vanchit aaghadi opposes sambhaji bhide | Sarkarnama

सिंधुदुर्गमध्ये संभाजी भिडे विरूद्ध 'वंचित' सामना!

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

त्यांच्या जहाल विधानांनी जिल्ह्यातील परिवर्तनवादी विचारांच्या संघटना आणि सनातनी संघटना यांच्यामध्ये संघर्ष होऊन जिल्ह्यातील वातावरण बिघडू शकते.

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रवेश नाकारावा, अशा आशयाचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने येथील तहसीलदार आणि पोलिस निरीक्षकांना आज देण्यात आले. येथे 15 ला त्यांचे व्याख्यान होणार आहे; मात्र त्या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचा विरोध असल्याने परवानगी देऊ नये, अशी त्यांची मागणी आहे.

तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, 1 जानेवारी 2020 च्या भीमा-कोरेगाव स्मृतीदिनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री. भिडे हे जिल्ह्यामध्ये अशांतता माजविण्याच्या उद्देशाने दोडामार्ग येथे येत असल्याची शक्‍यता आहे. त्यांचे बोलणे आणि वागणे हे नेहमीच संशयी आणि वादग्रस्त आहे. 1 जानेवारी 2018 ला घडलेल्या भीमा-कोरेगाव दंगलीस श्री. भिडे आणि मिलिंद एकबोटे जबाबदार असल्याचे नेहमीच म्हटले आहे. सिंधुदुर्गची ओळख ही शांततामय जिल्हा अशी आहे. त्यामुळे येथे येऊन जर समाजामध्ये असलेले खेळीमेळीचे वातावरण बिघडविण्याचे काम ते करू शकतात. त्यांच्या जहाल विधानांनी जिल्ह्यातील परिवर्तनवादी विचारांच्या संघटना आणि सनातनी संघटना यांच्यामध्ये संघर्ष होऊन जिल्ह्यातील वातावरण बिघडू शकते. त्यामुळे श्री. भिडे यांच्या सोमवारी (ता.16) दोडामार्ग येथे होऊ घातलेल्या सभेस वंचित बहुजन आघाडी, जिल्ह्यातील विविध परिवर्तनवादी संघटना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने कार्यरत असलेल्या अनेक धार्मिक व राजकीय संघटना यांचा विरोध आहे.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परुळेकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष वासुदेव जाधव, दोडामार्ग तालुकाध्यक्ष सुरेश जाधव, तसेच मधुकर जाधव, साबा जाधव, बाबूराव न्हावेलकर, गुणाजी जाधव, विठ्ठल जाधव, मोहन हेवाळकर, नवसो कदम, राजन हेवाळकर, काशीराम असनियेकर, प्रदीप कांबळे, सत्यवान जाधव, संतोष जाधव, घुसाजी जाधव आदी उपस्थित होते.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख