कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तळ्यात-मळ्यात; लोकसभेच्या निकालाने वाढले ब्लडप्रेशर, राजकीय वर्तुळात चर्चा

लोकसभा निवडणुकीत आपापल्या विधानसभा क्षेत्रात प्रचाराची धुरा खांद्यावर घेणाऱ्या भाजपच्या तिन्ही आमदारांचे आगामी विधानसभा निवडणुकीकरिता तिकीट पक्के असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे, भाजपच्या अभूतपूर्व यशाने ब्लडप्रेशर वाढलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांचे तळ्यातमळ्यात आहे. भाजपच्या विद्यमान आमदारांना टक्कर देणाऱ्या योग्य उमेदवारांचा शोध पक्षश्रेष्ठी घेतील, हे आता नक्की झाले आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तळ्यात-मळ्यात; लोकसभेच्या निकालाने वाढले ब्लडप्रेशर, राजकीय वर्तुळात चर्चा

गोंदिया : लोकसभा निवडणुकीत आपापल्या विधानसभा क्षेत्रात प्रचाराची धुरा खांद्यावर घेणाऱ्या भाजपच्या तिन्ही आमदारांचे आगामी विधानसभा निवडणुकीकरिता तिकीट पक्के असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे, भाजपच्या अभूतपूर्व यशाने ब्लडप्रेशर वाढलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांचे तळ्यातमळ्यात आहे. भाजपच्या विद्यमान आमदारांना टक्कर देणाऱ्या योग्य उमेदवारांचा शोध पक्षश्रेष्ठी घेतील, हे आता नक्की झाले आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विजय रहांगडाले, अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातून राजकुमार बडोले, तर देवरी-आमगाव विधानसभा मतदारसंघातून संजय पुराम भाजपचे तीन उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने निवडून आले होते. गोंदियात मात्र भाजपचे कमळ फुलले नाही. कॉंग्रेसचे गोपालदास अग्रवाल यांनी मोदी लाटेतही गोंदिया विधानसभेचा गड कायम ठेवला, हे उल्लेखनीय.

दरम्यान, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार सुनील मेंढे यांना मात देण्यासाठी ऐनवेळी कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने माजी शिक्षणमंत्री नाना पंचबुद्धे यांना तिकीट दिले. उघडपणे मोदी लाट ओसरल्याचे जाणवत असतानाच भाजपने तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघात आमदार विजय रहांगडाले, अर्जुनी मोरगाव मतदारसंघातून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या खांद्यावर उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचाराची धुरा टाकली. देवरी-आमगाव विधानसभा क्षेत्र गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात येत असल्याने या क्षेत्राचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचाराची धुरा आमदार संजय पुराम यांच्यावर सोपविली. या तिन्ही आमदारांनी स्वतः प्रचार करीत विजयश्री खेचून आणली. 

त्या-त्या क्षेत्रात या आमदारांची सुनील मेंढे यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून ओळख झाली आहे. पक्षाचे कार्यकर्तेदेखील तसे बोलू लागले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट पक्के असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या तिन्ही आमदारांना तिकीट मिळविण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागणार नाही, असेही बोलले जात आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मताधिक्‍याने हादरलेल्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तळ्यातमळ्यात आहे. गोंदियात विद्यमान आमदार गोपालदास अग्रवाल यांचे तिकीट पक्के असले, तरी लोकसभा निवडणुकीने त्यांनाही धडकी भरली आहे. अन्य तीन विधानसभा क्षेत्रांत भाजपच्या उमेदवारांना टक्कर देणाऱ्या तगड्या उमेदवाराचा शोध घेणे, चाचपणी करणे अन्‌ उमेदवारी पक्की करणे हे आव्हान पक्षश्रेष्ठींसमोर राहण्याची चिन्हे आहेत.

हे उमेदवार रिंगणात असू शकतात.....
- गोंदिया विधानसभा
विनोद अग्रवाल, रमेश कुथे (भाजप), गोपालदास अग्रवाल (कॉंग्रेस)

-तिरोडा-गोरेगाव विधानसभा
विजय रहांगडाले (भाजप), दिलीप बन्सोड, अजय गौर, राजलक्ष्मी तुरकर (तिघेही राष्ट्रवादी कॉंग्रेस)

-अर्जुनी मोरगाव विधानसभा
राजकुमार बडोले (भाजप), मनोहर चंद्रिकापुरे (राष्ट्रवादी कॉंग्रेस), राजेशकुमार नंदागवळी (कॉंग्रेस)

-देवरी-आमगाव विधानसभा
संजय पुराम (भाजप), सहषराम कोरोटे, रामरतन राऊत (दोघेही कॉंग्रेस), रमेश ताराम (राष्ट्रवादी कॉंग्रेस)

विधानसभेतही पाहायला मिळेल पक्षांतर्गत नाराजी
पक्षांतर्गत नाराजीचा सूर ऐन निवडणुकीत पाहायला मिळतो, हा आजवरचा अनुभव आहे. 2019 च्या लोकसभेतही तसे घडले. ऐनवेळी तिकीट नाकारल्याने भाजपचे डॉ. खुशाल बोपचे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, पक्षाने त्यांची नाराजी दूर केल्याने त्यांनी अर्ज मागे घेतला होता. आगामी विधानसभा निवडणुकीतही बंडखोरीची शक्‍यता राजकीय वर्तुळात आहे. पक्षाने तिकीट न दिल्यास गोंदिया विधानसभा क्षेत्रात भाजप उमेदवार तसेच तिरोडा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचा एक उमेदवार अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, येणाऱ्या काळात काय चित्र राहते, हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com