वंचित आघाडीच विरोधी पक्ष राहील : मुख्यमंत्री फडणवीस 

गेल्या १५ वर्षात सत्तेत असताना कॉँग्रेस राष्ट्रवादी काही करु शकले नाहीत त्याचबरोबर गेल्या पाच वर्षातही विरोधी पक्षाची भूमिका योग्य प्रकारे पार पाडू शकले नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास राहिला नाही. आगामी काळात राज्यात विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी उदयास येईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. ३१) व्यक्त केले.
CM Speech in Mahajanadesh Yatra in Nanded
CM Speech in Mahajanadesh Yatra in Nanded

नांदेड : गेल्या १५ वर्षात सत्तेत असताना कॉँग्रेस राष्ट्रवादी काही करु शकले नाहीत त्याचबरोबर गेल्या पाच वर्षातही विरोधी पक्षाची भूमिका योग्य प्रकारे पार पाडू शकले नाहीत. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास राहिला नाही. आगामी काळात राज्यात विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी उदयास येईल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता. ३१) व्यक्त केले. 

त्याचबरोबर मराठवाड्यात ऊसावर अचानक अशी बंदी आणता येणार नाही त्यातून मार्ग काढावा लागेल, असेही त्यांनी सुचवले. मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा नांदेडमध्ये आली असून शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील रातोळीकर, महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. 

महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने राज्यात दोन हजार २६८ किलोमीटरची यात्रा ७८ विधानसभा क्षेत्रात झाली असून जनतेचा प्रतिसाद असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, ''केंद्र सरकारने आताच तीन लाख घरे मंजूर केली असून त्यात सव्वा लाख घरे महाराष्ट्रातील आहेत. ग्रामिण तसेच शहरी भागातील गोरगरिबांना घरकुले देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून २०२२ पर्यंत सर्वांना घरे मिळतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.  मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन वॉटर ग्रीड सारखी योजना घेण्यात येत असून त्यासाठी २० हजार कोटींची गुंतवणुक शासन करणार आहे. १०२ टीएमसी पाणी हे मराठवाड्याच्या हक्काचे असून ते मिळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतील तसेच कोकणातून समुद्रात तीनशे टीएमसी पाणी वाहून जाते. त्यातील १६७ टीएमसी पाणी लिफ्ट करुन मराठवाड्यात आणण्यासाठीच्या योजनेला मंजूरी देण्यात येत आहे.''

शरद पवार मोठे नेते
नारायण राणे हे भाजपाचे खासदार आहेत. त्यांचा पक्ष भाजपात विलीन करण्यासंदर्भात शिवसेना या मित्र पक्षाशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेण्यात येईल. शरद पवार यांच्याबाबत बोलताना मात्र ते मोठे नेते असून त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, असे सांगून ते म्हणाले की, काळाची पावले ओळखली पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वावर जनतेला विश्वास वाटतो. भविष्यातील ते मोठे नेतृत्व आहे. राष्ट्रवादी ही महाराष्ट्रापुरती मर्यादित आहे आता तर पच्शिम महाराष्ट्र आणि काही जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली असल्याचे त्यांनी सांगितले.

ऊसावर बंदी नव्हे तर पर्याय
मराठवाड्यात ऊसाची लागवड करु नये, असा अहवाल औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी पाठविला असून त्यावर मत व्यक्त करता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अचानक अशी ऊसावर बंदी घालता येणार नाही. विभागीय आयुक्तांनी पाठवलेला अहवाल गंभीर आहे. मराठवाड्यातील दुष्काळी भागातील परिस्थिती लक्षात घेऊन ऊसासाठी इतर उपाययोजना कराव्या लागतील. शंभर टक्के ठिबक सिंचनावर ऊस घ्यावा लागेल त्यासाठी सबसिडीतही वाढ करावी लागेल तसेच तीन वर्षे ठिबकच्या ऐवजी पर्याय शोधावा लागेल. त्याचबरोबर ऊसाला अल्टरनेट पिकाचाही विचार करावा लागेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com