Vidharbha BJP | Sarkarnama

विदर्भातील पाच आमदारांवर भाजपची नजर 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 24 मार्च 2017

भारतीय जनता पार्टीने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विदर्भातील पाच आमदारांवर जाळे फेकण्याचे सुरू केले आहे. यात माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, मनोहर नाईक, रवी राणा यांचा समावेश आहे. 

नागपूर : भारतीय जनता पार्टीने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विदर्भातील पाच आमदारांवर जाळे फेकण्याचे सुरू केले आहे. यात माजी मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, यशोमती ठाकूर, मनोहर नाईक, रवी राणा यांचा समावेश आहे. 

शिवसेनेचा विरोध कमी न होता उलट वाढत असल्याने भाजपसाठी शिवसेना आता "गले की हड्डी' बनली आहे. यातून मार्ग काढण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार फोडणे किंवा मध्यावधी निवडणुका घेऊन काही आमदारांना शुद्ध करून घेण्याचे पर्याय भाजपसमोर आहेत. विदर्भात भाजपला सर्वाधिक 44 आमदार मिळाले आहेत. विदर्भातील उर्वरित 18 आमदारांमध्ये कॉंग्रेसचे सर्वाधिक 10 आमदार आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकमेव मनोहर नाईक निवडून आलेले आहेत. यापैकी किमान आमदारांना भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मनोहर नाईक यांनी यवतमाळ जिल्हा परिषदेत भाजपसोबत आघाडी केली आहे. त्यांचा पुसद मतदारसंघावर चांगलाच प्रभाव असून नाईक घराण्याचा हा पारंपरिक मतदारसंघ राहिला आहे. 

चंद्रपूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे एकमेव आमदार विजय वडेट्टीवार यांना लाल दिव्याची अद्यापही आस आहे. विद्यमान भाजप आमदाराचा पराभव करून त्यांनी ब्रम्हपुरी मतदारसंघातून विजय मिळविला आहे. नागपूर जिल्ह्यातील कॉंग्रेसचे एकमेव आमदार सुनील केदार यांना भाजपात घेतल्यास सहकार क्षेत्र ताब्यात येईल. यासाठी केदार यांना भाजपात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सावनेरमधून केवळ एकदाच भाजपला विजय मिळाला होता. हा अपवाद सोडल्यास गेल्या 20 वर्षांपासून सुनील केदार निवडून येतात. 

अमरावती जिल्ह्यातील तिवसा मतदारसंघातील यशोमती ठाकूर विदर्भातील कॉंग्रेसच्या एकमेव महिला आमदार आहेत. भाजपने गेल्या निवडणुकीत त्यांच्याच बहिणीला उमेदवारी देऊन त्यांना पराभूत करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु या डावपेचाला यशोमती ठाकूर पुरून उरल्या. आता त्यांनाच भाजपात घेऊन हा मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत असलेले रवी राणा यांना भाजपचे दार उघडे होऊ शकते; परंतु अमरावती जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांचा राणांच्या प्रवेशाला विरोध असल्याने मोहीम लांबणीवर पडत आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख