विक्रमी काम झाले पण पावणेबारा तास वाया गेल्याबद्दल सभापती नायडू यांच्याकडून नाराजी

विक्रमी काम झाले पण पावणेबारा तास वाया गेल्याबद्दल सभापती नायडू यांच्याकडून नाराजी

नवी दिल्ली : राज्यसभेच्या अडीचशेव्या व हिवाळी अधिवेशनात जनहिताच्या प्रश्नाना मंत्र्यांनी दिलेल्या उत्तरांच्या संख्येबाबत विक्रमी कामगिरी झाल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच गोंधळ व गदारोळामुळे तब्बल पावणेबारा तास पाण्यात गेल्याबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी सौम्य नापसंती व्यक्त केली. या 20 दिवसांच्या अधिवेशनाचे आज सूप वाजले ते कामकाज न होताच.दुसरीकडे तृतीयपंथीयांच्या हक्करक्षणासारख्या अतिशय महत्वाच्या विधेयकाला प्रसारमाध्यमांनी पुरेशी प्रसिध्दी दिली नाही अशीही खंत नायडूंनी व्यक्त केली. 

अधिवेशनाच्या समारोपावेळी केलेल्या भाषणात नायडू यांनी, राज्यसभेचे कामकाज व्यवस्थित व जास्तीत जास्त चालण्याची गरज पुन्हा प्रतिपादन केली. नायडू यांच्या कडक पवित्र्यामुळे कामकाजात भरीव वाढ झाल्याचे दिसत असताना विरोधकांमधून मात्र - आम्हाला (शाळकरी) मुलांसारखी वागणूक देऊ नका, असा तक्रारवजा विनंतीचा सूर उमटला आहे. 

दरम्यान, नायडू यांनी सांगितले की जनहिताचे प्रश्न व समस्या मांडण्यासाठी असलेला प्रश्नोत्तर तास दोन दिवस तर शून्य प्रहर चार दिवस गोंधळामुळे स्थगित करावा लागला. कधीही भंग न होणाऱ्या राज्यसभेच्या अडीचशेव्या अधिवेशनानिमित्त झालेली विशेष चर्चा, राज्यघटना स्वीकारण्याच्या 70 व्या वर्धापनानिमित्त झालेले विशेष अधिवेशन यांचाही उल्लेख त्यानी केला. या अधिवेशनात सरासरी दररोज 9.5 तोंडी प्रश्नांना मंत्र्यांनी उत्तरे दिली व राज्यसभेत 1971 नंतर हा विक्रम नोंदविला गेला याचाही त्यांनी उल्लेख केला. 

कामकाज तेलगूमधून चालविण्याची इच्छा
राज्यसभा ही राज्यांचा आवाज मांडणारी सभा आहे. त्यामुळे येथे सदस्यांनी आपापल्या मातृभाषेतूनच विचार मांडावेत, असे आग्रही आवाहन नायडू यांनी पुन्हा केले. संपूर्ण दिवसाचे कामकाज माझी मातृभाषा तेलगूतून चालविण्याची माझी तीव्र इच्छा आहे असेही ते म्हणाले. संसदेच्या पटलावर संथालीसारख्या आदिवासी भाषेचा आवाज प्रथमच ऐकू आला याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. बाबूशाहीच्या नियमाप्रमाणे प्रादेशिक भाषांतून बोलण्यासाठी एक दिवस आधी नोटीस द्यावी लागते. मात्र नायडू यांनी यातही शिथिलता आणत हुसेन दलवाई यांनी काल (ता.12) मराठीतून बोलण्याची इच्छा व्यक्त करताच तत्काळ मान्य केली. 

आकडे बोलतात.... 
- अधिवेशनाची एकूण उत्पादकता- 100 टक्के 
- कामकाज - 99 टक्के 
- मंजूर विधेयके 15 ( ता. 12 रोजी एकाच दिवशी चार मंजूर) 
- तारांकित प्रश्न - 255 पैकी 171 
- 20 बैठकांमध्ये 108 तास 33 मिनीटांपैकी 107 तास 11 मिनीटे कामकाज. 
- गोंधळामुळे वाया गेलेला वेळ - 11 तास 47 मिनीटे 
- अतिरिक्त काळ कामकाज - 10 तास 52 मिनीटे 
- शून्य प्रहरात मांडलेले विषेय - 199 
- विशेषोल्लेख 115 
-चर्चा झालेली खासगी विधेयके 5 टक्के. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com