varkari mumbai news | Sarkarnama

वारकऱ्यांचे सरकारविरोधात पुढील महिन्यात भजन आंदोलन 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 9 सप्टेंबर 2017

मुंबई : श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीतील राजकीय पुढाऱ्याच्या नियुक्तीस थेट आक्षेप घेत ही समितीच बरखास्त करण्याची मागणी वारकरी संघटनांनी केली आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 ऑक्‍टोबरला आझाद मैदान येथे अभिनव अशा भजन आंदोलनाचा इशारा शनिवारी श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनांनी दिला आहे. 

मुंबई : श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीतील राजकीय पुढाऱ्याच्या नियुक्तीस थेट आक्षेप घेत ही समितीच बरखास्त करण्याची मागणी वारकरी संघटनांनी केली आहे. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 ऑक्‍टोबरला आझाद मैदान येथे अभिनव अशा भजन आंदोलनाचा इशारा शनिवारी श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनांनी दिला आहे. 

मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला बंड्यातात्या कराडकर, राजाभाऊ चोपदार, रामेश्वर शास्त्री महाराज ,ज्ञानेश्वर महाराज जळगावकर , पांडुरंग महाराज घुले आणि ऍड. माधवी निगडे आदी वारकरी संप्रदायातील पदाधिकारी उपस्थित होते. आम्ही भजन कीर्तन करणारी माणसे आहोत. आम्हाला रस्त्यावर उतरायला लावू नका असे खडे बोल राज्य सरकारला सुनावले. 

वारकऱ्यांच्या प्रदीर्घ लढ्यानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरावरील बडव्यांची अनिर्बध सत्ता न्यायालयाच्या निर्णयामुळे संपुष्टात आली. मात्र राज्य सरकारने 3 जुलै 2017 रोजी नवीन समिती नेमताना वारकऱ्यांना बाजूला सारले . ही समिती नेमताना वारकरी संप्रदायाशी संबधित सर्व पदाधिकारी असतील असे वाटत होते. परंतु या समितीमध्ये दोन वारकरी तर अन्य दहा जणांचा वारकरी संप्रदायाशी काही संबंध नाही त्यामुळे ही विद्यमान समिती बरखास्त करून नवीन समिती नेमावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 ऑक्‍टोबरला भजन आंदोलन करणार असून राज्यभरातून एक लाख वारकरी या आंदोलनात सहभागी होतील अशी माहिती बंड्यातात्या कराडकर यांनी दिली. 

शिर्डी देवस्थान, पश्विम महाराष्ट्र देवस्थान प्रभादेवीचे श्री सिद्धिविनायक मंदिर आदी देवस्थानावर राज्य सरकार समिती नेमते ,तो सरकारचा अधिकार आहे मात्र राज्यातील कष्टकरी बहुजनांचे दैवत असलेल्या श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीपासून वारकऱ्याना दूर का ठेवले यावरून वारकरी संघटनांनी उघड नाराजी व्यक्त केली. आम्ही जर 50 जणांची यादी दिली तर सरकारने त्यातील कोणत्याही 9 जण निवडले तर आमचा आक्षेप असणार नाही याकडे त्यानी लक्ष वेधले. 

सदाभाऊ - देशमुखही वारकऱ्यांना विसरले 
आषाढी एकादशीला आम्हाला सोलापूरचे मंत्री सुभाष देशमुख आणि कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी आश्वासन दिले होते की मंदिर समिती बरखास्त करा ही समस्त वारकऱ्यांची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोचवू. परंतू, आजतागायत देशमुख -खोत किंवा सरकारच्या वतीने आमच्याशी कोणीही संपर्क साधलेला नाही अशी खंत राजाभाऊ चोपदार यांनी व्यक्त केली. या प्रश्नावर आता आम्ही सरकार दरबारी जाणार नाही ,सरकारने आमच्याकडे यावे असे रामेश्वर महाराज यांनी यावेळी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख