‘वंचित’च्या स्वयंघोषित भावी आमदारांना चाप! बाळासाहेबांचा निर्णय अंतिम राहणार

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत सर्व 48 जागा लढविल्यानंतर आता विधानसभेतही सर्व 288 जागा लढण्याचा निर्धार केला आहे. मात्र, त्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीत स्वयंघोषित भावी आमदारांचे मोठे पीक आले आहे. त्यावर चाप बसविताना अशा प्रकारे कुणीही कुणाचे नाव भावी आमदार, उमेदवार म्हणून परस्पर घोषित केल्यास कारवाई करण्याचा इशारा भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी दिला आहे.
‘वंचित’च्या स्वयंघोषित भावी आमदारांना चाप! बाळासाहेबांचा निर्णय अंतिम राहणार

अकोला : वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत सर्व 48 जागा लढविल्यानंतर आता विधानसभेतही सर्व 288 जागा लढण्याचा निर्धार केला आहे. मात्र, त्यापूर्वीच वंचित बहुजन आघाडीत स्वयंघोषित भावी आमदारांचे मोठे पीक आले आहे. त्यावर चाप बसविताना अशा प्रकारे कुणीही कुणाचे नाव भावी आमदार, उमेदवार म्हणून परस्पर घोषित केल्यास कारवाई करण्याचा इशारा भारिप-बमसंचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी दिला आहे.    

वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर येथे 16 आणि 17 मे रोजी झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीनंतर वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.  बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील सर्व 288 विधानसभा स्वाबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यापैकी 287 विधानसभेतील कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्षांनी सक्त ताकित देताना कुणीही आपले नाव स्वयंघोषित भावी आमदार म्हणून जाहीर करू नये किंवा समर्थकांनीही असा प्रयत्न करू नये. औरंगाबाद पश्‍चिम विधानसभेसाठी अॅड. बाळासाहेब आंबेडकरांनी अमित भुईगळ यांचे नाव जाहीर केले आहे. हा एकमेव अपवाद वगळता कुणीही स्वतःची उमेदवारी जाहीर करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना गंभीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रदेशाध्यक्षांनी दिला आहे.
 
आयातांची प्रतीक्षा
वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणूक काळात अनेक दिग्गज अनुभवी नेते व कार्यकर्ते जवळीक साधण्यास उत्सुक असल्याचे आढळून आले. त्यांना वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश देवून विधानसभा निवडणुकीत यशस्वी उमेदवार देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे कोणत्याही मतदारसंघात स्वयंघोषित उमेदवारांना खपवून घेतले जाणार नाही. अॅड. आंबेडकर हेच उमेदवारांची नावे जाहीर करणार असल्याचेही सोनोने यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

प्रतिस्पर्धी पक्षांच्या कार्यक्रमांना जाण्यास मनाई
पुणे येथील वंचित बहुजन आघाडीच्या राज्यस्तरीय बैठकीत कार्यकर्त्यांना अॅड. आंबेडकर यांनी प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी-भाजपा-सेना यासह इतर कोणत्याही पक्षांच्या कोणत्याही सार्वजनिक अथवा वैयक्तिक कार्यक्रमात सहभागी होऊ नये. पक्षाच्या ध्येय-धोरणांचे प्रामाणिक पालन करावे. वरील नियमांचे पालन न केल्यास कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी दिला आहे. 

लोकशाहीचे सामाजिकरण होण्यासाठी वंचित घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून स्वाभिमानी सत्तेचे स्वप्न साकार करणारे अॅड. आंबेडकर यांच्या नेतृत्वात यशस्वी वाटचाल करावयाची आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचे व त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न राहील. त्यामुळे कुणीही बाळासाहेबांनी जाहीर केल्याशिवाय उमेदवारी घोषित करू नये. 
- अशोक सोनोने, प्रदेशाध्यक्ष, भारिप-बमसं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com