दिवंगत आनंद दिघे आणि वसंतराव डावखरे आले गडकरी रंगायतनमध्ये पुन्हा एकत्र...!

..
dighe-Davkhare, Nitin Gadkari Latest Marathi News
dighe-Davkhare, Nitin Gadkari Latest Marathi News

शिक्रापूर :    ठाण्यातील राजकीय वर्तुळात तत्कालीन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे व तत्कालीन कॉंग्रेस नेते वसंतराव डावखरे हे दोघे `एडी' व `व्हीडी' नावाने प्रसिध्द होते आणि या दोघांची मैत्रीही चर्चेचा विषय होती.

सन २००१ मध्ये आनंद दिघेंच्या अकाली निधनाने मैत्रीचे पर्व संपले . वसंतराव डावखरेंचे २०१८ मध्ये निधन झाले .   गडकरी रंगायतनमध्ये आनंद दिघे यांचे  तैलचित्र १७- १८ वर्षांपूर्वी लावण्यात आले होते .  आता वसंतराव डावखरे यांचेही छायाचित्र दिघेंच्या छायाचित्रा शेजारी लावण्यात आले आहे . 

धर्मवीर आनंद दिघे यांच्याच शेजारी दिवंगत डावखरेंचे तैलचित्र लावल्याने दृष्ट लागावी अशी मैत्री जपलेले ’एडी-व्हीडी’ पुन्हा ठाणेकरांनी एकत्र आणले आहेत , असे  यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले उपस्थितांचे डोळे ओलावले.  

दिवंगत डावखरे यांच्या अनेक हृद्य आठवणींसह त्यांच्या अनेक मिश्किल किस्स्यांच्या स्मृतींचीही उजळण यावेळी झाली .  यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदें, खासदार राजन विचारेंसह आमदार निरंजन डावखरे व सर्वच क्षेत्रातील मान्यवर हजर होते . 

हिवरे (ता.शिरुर, जि.पुणे) गावचे सरपंच ते विधान परिषदेचे उपसभापतीपद, ठाण्याचे महापौरपद, ठाणे-पालघर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे विधान परिषदेत २४ वर्षे प्रतिनिधीत्व असे राजकीय वलय राहिलेल्या दिवंगत वसंतराव डावखरे यांचे सर्वक्षेत्रात मित्र होते. 

जेष्ठ नेते शरद पवार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ते अगदी अलिकडच्या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत त्यांनी जपलेला स्नेह सर्वश्रुत आहे. राजकारणात असूनही सामाजिक, साहित्य, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटविला होता.

 ठाणे जिल्ह्याबरोबरच महाराष्ट्रामध्ये ते आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाच्या शैलीने ओळखले जात होते. त्यांच्या याच कार्याचा सन्मान म्हणून ठाणे महापालिकेच्या वतीने राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये दिवंगत वसंतराव डावखरेंचे तैलचित्र बसविण्यात आले. चित्रकार महेश लाड यांनी रेखाटलेल्या या चित्राचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

 या कार्यक्रमाला खासदार राजन विचारे, महापौर मिनाक्षी शिंदे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर अशोक राऊळ, मनोहर साळवी, नईम खान, भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे, ज्येष्ठ नगरसेवक हणुमंत जगदाळे, संजय वाघुले, नारायण पवार, मनोहर डुंबरे, भरत चव्हाण आदींसह सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते.

या कार्यक्रमात ठाण्याच्या  चार माजी महापौरांसह २५ ते ३० वर्षांतील आजी  माजी नगरसेवक व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी  उपस्थिती नोंदविली होती. तैलचित्र अनावरणाच्या निमित्ताने नव्या-जुन्या नगरसेवक व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींचा ह्रद्य सोहळा पार पडला. यावेळी हिव-यातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी व ग्रामस्थ कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com