वैजापूर मतदारसंघ शिवसेनेकडे खेचण्यासाठी पुन्हा वाणींना संधी ?

 वैजापूर मतदारसंघ शिवसेनेकडे खेचण्यासाठी पुन्हा वाणींना संधी ?

औरंगाबाद : मोदी लाट आणि राज्यात तुटलेली युती याचा फटका 2014 मध्ये शिवसेनेला बसला होता. सलग पंधरा वर्ष शिवसेनेकडे असलेला वैजापूर विधानसभा मतदारसंघ गेल्यावेळी राष्ट्रवादीने ताब्यात घेतला होता. आता केंद्रात बहुमताने एनडीएचे सरकार आले असतांना वैजापूर मतदारसंघ पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. कुठलाही नवा प्रयोग न करता यावेळी माजी आमदार आर. एम. वाणी यांनाच पक्षाकडून संधी दिली जाण्याची दाट शक्‍यता आहे. 

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एमआयएम-वंचित बहुजन आघाडी, अपक्ष उमेदवाराचे तगडे आव्हान समोर असतांना वैजापूर तालुक्‍यात शिवसेनेला अकरा हजाराहून अधिक मतांची आघाडी मिळाली. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ती घटली असली तरी अन्य तालुक्‍यांचा विचार करता वैजापूरने शिवसेनेला खंबीरपणे साथ दिल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेचे माजी आमदार आर.एम. वाणी यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघातील शिवसैनिकांनी जीवाचे रान करत ढासळणारा किल्ला काही प्रमाणात राखला. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघातून शिवसेनेचे चंद्रकांत खैरे यांना 49058 मतांची आघाडी मिळाली होती. ती यावेळी तब्बल 37941 मतांनी घटली. वैजापूरमधून खैरे यांना 66971, हर्षवर्धन जाधव 55554, तर इम्तियाज जलील यांना 35462 मते मिळाली होती. अर्थात संपूर्ण जिल्ह्यात शिवसेनेची पिछेहाट झाली असतांना थोड्याफार प्रमाणात जी लीड मिळाली त्यात वैजापूर आणि कन्नड विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. 

1999 ते 2014 दरम्यान झालेल्या चारही लोकसभा निवडणुकीत वैजापूर मतदारसंघाने शिवसेनेच्या पाठीशी आपली भक्कम ताकद उभी केली होती. विजय आणि मताधिक्‍यांची ही परंपरा गेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र खंडीत झाली होती. युती तुटल्याचा पुरेपूर फायदा उचलत राष्ट्रवादीचे भाऊसाहेब पाटील चिकटगांवर वैजापूरमधून 4709 मतांनी विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या आर. एम. वाणी यांचा पराभव केला होता. 

फिर एक बार वाणी? 
प्रकृती अस्वस्थ आणि नव्या चेहऱ्याला संधी या कारणांमुळे आर. एम. वाणी यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत तालुकाध्यक्ष प्रा. रमेश बोरनारे यांची शिफारस पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. पण तेव्हा बोरनारे यांना थांबण्याचे आदेश देण्यात आले होते. दुर्दैवाने त्या निवडणुकीत वाणींचा पराभव झाला. आता 2019 ची तयारी सुरू असतांना काही महिन्यापूर्वी वाणी यांनी प्रा. बोरनारे यांच्या नावाची शिफारस करत आपण आता निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. 

परंतु लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील बदललेली राजकीय समीकरणे, शिवसेनेचा झालेला पराभव आणि राज्यात पुन्हा युतीची सत्ता येण्याची शक्‍यता पाहता पक्षश्रेष्ठी जोखीम स्वीकारायला तयार नाही. वैजापूरमधून पुन्हा एकदा आर. एम. वाणी यांच्या नावाची चर्चा आणि मागणी देखील स्थानिक युतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी लावून धरल्याची चर्चा आहे. एकंदरित वैजापूरची जागा कुठल्याही परिस्थितीत खेचून आणायची असल्यास शिवसेनेकडून "फिर एक बार वाणी' धोरण स्वीकारले जाऊ शकते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com