तयारी विधानसभेची : विखे-थोरातांच्या संघर्षामुळे टोकाची चुरस 

तयारी विधानसभेची : विखे-थोरातांच्या संघर्षामुळे टोकाची चुरस 


कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलणार आहेत. विखेंमुळे भाजपला ताकद मिळण्याची चर्चा आहे. थोरातांनादेखील आपले वर्चस्व सिद्ध करायचे आहे. या दिग्गजांच्या संघर्षामुळे बहुतांश विधानसभा मतदारसंघात या वेळी प्रथमच टोकाची चुरस असेल. 

अकोल्यात आमदार वैभव पिचड यांनी गेल्या वेळी अनेक विरोधी उमेदवार निर्माण करण्यात यश मिळवले होते. मतविभागणी करून अलगदपणे निवडून येण्याचा त्यांचा फंडा या वेळीही यशस्वी होईल का, याबाबत उत्सुकता आहे. संगमनेरमध्ये थोरात यांनी सक्षम विरोधक निर्माण होऊ दिला नाही. गेल्या वेळेपेक्षा विक्रमी मताधिक्‍याचा त्यांचा प्रयत्न असेल. अर्थात, विखे हेही संगमनेरमध्ये शक्ती पणाला लावतील. थोरातही शिर्डीत विखेंना शह देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतील. त्यामुळे संगमनेर आणि शिर्डी या मतदारसंघांकडे राज्याचे लागलेले असेल. 

कोपरगावात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची संभाव्य उमेदवारी आमदार स्नेहलता कोल्हे आणि आशुतोष काळे यांच्यापैकी कोणाला फायदेशीर ठरेल, यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. श्रीरामपूर या राखीव मतदारसंघात लोकसभेच्या रिंगणातील भाऊसाहेब वाकचौरे आणि भाऊसाहेब कांबळे यांच्यासह भाजप व कॉंग्रेसकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. राखीव असूनही या मतदारसंघात चांगली चुरस राहील, असे सध्याचे चित्र आहे. नेवाशात शंकरराव गडाख या वेळीही क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या तिकिटावर लढतील. तेथे त्यांना आमदार बाळासाहेब मुरकुटे, साहेबराव घाडगे, पांडुरंग अभंग, विठ्ठल लंघे यांच्यापैकी दोघांशी सामना करावा लागणार आहे. गेल्या वेळीप्रमाणे चंद्रशेखर घुले नेवाशात किती लक्ष घालतील, यावरही बरेच काही अवलंबून आहे. 

असे आहेत पक्षनिहाय इच्छुक 
भाजप - स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. वसंत जमधाडे, बाळासाहेब तोरणे, राजेश चौधरी, साहेबराव नवले, शाळिग्राम होडगर, राजेंद्र रहाणे, अशोक भांगरे, सुनीता भांगरे, डॉ. राजेंद्र पिपाडा, विजय वहाडणे. 
कॉंग्रेस - बाळासाहेब थोरात, भानुदास मुरकुटे, हेमंत ओगले, बाळासाहेब देशमुख, लहू कानडे, भाऊसाहेब कांबळे, ऍड. संतोष कांबळे. 
राष्ट्रवादी-  वैभव पिचड, आबासाहेब थोरात, पांडुरंग अभंग, विठ्ठल लंघे, अभय शेळके, भानुदास मुरकुटे, आशुतोष काळे. 
शिवसेना- डॉ. किरण लहामटे, मधुकर तळपाडे, सतीश भांगरे, शिवाजी धुमाळ, बाबासाहेब कुटे, जनार्दन आहेर, रामदास गोल्हार, साहेबराव घाडगे, कमलाकर कोते, प्रमोद लबडे, राजेंद्र झावरे. 
वंचित आघाडी- संजय सुखदान, डॉ. अरुण साबळे, डॉ. सुधीर साबळे, बापूसाहेब रणधीर, गणपत देशमुख. 
क्रांतिकारी शेतकरी पक्ष- शंकरराव गडाख. 

--- 

असे आहे राजकीय चित्र 

- विखेंमुळे शिर्डी मतदारसंघ होणार भाजपमय. 
- बाळासाहेब थोरातांचा भर मताधिक्‍याच्या वाढीवर. 
- विजय वहाडणेंच्या उमेदवारीचीच कोपरगावात अधिक चर्चा. 
- अकोल्यात पिचड मतविभागणीसाठी प्रयत्नशील राहणार. 
- नेवाशात गडाखांचा "क्रांतिकारी'चा फॉर्म्युला गाजणार. 
- श्रीरामपुरात भाजप व कॉंग्रेसकडे उमेदवारांची भाऊगर्दी. 
- विखे-थोरातांचे सर्व विधानसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com