Vidharbha Shivsena politics | Sarkarnama

शिवसेनेला विदर्भात भाजपला दूर ठेवण्याच्या खेळीमुळे फटका 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 मार्च 2017

शिवसेनेने भाजपला दूर ठेवण्याची खेळी खेळली; परंतु याचा फटका विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये शिवसेनेला सहन करावा लागला. 

नागपूर: शिवसेनेने भाजपला दूर ठेवण्याची खेळी खेळली; परंतु याचा फटका विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये शिवसेनेला सहन करावा लागला. 

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रदेश पातळीवर ठरलेल्या धोरणाचा स्थानिक नेत्यांनी कित्ता गिरवला नाही. कॉंग्रेसने भाजप, सेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस अशा सर्व पक्षांना सोबत घेऊन सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न विदर्भात केला. यामुळे संख्याबळ नसतानाही कॉंग्रेसला यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळविता आले. राष्ट्रवादी कॉंग्रेसला विदर्भात कुठेही अध्यक्षपद मिळविता आले नाही तरी सभापती पदांच्या जागा पटकाविता आल्या. 
शिवसेनेने विदर्भात कुठेही भाजपशी जवळीक साधली नाही. याउलट भाजपला दूर ठेवण्यासाठी वेळ पडल्यानंतर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करून सत्तेत राहण्याचा प्रयत्न केला. यामुळे अमरावती जिल्हा परिषदेत तीनच सदस्य असताना सेनेला उपाध्यक्षपद कॉंग्रेसच्या मदतीने मिळू शकले. याशिवाय विदर्भात सेनेच्या हातात काहीच लागले नाही. 

बुलडाणा व यवतमाळ जि.प.मध्ये भाजपसोबत युती झाली असती तर सेनेला उपाध्यक्षपद मिळू शकले असते. परंतु भाजपसोबत काडीमोड घेण्याच्या निर्णयाने विदर्भात तरी सेनेला नुकसान सहन करावे लागल्याचे दिसून येत आहे. यवतमाळ जिल्हा परिषदेत सेना सर्वांत मोठा पक्ष असताना सुद्धा सत्तेपासून सेनेला दूर राहावे लागले. महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांना भाजप, कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचा विश्‍वास जिंकता आला नाही. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख