे. तत्पूर्वीच साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक घेवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पालकमंत्री सतेज पाटील आज भेट घेतली. ऊस साखर कारखाने सुरु करण्याआधी उसाच दर निश्चित करावा, अशी मागणी केली. यावेळी, श्री पाटील यांनी साखर कारखान्यांच्या अध्यक्षांशी संवाद साधून उद्याची बैठक निश्चित केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासह ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे यंदाची ऊस परिषद ऑनलाईन ऊस परिषद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची यंदाची ऊस परिषद ऑनलाईन होणार असल्याची घोषणा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा. पाटील यांनी आज केली आहे. त्यानंतर या सर्वांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेवून सर्व साखर कारखानदारांची बैठक घेवून तोडगा काढण्याचे आवाहन केले. त्यानुसार पालकमंत्री सतेज पाटील यांनी शेतकरी संघटना व साखर कारखानदारांची बैठक घेण्यासाठी कारखानदारांशी संवाद साधून नियोजन केले आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आणि जिल्ह्यातील गळीत हंगाम कोणत्याही अडचणीशिवाय सुरु व्हावा, यासाठी चर्चेचा पर्याय खुला आहे. त्यामुळे उद्याच्या बैठकीत संघटनेचे कार्यकर्ते आणि कारखान्यांचे अध्यक्षांसमेवत ही बैठक घेवून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल.
पालकमंत्री सतेज पाटील, कोल्हापूर.
...

