भगव्या लाटेतही विदर्भात महायुतीला दोन जागांवर फटका

भगव्या लाटेतही विदर्भात महायुतीला दोन जागांवर फटका

नागपूर : देशभरात दिसलेल्या भगव्या लाटेचा प्रभाव विदर्भातही जाणवला. या लाटेमुळे कॉंग्रेस- राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची दाणादाण उडाली; मात्र, या प्रभावातही भाजप-शिवसेना युतीला दोन जागांचा फटका बसला आहे. मागील निवडणुकीत विदर्भातील सर्वच्या सर्व दहाही जागा जिंकणाऱ्या युतीला अमरावती व चंद्रपूर या दोन मतदारसंघावर पाणी सोडावे लागले आहे. यातील चंद्रपूरची जागा कॉंग्रेसने, तर अमरावतीची जागा कॉंग्रेस-राकॉं आघाडी समर्थित नवनीत राणा यांनी जिंकली आहे. अन्य आठही जागा युतीने जिंकल्या.

विजयी उमेदवार - नितीन गडकरी, कृपाल तुमाने, रामदास तडस, अशोक नेते, भावना गवळी, संजय धोत्रे, प्रतापराव जाधव

प्रमुख पराभूत - माणिकराव ठाकरे, आनंदराव अडसूळ, प्रकाश आंबेडकर, नाना पटोले, हंसराज अहीर

नागपूर 
साऱ्या देशाचे लक्ष लागून असलेली नागपूरची जागा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी कायम राखत भाजपच्या खात्यात टाकली. येथे कॉंग्रेसने भाजपातून आलेल्या नाना पटोले यांच्यावर बाजी लावली होती. मात्र, मोदी सरकारच्या काळात नागपुरात झालेल्या विकासाचे श्रेय मतदारांनी गडकरींच्या पारड्यात टाकले. 

यवतमाळ-वाशीम
नागपूरप्रमाणेच साऱ्याचे लक्ष लागलेली जागा होती, यवतमाळ-वाशीम मतदारसंघाची. येथे विद्यमान खासदार शिवसेनेच्या भावना गवळी यांना कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आव्हान दिले होते. येथे "ऍण्टिइनकम्बन्सी'चा फटका भावनाताईंना बसेल असे बोलले जात होते. पण, प्रत्यक्षात ठाकरे यांची जादू चालली नाही व भावना गवळी यांनी ही जागा कायम राखली.

रामटेक
रामटेक मतदारसंघातही शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी कॉंग्रेसच्या किशोर गजभिये यांना परास्त केले. माजी आयएएस अधिकारी असलेल्या गजभिये यांनी या लढतीत चुरस निश्‍चितच निर्माण केली होती. पण, मोदी लाटेचा पुरेपूर फायदा तुमानेंना झाला. 

गडचिरोली-चिमूर
राज्यात सर्वाधिक मतदानाचा आकडा गाठणाऱ्या गडचिरोली-चिमूर मतदारसंघात भाजपच्या अशोक नेते यांनी ही जागा कायम राखली. येथे त्यांनी कॉंग्रेसच्या डॉ. नामदेव उसेंडी यांच्यावर पहिल्या फेरीपासूनच आघाडी कायम ठेवत विजय मिळविला. 

वर्धा
वर्धा मतदारसंघातही भाजपच्या रामदास तडस यांनी कॉंग्रेसच्या चारुलता टोकस यांना पराभूत केले. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभाताई राव यांच्या कन्या असलेल्या टोकस यांच्यापेक्षा मतदारांनी त्यांना सहज उपलब्ध होणाऱ्या तडसांना आपली पसंती दिली.

बुलडाणा
बुलडाणा मतदारसंघात शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांनी त्यांची जागा कायम राखली. येथे त्यांनी राष्ट्रवादीच्या डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर विजय मिळविला. अकोला मतदारसंघाकडेही साऱ्यांचे लक्ष लागले होते. राज्यात तिसरी शक्ती म्हणून उदयाला आलेल्या वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश
आंबेडकर हे येथे उभे होते. त्यांच्या विरोधात भाजपचे विद्यमान खासदार संजय धोत्रे हे होते. कॉंग्रेसचे हिदायत पटेल हेसुद्धा येथे रिंगणात होते, मात्र लढत धोत्रे व आंबेडकर यांच्यातच झाली व धोत्रे यांनी पहिल्यापासून आंबेडकरांना आघाडी कायम ठेवत मोठ्या आघाडीने हरविले.

भंडारा-गोंदिया
विदर्भातील दहाही जागांवरचे प्रमुख पक्षांचे सर्व उमेदवार जनतेला तसे परिचित होते. अपवाद फक्त भाजपचे भंडारा-गोंदिया मतदारसंघातील उमेदवार सुनील मेंढे. राष्ट्रवादीचे माजी आमदार नाना पंचबुद्धे यांच्यापेक्षा भंडाऱ्याचा नगराध्यक्ष असलेला हा तरुण चेहरा मतदारांना भावला. पंचबुद्धेसारख्या प्रस्थापित नेत्याला मेंढेंनी पहिल्या फेरीपासून नामोहरम केले व अंतिमतः विजय मिळविला.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com