औरंगाबाद महापालिका निवडणुकीत "वंचित बहुजन आघाडी'ची वेगळी चूल

....
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत "वंचित बहुजन आघाडी'ची वेगळी चूल

औरंगाबाद : औरंगाबाद आगामी महापालिका निवडणुकीत कुठल्याही पक्षाशी आघाडी किंवा युती न करता सर्व 115 जागा लढवण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीने घेतला आहे. निवडणूक निरीक्षक नितीन सोनवणे यांनी औरंगाबादेतही माहिती दिली. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करत संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभेत मात्र एमआयएमची साथ सोडत स्वबळावर निवडणूक लढवली होती. मात्र या पक्षाला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही, परंतु लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लक्षवेधी मते घेतली होती. 

विधानसभेत आघाडी न झाल्यामुळेच एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीला फटका बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्यामुळे औरंगाबाद महापालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्रित येतील असे बोलले जात होते. मात्र वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचा एमआयएमवर असलेला राग अद्यापही कमी झालेला दिसत नाही. महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपवलेले नितीन सोनवणे यांनी आम्ही कुठल्याही पक्षाशी युती करणार नसून सर्व 115 वॉर्डांमध्ये स्वतंत्र उमेदवार देणार आहोत असे सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या संपर्कात शिवसेना-भाजप, एमआयएम या पक्षाचे अनेक पदाधिकारी व काही विद्यमान नगरसेवक असल्याचा दावाही सोनवणे यांनी केला. 

पक्षाकडे 115 वॉर्डातून साधारण साडेतीनशेहून अधिक इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली असल्याचे त्यानी सांगितले. तीन जणांची समन्वय समिती येत्या काही दिवसात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आणि अर्ज वाटप करणार असून औरंगाबाद महापालिकेत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा फडकेल असा विश्वास आम्हाला असल्याचे सोनवणे यांनी यावेळी सांगितले. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com