vidharbha politics | Sarkarnama

विदर्भातील कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक बदल ? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 26 एप्रिल 2017

महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची पीछेहाट झाल्याने विदर्भातील काही जिल्हा कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्‍यता आहे. 

नागपूर : महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसची पीछेहाट झाल्याने विदर्भातील काही जिल्हा कॉंग्रेसमध्ये संघटनात्मक बदल होण्याची शक्‍यता आहे. 

प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी विदर्भातील जिल्हाध्यक्ष व ब्लॉक अध्यक्षांची बैठक नुकतीच मुंबईत घेतली. नुकत्याच संपलेल्या महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला फारसे चांगले यश मिळविता आले नाही. केवळ अमरावती जिल्हा परिषदेत कॉंग्रेसने स्वबळावर सत्ता संपादन केली आहे. यवतमाळमध्ये भाजपशी आघाडी करून यवतमाळ जि. प. अध्यक्षपद मिळविले आहे. इतर कोणत्याही जिल्ह्यात कॉंग्रेस सत्तेत नाही. महापालिकेची स्थिती यापेक्षाही वाईट आहे. 

नागपूर व अकोला महापालिकेत कॉंग्रेसला सपाटून मार खावा लागला. नागपूरमध्ये कॉंग्रेसचे संख्याबळ 41 वरून 29 वर आले. अकोला महापालिकेतही कॉंग्रेसची स्थिती चांगली नाही. नुकत्याच संपलेल्या चंद्रपूर महापालिकेतही कॉंग्रेसचे संख्याबळ 25 वरून 12 आले आहे. 

अनेक महापालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला अंतर्गत गटबाजीमुळे फटका बसल्याची कबुली या वेळी पदाधिकाऱ्यांनी अशोक चव्हाण यांच्यापुढे दिली. अनेकांनी कॉंग्रेसच्या नेत्यांनी अधिकृत उमेदवाराविरोधात केलेल्या कामाचे पुरावेही सादर केले. 

या वेळी प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या विरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे तसेच पक्षाशी एकनिष्ठ राहणाऱ्यांना संघटनेत स्थान देण्याचे ठरविले असल्याचे सांगितले. यामुळे येत्या काही दिवसात विदर्भातील जिल्हा कॉंग्रेसमध्ये फेरबदल होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख