‘वंचित’कडून निवडणूक लढविण्यास इच्छुकांची गर्दी

‘वंचित’कडून निवडणूक लढविण्यास इच्छुकांची गर्दी

अकोला : वंचित बहुजन आघाडीतर्फे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती मंगळवारी घेण्यात आल्यात. जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी मुलाखतीसाठी गर्दी केली होती. तब्बल १२८ जणांनी कार्यकर्त्यांसह उपस्थिती लावली होती. सर्वाधिक ४०जणांनी मूर्तिजापूर तर सर्वात कमी पाच जणांनी अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघासाठी मुलाखती दिल्यात. 

वंचित बहुजन आघाडीने विधानसभेच्या राज्यातील सर्व २८८ जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. अकोला येथे सोमवारी बुलडाणा आणि वाशीम जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्यात. इच्छुकांची गर्दी अधिक झाल्याने अकोला जिल्ह्यातील मुलाखती मंगळवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते अण्णाराव पाटील आणि अशोक सोनोने यांनी घेतल्या. रात्री ८.३० वाजतेपर्यंत इच्छुकांच्या मुलाखती सुरू होत्या. 

अकोला पश्‍चिम ‘एमआयएम’साठी सुटणार?
वंचित बहुजन आघाडीचा घटक पक्ष असलेल्या एमआयएमला अकोला जिल्ह्यातील एक जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी अकोला पश्‍चिम विधानसभा मतदारसंघाचा विचार होऊ शकतो. त्यामुळे या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीतर्फे स्थानिक पातळीवरील अवघ्या पाच जणांनी मुलाखती दिल्यात. सिंधी समाजाचे नेते मनोहर पंजवाणी यांचाही समावेश आहे. या मतदारसंघातून अन्य चार मुल्सिम नेत्यांनी मुलाखतीला हजेरी लावली होती. 

विद्यमान आमदाराच्या विरोधात २९ अर्ज
बाळापूर विधानसभा मतदारसंघातून २००९ व २०१४ मध्ये भारिप-बमसंचे बळीराम सिरस्कार निवडून आले आहेत. यावेळी पक्षातूनच त्यांच्या उमेदवारीला मोठ्याप्रमाणात विरोध होत असल्याचे इच्छुकांच्या मुलाखतीतून दिसून येत आहे. आमदार सिरस्कार यांनी मुलाखत दिली. त्यांच्यासोबतच आणखी २९ जणांनीही या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करीत मुलाखतीला हजेरी लावली. त्यात ‘वंचित’चे प्रदेश प्रवक्ते प्रा. डॉ. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. रहेमान खान, अॅड. संतोष रहाटे आदीं प्रमुख नेत्यांचा समावेश आहे.

अकोला पूर्वमध्ये माजी आमदाराची नाराजी
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातून २६ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज भरले व मुलाखतीला हजेरी लावली होती. मात्र माजी आमदार हरिदास भदे यांनी यावेळी मुलाखत दिली नाही. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकारिणीत स्थान न मिळाल्यामुळे भदे नाराज असल्याची चर्चा पक्षात होती. मंगळवारी त्यांनी मुलाखत न दिल्याने त्यांची नाराजी असल्याचे स्पष्ट झाल्याचे बोलल्या जात आहे. माजी आमदारांनी मुलाखत दिली नसली तरी माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे, जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, महासचिव ज्ञानेश्‍वर सुलताने, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष दामोदर जगताप, माजी अध्यक्ष पुष्पाताई इंगळे, बालमुकुंद भिरड आदींचा समावेश आहे.

अकोटच्या नेत्यांची अकोला पूर्वला पसंती
अकोट विधानसभा मतदारसंघासाठी २७ जणांनी मुलाखती दिल्यात. त्यात जिल्हा परिषद सदस्य शोभाताई शेळके, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सुभाष रौंदळे, माजी जिल्हा कार्याध्यक्ष कासिराम साबळे, मंदा कोल्हे आदींचा समावेश आहे. याशिवाय अकोटवाशी व पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी अकोटसह अकोला पूर्व मतदारसंघासाठीही मुलाखत दिली असून, अकोला पूर्वला त्यांची अधिक पसंती असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाध्यक्षांसोबतच जिल्ह्याचे महासचिव ज्ञानेश्‍वर सुलताने यांनीही अकोला पूर्व व अकोट अशा दोन्ही ठिकाणी मुलाखती दिल्यात. 

मूर्तिजापूर ‘वंचित’चा पसंतीचा मतदारसंघ
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीतील सर्वात मोठा घटक असलेल्या बाैद्ध समाजातील नेत्यांनी या मतदारसंघाला अधिक पसंती दिली. तब्बल ४० इच्छुकांनी या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी आपणच कसे सक्षम आहो, हे मुलाखत घेणाऱ्या नेत्यांना पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. येथून मुलाखत देणाऱ्या नेत्यांमध्ये माजी जि.प. अध्यक्ष पुष्पाताई इंगळे, ‘वंचित’चे प्रदेश प्रवक्त राजेंद्र पातोडे, माजी जि.प. अध्यक्ष शरद गवई, त्यांचे बंधू दीपक गवई, माजी महासचिव अश्‍वजित सिरसाट, जि. प. सदस्य प्रतिभा अवचार, माजी जि.प. सदस्य अशोक सिरसाट, प्रसिद्ध प्रमुख डॉ. प्रसन्नजित गवई, संजय नाईक, सम्राट डोंगरदिवे आंदीसह ४० जणांचा समावेश आहे.      
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com