वंचित बहुजन आघाडी 21 जुलैपासून मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेणार

 वंचित बहुजन आघाडी 21 जुलैपासून मराठवाड्यातील इच्छुकांच्या मुलाखती घेणार

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत राज्यात 41 लाखांहून अधिक मते मिळवल्यानंतर आगामी विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडे इच्छुकांच्या अक्षरशः रांगा लागल्या आहेत. पहिल्या टप्यात विदर्भातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्यानंतर दुसऱ्या टप्यात 21 ते 28 जुलै दरम्यान मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य ऍड अण्णाराव पाटील, अशोक सोनोने व महिला प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर या मुलाखती घेणार आहेत. 

वंचित बहुजन आघाडीला नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद वगळता राज्यात कुठेही यश मिळाले नाही. परंतु राज्यातील प्रत्येक मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी लक्षवेधी मते घेतली. संपुर्ण राज्यात हा आकडा 41 लाखांहून अधिक असल्याचे समोर आले आहे. वंचितचे उमेदवार विजयी झाले नसले तरी त्यांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व काही मतदारसंघात सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या उमेदवारांची दमछाक केली होती. 

पहिल्याच निवडणुकीत राज्यात मिळालेला प्रतिसाद पाहता आगामी विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडून वंचितला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू असले तरी त्याला प्रकाश आंबेडकर यांच्याकडून फारसा प्रतिसाद मिळतांना दिसत नाही. या उलट इच्छुकांच्या मुलाखती घेत वंचितने आपले काम नेटाने पुढे चालवेले आहे. मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मते मिळाली होती. त्यामुळे पक्षाने या भागावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. 

मराठवाड्यातील इच्छुकांची संख्या पाहता येत्या 21 ते 28 जुलै दरम्यान मुलाखतीचे सत्र सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 21 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातून या मुलाखतींना सुरुवात होणार आहे. त्यानंतर बीड- 22, लातूर-23, नांदेड-24, हिंगोली-25, परभणी-26, औरंगाबाद-27, तर जालना येथे 28 रोजी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. दोन आठवड्यापुर्वी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर, महिला प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर औंरगाबाद जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी आल्या होत्या. या मुलाखतींना सुशिक्षत महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. आता विधानसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी देखील जिल्ह्यात इच्छुकाची त्यापेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com